आयुष्य जगतांना खूप काही “राहिलंच” ही खंत आयुष्यभर राहाते. अगदी लहानपणापासून काहीतरी राहून गेलेलं असतं. कुणाचं गोट्या खेळायचं राहिलेलं असतं तर कुणाचं गिल्ली दांडू खेळायचं, कुणाचं शाळेला दांडी मारायचं राहिलेलं असतं तर कुणाचं वादविवाद स्पर्धेत भाग घेण्याचं.
शाळा सोडून कॉलेज ला गेल्यावर सुद्धा काहीतरी राहिलेलं असतं. कुणाचं कॉलेज कट्ट्यावर बसायचं राहिलेलं असतं तर कुणाचं प्रेमात पडायचं राहिलेलं असतं. कॉलेज बुडवून सिनेमा पाहायचं राहिलेलं असतं किंवा सायकल वर बसायचं देखील राहिलेलं असतं.
हे सगळं “राहिलेलं” राहिलेलं असतं ते कधी दडपणामुळे तर कधी परिस्थिती मुळे. पण जेव्हा मोठेपणी राहून जातं ते मात्र सर्वस्वी स्वतः मुळेच राहिलेलं असतं. याचे खापर फोडायला जेंव्हा वय, परिस्थिती, दडपण कामी येत नाही तेंव्हा मात्र नाईलाजाने स्वतः वर घेणं भाग पडतं ! इथे दुबळ्या मदतीला येतात ते वेळ, Ego, स्टेटस, वय किंवा जवाबदारी.
आपण आपल्या कार मध्ये बसून कुठल्याश्या ग्रामीण भागात जातो, तिथे कुणाकडे तरी जाण्या साठी रस्ता नसतो मग कार मधून उतरून पायी जात असतो, रस्त्यात मुलं गिल्लीदांडू खेळत असतात, आपल्याला आठवण होते आबक-दुबक-तिबक ची ! खेळावं वाटतं पुन्हा स्टेटस परवानगी देत नाही. मग राहून जातं….
आपण अधिकारी आहोत, आपल्याकडे काम घेऊन किंवा हाताखाली काम करणारा शाळेतला मित्र असतो, त्याला जवळ घेऊन गप्पा मारायच्या असतात पण आडवा येतो Ego. आपली बदली होते, बदलीच्या ठिकाणी जॉईन होतो आणि लक्षात येतं, गप्पा मारायचं राहिलंच……
रस्त्याने जातांना एखाद्या लग्नाची वरात जात असते, आपल्या तरुणपणीच गाणं वाजत असतं, गाडीतून उतरून त्या ‘बेगानी शादी’त ‘दिवना’ होऊन नाचावं वाटतं पण आडवं येतं ते वय ! गाडी पुढे आणि वरात मागे जाते तेंव्हा लक्षात येतं, नाचायचं राहिलंच……
मोठे होतो, कामं वाढतात, वेळ पुरत नाही काहीच करण्यासाठी, मग उरकून घ्यायचं असतं सगळं, याच गडबडीत कधी तरी नकळत प्रेमात पडतो. सुरुवातीला बरं वाटतं ते आल्हाददायक. हळू हळू हे आल्हाददायक आल्हाद’दाहक’ कधी होतं हे समजतच नाही. प्रेमाची दाहकता ब्रेकअप पर्यन्त पोचते. वेळेअभावी संभाव्य ब्रेकअप टाळू शकत (कधी कधी इच्छित शुद्ध) नाहीत. घाईघाईने ब्रेकअप चा मुहूर्त ठरतो. वेळ आणि तारीख निश्चित होते. वेळेत पोचतो. तक्रारींची आणि आरोपांची देवाणघेवाण होते. ठरल्या प्रमाणे ब्रेकअप with कॉफी. होतो सुद्धा. घड्याळ पाहून निघू का? विचारतो……
आणि टॅक्सीत बसल्यावर लक्षात येतं, सालं, एकदा मिठी मारून पोटभर रडायचं “राहिलंच….”
तर हे “राहिलंच” कधीच राहू देऊ नका. काही राहिलेल्याला पुन्हा संधी मिळते पण काही “राहिलेलं” पूर्ण आयुष्यात कधीच परत येत नाही. ते राहिलेलं राहूनच जातं, कायमचं…
तळ टीप :- तीन वर्षांपूर्वी माझे नाना(वडील) गेले. त्यांचा देहदानाचा संकल्प मलाच पूर्ण करायचा होता, मेडिकल कॉलेज 80km दूर. मृत्यू नंतर 6 तासांच्या आत मला त्यांना ‘घेऊन’ पोचायचं होतं म्हणून जेमतेम दिडतासच घरात ठेवून निघालो होतो. जवाबदारी होती न ती माझी, आणि माईची सुद्धा जवाबदारी माझीच !
पर्यायाने, नानांच्या छातीवर पडून ओस्काबोक्शी रडायचं, राहिलंच….
विनोद डावरे, परभणी
##सहजच सुचलं- 83
Leave a Reply