“शके १९७८ च्या माघ महिन्यात दख्खन प्रांतात धामधूम उडाली होती. उधोजी राजांच राज्य खालसा करण्यासाठी आदिलशहा दहा लाखाची फौज घेऊन पुन्हा एकदा जातीने उतरला होता. आदिलशाही फौजेचं नेतृत्व देवा फडणविस नावाचा विदर्भातील ताज्या दमाचा सरदार करत होता.देवा फडणविस साध्या शिपायापासुन बारगीर, हवालदार , मनसबदार अशा पायऱ्या चढत चढत सेनापती पदापर्यंत पोहचला होता तर उधोजी राजांना राज्य वंशपरंपरागत मिळालेलं होतं. फडणविसाच्या दिमतीला शेलार मामा, विनोदराउ तावडा, किरीट बहाद्दर सोमय्या आदी बिनीचे शिलेदार होते. उधोजींची सारी मदार बाळ आदित्यराजे आणि समुद्री वारे अंगावर झेलत मोठा झालेला आगरी नाखवा मिलिंद नार्वेकरावर होती. घोडदळ, पायदळ, तिरंदाज, गोलंदाज अशी दोन्ही बाजूने जय्यत तयारी झाली होती.
नाशिकचा सुबेदार आणि उधोजींचा धाकटा भाऊ राजोजीने रसद आणि कुमक पाठवू का असा सांगावा घेऊन आपला पेशवा बाळाजी नांदगावकरनाथ राजधानी मातोश्री वर पाठवला पण उधोजी राजेंनी राजोजीसाठी “गर्दीस मेळल्यावीना तोंड देखिल दाखवू नकोस” असा उलट निरोप देऊन बाळाजीची बोळवण केली. पेशवा बाळाजी डोळ्यात अश्रु घेऊन राजगडावर परतला.
……………आणि एकदाची दोन्ही फौजांची गाठ साष्टीच्या बेटाजवळ पडली.एकच गर्दी झाली. गनिम चारी बाजुने हल्ला करू लागला पण उधोजी राजांनी स्वतः तोफेला बत्ती देऊन शत्रुला भाजुन काढुन बेजार केले. दक्षिण दिशेचा एक बुरुज लढवताना बाळ आदित्यच्या हल्ल्यात शेलार मामांचा धाकला बंधू ठार झाला हि खबर ऐकताच पिसाळलेल्या शेलारमामांनी ‘ तुमचा बाप इकडे मरुन पडला आहे आणि तुम्ही कुठे पळता’ असं ओरडत उधोजींचा जवळचा सरदार राहुल शेवाळा याला जायबंदी करुन आपला बदला घेतला. अटीतटीची लढाई झाली.
दुपार पर्यंत हाडा मांसाचा चिखल झाला.रक्ताचे ओघळ पार दर्यात जाऊन मिळाले. कोणीच मागे हटत न्हवते. पण संध्याकाळ पर्यंत चित्र पालटू लागले. शत्रूने आपल्या राखीव फौजा बाहेर काढल्या आणि मराठी फौजा शत्रुच्या संख्येपुढं धाप टाकू लागलं.किती मोती गळाले आणि किती माणकं गर्दीत मिळाली याची मोजदाद करणं कठीण होऊन बसलं. प्रत्यक्ष रणांगणावरील खबर घेऊन जासुद टाकोटाक मातोश्री वर पोहचले. खलबतखान्यात आपल्या अष्टप्रधान मंडळासह बसलेल्या उधोजींना खबर देताना जासुदांना देखिल अश्रू आवरत न्हवते.
‘राजं सध्या शिबंदी आणि रसद कमी आहे. गनिम अरबी घोडे आणि फिरंगी तोफांच्या जोरावर एकेक ठाणी काबीज करत चालला आहे. आपल्या जवळ हौसला आणि जिद्द भरपुर परंतु आत्ताच मराठी सैन्याजवळ खाण्यासाठी शिववड्याशिवाय काही उरले नाही, आदिलशाही फौजा ढोकळा फाफडा खाकरा खाऊन मस्तवाल झालं आहे. आपल्याला नुसत्या इरशिरीवर युद्ध जिंकता येणार नाहीच, पण अजून थोडा वेळ युद्ध चाललं तर आहे तेवढं राज्य सुद्धा हातातुन जाईल त्यामुळे आता आदिलशहा बरोबर सलाह करावा वेळ येईल तेव्हा आदिलशहाला बघुन घेऊ’ असा पोक्त सल्ला उधोजींना अष्टप्रधान मंडळाकडून मिळाला.
मोठ्या कष्टाने आणि दुःखी अंतकरणाने आई भवानीला साक्षी ठेऊन उधोजी राजांनी सल्ला मनावर घेतला कारण पुनवडी, वसई, वऱ्हाड, विदर्भ येथील सगळ्या किल्ल्यांना शत्रू गिळंकृत करून बसला होता. पुन्हा उभं रहायचं असेल तर आत्ता जगणं महत्वाचे होते.” बचेंगे तो और लडेंगे” म्हणणारा दत्ताजी त्यांना आठवला आणि ……………..
सालीना चाळीस हजार होन उत्पन्न असलेली साष्टीची बेटं उधोजी राजांना आणि खानदेश वऱ्हाड बारा मावळासह तीन लाख होनांचा प्रदेश आदिलशहाला या बोलीवर शके १९७८ साली तह यशस्वी पार पडला.”
रडत राऊत बखर
तुषार दामगुडे
( खोटा इतिहासकार )
Leave a Reply