भारतीय संगीतातील कलासंगीत या अत्यंत महत्वाच्या कोटीत रागसंगीताचा समावेश होतो. रागसंगीताचा इतिहास किंवा उगमस्थान शोधणे जवळपास अशक्य स्वरूपाचे जरी असले तरी पारंपरिक मौखिक शिक्षण पद्धतीने अनेक रंग बादलीत आजच्या टप्प्यावर रागसंगीत येऊन पोहोचले आहे. रागसंगीताची सुरवात ही “धृपद-धमार” पासून सुरु झाली असे अनेक संस्कृत ग्रंथांचा आधार घेऊन अनुमान काढता येते परंतु रागसंगीत नेमके कुठल्या टप्प्यावर उत्क्रांत झाले या विषयी अनेक मतभेद आहेत. आज जरी अमीर खुसरोच्या नावावर रागसंगीताचा जनक म्हणून नोंद मिळत असली तरी त्यात बरेच मतभेद आढळतात.
अर्थात रागसंगीताचे शास्त्र मात्र, नारद मुनींनी निर्माण केले याविषयी प्रत्यवाय नाही पण त्याचा निर्माणकाळ हा इ.स.पूर्व २२ ते ८०० इतकामागे जातो!! परंतु याबाबतीत बाराव्या शतकात अवतरलेला “संगीत रत्नाकर” – शारंगदेव, हा ग्रंथ इतकी वर्षे झाली तरी प्रमाणभूत मानला जातो. अर्थात त्यावेळी ध्रुमद-धमार गायन पद्धत प्रचलित होती. आजच्या रागसंगीतावर मात्र पंडित भातखंडे यांच्या विचारांचा पगडा जास्त आहे. तेंव्हा अशी अनेक स्थित्यंतरे घडत, आजच्या घडीला रागसंगीत आपल्या समोर आले आहे. माझ्या यापुढील लेखात याच अनुषंगाने मी रागांचे विवरण केले आहे आणि तसे करताना रागसमय हा पारंपरिक दृष्टीनेच विचारात घेतला आहे. लेख लिहिताना, रागाच्या शास्त्रातील “जटिल” भाग वगळून, काहीसे ललित स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे तरी देखील काही तांत्रिक बाबी आवश्यक असतील तेंव्हाच दिल्या आहेत. आशय, आपल्याला ही लेखमाला आवडेल.
— अनिल गोविलकर
Leave a Reply