दास डोंगरी राहातो …..!
राधानगरी घाट.. सह्याद्रीचा महासमर्थ मुलुख !
दाजीपूर….राधानगरीचा …. फोंडा …. भिरवंडे … हरकूळ … नरडवे … सांगवे … कनेडी …… हा सहयाद्रीच्या घाटमाथ्याचा … पायथ्याचा महा मातब्बर मुलुख …घनदाट अरण्याचा… आकाशाला स्पर्श करणाऱ्या सहयकडयांचा…कल्पनेपलिकड़े कोसळणाऱ्या पावसाचा… कडेकपाऱ्यांतून …. दऱ्याखोऱ्यातून अहोरात्र थैमान घालणाऱ्या वाऱ्याचा …फुसांडत कोसळणाऱ्या प्रपातांचा … निसर्गाच्या या सगळ्या सामर्थ्यचं प्रतीक असणाऱ्या तिथल्या ताकदवान गहूरेडयांचा … गव्यांचा …. अक्षरशः भरलेला आणि भारलेला …. निसर्गाचे … पंचमहाभूतांचे अति सामर्थ्यवान … विराट आविष्कार पदोपदी दिसत राहातात … … आपली नजर क्षणोक्षणी विस्फारत जाते ….. हिरवंगार …. समृद्ध करण्याचं ऐश्वर्यवान पाचूचं कोंदण आणि तिथली निरव शांतता ….
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे … असाच भरलेला निसर्ग बघून तुकाराम महाराजांना या ओळी सुचल्या असतील का? … धबाबा लोटिल्या धारा, धबाबा तोय आदळे … रामदास स्वामी पण निसर्गाचा हा असा विराट अविष्कार बघून असं बोलून गेले असतील का?ही सगळी त्यावेळची मोठी माणसं अशा विराट निसर्ग वेडेच असतील …. रामदास स्वामींनी तर या सगळ्या भवतालाला .. आनंदवनभुवन असं म्हटलं. बहुतेक म्हणूनच त्यांनी दासाची सर्वोत्तम लक्षणे सांगताना …. ‘सदा सेवि आरण्य तारुण्य काळी’ हे लक्षण लिहून ठेवलं असावं.
आमचे परमप्रिय … जीवाभावाचे मित्र रघुनाथ सावंत यांचा भिरवंडयात … अशाच अरण्याने वेढलेला परंपरागत पुरातन वाडा आहे. त्या मातब्बर वास्तूशी आमचे दृढ ऋणानुबंध आहेत …. गेली काही वर्ष आम्ही जुलैमध्ये तिथे जातो …. हा निसर्ग बघून मला एक इच्छा मनात प्रबळ झाल्येय … घडाळ्याला … कॅलेंडरला झुगारून … दाजीपूर-राधानगरीहून चालत निघावं … सोबत दोन चार जीवाचे मित्र असावेत … पाठीवर कॅमेरा असावा … आणि निवांतपणे … या सगळ्या निसर्गाला नीट बघत … त्याच्याशी बोलत … वाटेतली ही सगळी गावं बघत … आठ दिवस पार कणकवलीपर्यंत पायी चालत जावं … वाटेत जर या रानात एखादं जुनं अडवाटेवरचं देऊळ लागलं तर तिथे एखाद दोन दिवस राहावं … रानात खोलवर चालत जावं … संध्याकाळी सृष्टीची शोभा बघत देवळाच्या अंगणात बसावं … रात्री थोडया गप्पा माराव्यात … हे सावंतांना मात्र मान्य होणार नाही … ते म्हणतील … तुम्ही दिवसभर चाला … तिन्हीसांजा झाल्या की फोन करा … गाडी पाठवू … वाडयावर रात्रीचे जेवायला … झोपायला या … बघूया … निसर्गदेवता या साठी कधी बोलावते …
मेघसा जाशी तिथें तूं आपणा शिंपीत जा
वांझुटया झाडांझुडांही नीट गोंजारीत जा
पोळलेला माळ येतां थांब स्नेहानें जरा
स्वप्न पाचूचें तयाचें येउं दे रे मोहरा
स्निग्ध जात्या ही धरित्री ओलिनें गंधप्रसू
सांडतां झेलील तूतें दाटुनी पोटीं हसूं
हो रिता जाशील तेथें, जा जिवा सौख्यें उतूं
शुभ्र अभ्रासारखा तू खालचा पाहीं ऋतू
रिक्ततेवांचून येथें मुक्ति नाहीं वेगळी
प्रीतिचा माते मळा ती आपुली गंगाजळी ……
– कविवर्य बा.भ. बोरकर
(काव्यसंग्रह – अनुरागिणी – १९८२)
— प्रकाश पिटकर
Image © Prakash Pitkar….
Leave a Reply