रेल्वे अपघात – अमृतसर – दिनांक १९/१०/२०१८
जगात अशा तर्हेची दुर्घटना घडल्याचे ऐकिवात नाही. चारशे ते पाचशे जनसमुदाय बेभान होऊन रेल्वे रुळांवर उभा असतो, मोबाईल ने फोटो काढत असतो. मी कोणालाही दोन्ही रुळांवरून येणाऱ्या गाड्यांचे भान नाही. थिजवून टाकणारी घटना, जबाबदार कोण? रेल्वे तर नक्कीच नाही.
आमच्या देशात नानातर्हेचे भीषण मृत्यू तांडव अखंड चालू आहेत. हाच का आमचा सांस्कृतिक वारसा. हत्ती आणि सिंहाचे रेल्वे रूळावरील बळी टाळण्यासाठी रेल्वे आधुनिक यंत्रणा वापरीत आहे. पण माणसांना रेल्वे कशी वाचवणार? त्यांच्या हातात मोबाईल आहेत.
सतत फोटो काढण्यासाठी माणसेच जर गाई म्हशींसारखी रुळावर आली तर काय करणार?
भारतातील काही भीषण रेल्वे अपघात
भारतात रोज हजारोंनी रेल्वे गाड्या सुरळीतपणे धावत असतात, तेव्हा त्याच्या पाठीशी फार मोठी यंत्रणा अहोरात्र झटत असते. डोळ्यात तेल घालून हजारो कर्मचारी प्रसंगी जीवावर उदार होऊन आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असतात, पण तरीही कधीतरी चूक होते आणि दुर्दैवाने भीषण, हृदयद्रावक रेल्वे अपघात घडत असतात. काहीवेळा नैसर्गिक आपत्तीपुढे हात टेकावे लागतात आणि अपघात टाळणे माणसाच्या आवाक्याबाहेर ठरतं.
अशा महाभयंकर अपघातांचा इतिहास वाचताना मन विषण्ण होतं.
– भारतीय रेल्वे वरील पहिल्या रेल्वे अपघाताची नोंद १८९० सालातील आहे. नागपूर जवळ झालेल्या या अपघातात दहा जण मृत्युमुखी, तर 35 जण जबर जखमी झाले होते.
– रामेश्वर धनुष्यकोडी एक्स्प्रेसनं (ट्रेन नंबर ६५३) सन १९६४ मधील २२ डिसेंबरच्या रात्री ११ वाजता पम्बम ब्रिज ओलांडून रामेश्वर सोडलं होतं. गाडीत ११० प्रवासी व ५ रेल्वे कर्मचारी होते. पावसाचा मारा प्रचंड होता. समुद्र उफाळलेला होता. काही क्षणात संपूर्ण गाडी समुद्राच्या पोटात गडप झाली. सर्वच्या सर्व जण मरण पावले, पम्बम ब्रिजचाबराच भाग निकामी झाला. धनुष्यकोडी स्टेशन नामशेष झाले . रामेश्वर धनुष्य कोडी रेल्वे मार्ग कायमचा बंद करण्यात आला. प्रसंगी निसर्ग असा क्रूरही होत असतो.
– कलका मेल बागमती नदी दुर्घटना १९८१ साली झाली, कलका- हावरा मेल बिहार मधील बागमती नदीवरील पुलावरून जात असताना इंजिन ड्रायव्हर ने एका गाईला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक दाबला. मान्सूनचे दिवस होते, नदीला भरपूर पाणी, तशात गाडीचे ७ डबे खेळातील पत्त्यांच्या घरासारखे नदीत कोसळले आणि जवळजवळ ६०० प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यातील ३०० माणसे वाहून गेल्याने बेपत्ता म्हणून घोषित करण्यात आली.
– गैसाल रेल्वे दुर्घटना (१९९० नंतर ) : बंगाल-आसाम मार्गावरील गैसाल या लहान स्टेशन वर मध्यरात्री अवध-आसाम एक्सप्रेस सिग्नल नसल्याने बराच वेळ उभी होती. दिब्रुगड- दिल्ली ब्रह्मपुत्रा मेल अतिशय वेगात त्याच मार्गावर समोरून येत होती. काही कळण्याच्या आत महाभयंकर टक्कर झाली व २९० प्रवाशांचा बळी गेला. समोरून येणारी ब्रह्मपुत्रा मेल आधीच्या दोन स्टेशनपासून चुकीच्या रेल्वेमार्गावरून वेगात धावत होती, पण ही चूक त्या गाडीचे दोघे ड्रायव्हर, मधले कॅबिन मन, प्लॅटफॉर्मवर चे कर्मचारी यांपैकी कोणाच्याच लक्षात कशी आली नाही हे एक कोडेच होते. सर्वजण नशेच्या अमलाखाली असण्याची दाट शंका या अपघाताच्या चौकशीत विचाराधीन होती.
– फ्रंटियर मेल दिल्लीहून अंबाला मार्गे अमृतसर ला जाताना मध्यरात्री तिथे काही डबे घसरून समोरच्या रुळांवर अस्ताव्यस्त पडले होते. या अपघातातून सावरत असतानाच समोरच्या बाजूने जम्मू तावी- सीआलडा एक्सप्रेस वेगात येत होती. घसरलेल्या डब्यांना प्रचंड जोरात धडक दिल्याने दोन्ही गाड्यातील २१२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
– कलकत्ता कुर्ला टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस (२००० नंतर) : येणाऱ्या गाडी समोरील लांबचे लांब रूळ नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोटात उडवल्याने गाडीचे डबे बाजूच्या रुळांवरून कोसळले. त्याच वेळी समोरून येणाऱ्या मालगाडीच्या जबरदस्त धडकेमुळे १३० प्रवासी नाहक बळी पडले. आपली चूक नक्षलवाद्यांना लक्षात आली, त्यांनी कबुली दिली, की मालगाडी उडवण्याऐवजी एक्सप्रेस उडवली गेली होती.
– २००० सालात तर कोकण रेल्वे मार्गावर महा दुर्घटना झाली. त्यावेळी पावसाळ्यात मुंबई गोवा मांडवी एक्सप्रेस च्या इंजिनावर रत्नागिरीजवळील बोगद्यात प्रचंड मोठी दरड कोसळल्याने १०० प्रवासी मृत्युमुखी पडले.
याशिवाय, डब्याला आग लागल्याने वा मुद्दाम लावल्याने, बॉम्ब स्फोट घडवून आणल्याने अपघात घडत असतातच. अशावेळी रेल्वेची अपघात यंत्रणा युद्धपातळीवर तत्काळ कार्यान्वित होते, पण शेवटी नियतीपुढे झुकावं लागतं. कधीही भरून न येणारं नुकसान झालेलं असतं.
– डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply