लहानपणी आई आपल्याला पहिल्यांदा खाऊ घालते, दूधभात! इथपासूनच भाताशी आपलं अनामिक ‘नातं’ तयार होतं. हलका आहार म्हणून दूधभाताला खूप महत्त्व आहे.
लहानपणी आजारी पडल्यावर बरं होईपर्यंत डाॅक्टर वरणभात खायला आवर्जून सांगायचे. सुट्टीत गावी गेल्यावर आम्ही नातवंडं आजोबा जेवताना त्यांच्यासमोर बसायचो. मग ते कालवलेला भात आम्हाला भरवायचे.
शहरात आल्यावर रेशनिंगवर मिळणाऱ्या तांदूळाचा भात खाऊ लागलो. समोरच पारसवार यांचं रेशनिंगचं दुकान होतं. त्यावेळी महिन्याला पाच किलो तांदूळ मिळायचे.
भात खाऊन माणूस लठ्ठ होतो असा एक समज आहे. ते खरं असतं तर फक्त भातावरतीच अवलंबून असणारी कोकणातील तमाम जनता लठ्ठच दिसली असती. मला तर लहानपणापासून भात आवडतो. दुसरं काही नसलं तरी भात आणि आमटी मला सर्वात प्रिय आहे. मग ती कटाची आमटी असो वा साधं वरण असो. पिठलं भात हा पंढरीची वारी करणाऱ्यांचा आवडता आहार आहे. कित्येक मंदिरांतून महाप्रसाद म्हणून खिचडी किंवा कढी भात भक्तांना दिला जातो.
मी जेव्हा आईला स्वयंपाकात मदत करु लागलो, तेव्हा मी पाहिलं होतं ती तांदूळ धुवून घेतल्यानंतर तो शिजायला ठेवताना आपल्या बोटांनी पाण्याचं प्रमाण ठरवायची. पुढे ती कधी गावी गेल्यावर मी भात आमटी करु लागलो.
वडील जेव्हा शिक्षण विस्तार अधिकारी झाले तेव्हा मुळशीच्या पौड, बावधन, भूगाव, इ. गावांमधील शाळा तपासणीच्या निमित्ताने तेथील शिक्षकांशी त्यांचा परिचय झाला. शिक्षक रविवारी पुण्यात वडिलांना भेटायला येताना वानवळा म्हणून दोन किलोची तांदुळाची पिशवी घेऊन यायचे. १५७ नंबर जातीचा तो सुवासिक तांदूळ असायचा. मुळशीला गेल्यावर कधी आंबेमोहोर तांदूळ मिळाला तर वडील येताना विकत घेऊन यायचे. त्याकाळी आंबेमोहोर तांदूळ घरात शिजवला तर त्याचा घमघमाट लपून रहात नसे.
कालांतराने जुनी किराणा दुकानं जाऊन चौकाचौकात सुपर मार्केट उभी राहिली. ‘बालाजी’ या परवलीच्या शब्दांनं मार्केट यार्डच्या शाखा ठिकठिकाणी दिसू लागल्या. एकाच तांदळाचे विविध प्रकार तिथे मिळू लागले. आंबेमोहोरचं पोतं लांब कोपऱ्यात गेलं आणि बासमती, बासमती दुबार, मोगरा, परिमल, सुरती कोलम, एचएमटी कोलम, वाडा कोलम, जिरेसाळ, कालीमूछ, डॅश, सोना मसूरी, सुगंधी चिनोर, दिल्ली राईस, इंद्रायणी, असे असंख्य प्रकार पुढे आले.
पूर्वी सणासुदीलाच बासमतीचा वापर केला जात असे. आता सर्रास नेहमीच्या जेवणातही बासमतीचा वापर होऊ लागला. काही मोठ्या दुकानांतून तांदूळ महोत्सव आयोजित केला जातो. तेथून वर्षभरासाठी तांदूळ खरेदी होते. काहीजण खेडशिवापूरच्या आठवडे बाजारात जाऊन शेतकऱ्याकडून इंद्रायणी तांदूळ खरेदी करतात.
इंद्रायणीची पारख करणे हे सर्वांनाच जमते असे नाही, कारण कित्येकदा साध्या तांदळावर इंद्रायणीच्या वासाचा स्प्रे मारलेला असू शकतो. इंद्रायणी भात खाण्याची एकदा का सवय लागली की, दुसरा कोणताही भात नकोसा वाटू लागतो.
एक गोष्ट खरी आहे की, भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. कोणत्याही प्रकारचे जेवण असो, त्यांची भैरवी ही भातानेच व्हायला हवी. एकदा का भात खाऊन झाला की, जेवणाचा पूर्णविराम होतो. त्यानंतर कितीही आवडीचा पदार्थ समोर आला तरी खाण्याची इच्छा होत नाही.
स्वयंपाक करणारी स्त्री ही जर का सुगरण असेल तर ती भाताचे विविध प्रकार करुन वाढते. मग तो नारळी पौर्णिमेला केलेला नारळीभात असेल, कधी सणासुदीच्या निमित्ताने केलेला मसाले भात असेल, कधी टोमॅटो भात, कधी विविध भाज्या वापरुन केलेला व्हेज पुलाव असेल, मटारच्या सीझनमध्ये मटार पुलाव असेल तर कधी जिरा राईस! कधी संध्याकाळी कुणाला फारशी भूक नसेल तर मूग डाळ खिचडीचा बेत करुन भागवलं जातं. भाताची ही विविध रुपे सर्वांनाच मनापासून आवडतात.
कधी रात्रीचा भात राहिला असेल तर त्याचा दुसऱ्या दिवशी केलेला फोडणीचा भात खायला तू तू मी मी होतंच. कधीकाळी केलेला दहीभात खाताना जो आनंद मिळतो त्याला पंचपक्वांनांची सर येणार नाही. दहीभात खाताना तोंडी लावायला कारळ्याची चटणी किंवा कोणतीही भाजी असेल तर ‘क्या बात है’
आता अनेक पाकशास्त्राच्या पुस्तकांतून व्हेज बिर्याणी हा प्रकार घरोघरी होऊ लागलेला आहे. बिर्याणी मसाल्याची पाकीटे बाजारातून आणून महिन्यातून एकदा तरी व्हेज बिर्याणीचा बेत केला जातो. सोबत कोशिंबीर असेल तर बिर्याणीवर मनसोक्त ताव मारला जातो.
घरातील दोघेही नोकरी करणारे असतील तर अलीकडे व्हेज बिर्याणी किंवा पुलाव घरी करण्याऐवजी ऑनलाईन ऑर्डर करुन मागवला जातो. ऑर्डर केल्यानंतर तासाभरात पदार्थ घरपोच येतो. हाॅटेलमधील ते मसालेदार खाणे पोटातील जागा भरुन काढते, मात्र भूक काही भागत नाही. खाण्याचं मनसोक्त समाधान त्या खाण्यातून मिळत नाही.
पूर्वी गोळ्यामेळ्याने जेवणात आनंद होता. ‘अंगत पंगत’ तर आता इतिहासजमा झाली आहे. आता विभक्त कुटुंबपद्धतीत टीव्ही समोर बसून हातात डिश घेऊन जेवण केलं जातं. मग समोर काय वाढलंय याकडे कुणाचंच लक्ष नसतं. मग तो भात असो वा पुलाव.
इंग्रजीत भाताला ‘राईस’ म्हटलं जातं, तो राईस नव्हे तर खऱ्या अर्थानं ‘रईस’ म्हणजे ‘श्रीमंत भात’ आहे.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२९-३-२१.
भाताचे किती छान वर्णन केले आहे ! लेख आवडला.