जपानमधील फुकुशिमा येथे दाईची अणुप्रकल्पात भूकंप व सुनामीमुळे अणुभट्टीचे मेल्टडाऊन झाल्याने किरणोत्सर्ग तेथील पर्यावरणात पसरत आहे. कुठल्याही अणुऊर्जा प्रकल्पात अस्थिर अणू असलेली किरणोत्सारी समस्थानिके वापरली जात असतात. त्यातून आयनांच्या स्वरूपात जे सूक्ष्म कण बाहेर पडत असतात त्यालाच किरणोत्सर्ग (रेडिएशन) असे म्हणतात.
किरणोत्सर्गाला तसे पाहिले तर आपण रोजच तोंड देत असतो. पण म्हणून आपल्याला कर्करोग किंवा इतर व्याधी जडत नाहीत. कारण नेहमीचा किरणोत्सर्ग हा आयनांच्या स्वरूपात नसतो, तर अणुप्रकल्पाच्या ठिकाणचा किरणोत्सर्ग आयनांच्या स्वरूपात असतो. त्यामुळे ते आयन (भारित कण) मानवी शरीरात थेट प्रवेश करून तेथील पेशींमध्ये नको ते बदल घडवून आणू शकतात. ते कण सेकंदाला १ लाख ८६ हजार मैल इतक्या वेगाने प्रवास करीत असतात. नैसर्गिक स्रोतांपासून सेकंदाला किमान १५ हजार भारित कण आपल्या शरीरावर आदळत असतात. आपण जेव्हा एक्स रे काढतो तेव्हा त्यात किरणोत्सर्गाचाच वापर केलेला असतो. त्यात सेकंदाला १०० अब्ज कण आपल्या शरीरावर आदळतात. क्षकिरण तपासणीत ते कण मानवी शरीरात प्रवेश करण्याचा धोका नगण्य असतो.
त्यामुळे आपल्याला रोग होत नाहीत. अणुभट्टीत किरणोत्सारी कचरा मोठ्या प्रमाणात तयार होत असतो. हा कचराही धोकादायक असतो. तो सिमेंटच्या पेटीत बंदिस्त करून जमिनीत २० फूट खोल गाडला जातो. काही प्रमाणात किरणोत्सर्ग वातावरणातही सोडला जात असतो. पण त्याचे प्रमाण फार नियंत्रित केलेले असते. दाईची प्रकल्पात आयोडिन-१३१ व सेसियम-१३७ ही दोन समस्थानिके (आयसोटोप) जास्त हानिकारक ठरली आहेत.
किरणोत्सर्गी आयोडिन मानवी शरीरात गेल्यास गॉयटर व इतर गंभीर रोग होतात. त्यावर उपाय म्हणून पोटॅशियम आयोडाईडच्या गोळ्या घ्याव्या लागतात. सेसियम तर त्यापेक्षा हानिकारक असते. किरणोत्सर्ग हा सिव्हर्ट एककात मोजतात. एक्सरेमध्ये ०.१ मिलीसिव्हर्ट, तर सीटी स्कॅनमध्ये १२ मिलीसिव्हर्ट असतो. भारतात वर्षाला १००० मायक्रोसिव्हर्ट ही किरणोत्सर्गाची मर्यादा दिलेली आहे. जपानमधील फुकुशिमा येथे काही सेकंदाला ४०० ते ६०० मायक्रोसिव्हर्ट इतका किरणोत्सर्ग झाल्याचे दिसून आले आहे.
निसर्गातही अल्फा, बिटा, गॅमा किरणांमुळे असा उत्सर्ग होत असतो. सिव्हर्ट हे किरणोत्सर्ग किती पातळीपर्यंत जैविकदृष्ट्या चालू शकतो याचे एकक आहे. जमिनीत अनेक ठिकाणी युरेनियम, थोरियम, पोटॅशियम- ४० ही किरणोत्सर्गी द्रव्ये असतात. त्यातूनही प्रारणे बाहेर पडतात. वैश्विक किरणही त्याला कारणीभूत ठरतात. नैसर्गिक स्रोतांमधील किरणोत्सर्गाचे प्रमाण वर्षाला २ ते ४ मिलीसिव्हर्ट इतके असते.
Leave a Reply