नवीन लेखन...

राहुल देशपांडे

राहुल देशपांडे यांचे आजोबा पं वसंतराव देशपांडे हे संगीत रंगभूमीवरचे नावाजलेले व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म १० आक्टोबर १९७९ रोजी झाला. श्री. राहुल देशपांडे यांनी आजोबांच्या गायकीचा वारसा समर्थपणे पेलला आहे. राहुल देशपांडे यांच्यावर संगीताचे संस्कार जन्मापासूनच जरी होत असले तरी खरा संगीतप्रवास वयाच्या सहाव्या वर्षापासून सुरु झाला. सहाव्या वर्षापासून पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे पठडीबाज तालमीला सुरुवात झाली. सुरुवातीला सगळ्या मुलांना शास्त्रीय संगीताचा कंटाळा असतो तसा राहुलना ही होता. त्यावेळी आई-वडील पाठवतात म्हणून क्लासला जायचे असे चालले होते. नंतर गाण्याचा कंटाळा आला म्हणून त्त्यांनी एक वर्ष गाण बंद ठेवले. त्याच सुमारास १९९२ साली कुमार गंधर्वांचे निधन झाले आणि त्यानंतर दोनच महिन्यांनी राहुलजींच्या वडीलांनी इंदौरहून कुमारजींच्या भजनाची कॅसेट आणली. एक दिवस घरातले सगळे बाहेर गेले असताना काहीच काम नाही म्हणून राहुलजींनी कॅसेट लावली आणि त्या सुरांनी त्यांना अक्षरशः झपाटून टाकले. दोन दिवसात त्यांनी सगळी भजनं पाठ केली. त्यावेळी पहिल्यांदाच कुमारांच्या गायकी बद्द्ल ओढा त्यांच्या मनात निर्माण झाला.

त्यानंतर उषाताई चिपलकट्टी यांच्याकडे सहा वर्ष शिकायला मिळाले. उषाताईंकडचे शिक्षण आव्हानात्मक होते. विचार तयार करणे हे उषाताईंकडे घडले आणि बुध्दी तयार झाली. त्यानंतर मुकुल शिवपुत्र यांच्याकडे सहा-सात वर्ष शिकायचा योग आला. तिथला अनुभव फ़ारच निराळा होता. ज्याला दिशा देणं म्हणतो ते तिथे झाले. सुरांकडे, रागांकडे बघण्याचा दृष्टीकोन मुकुल शिवपुत्रांनी दिला. राहुलजींच्या मते गुरुंकडे शिकत असताना काय घेतलं हे सांगता येत नाही पण जे मिळतं तो एक अनुभव असतो आणि तो अतिशय व्यक्तिगत असतो. पिंपळखरेबुवांकडे शिकताना पठडीबाज तालमीचा कंटाळा यायचा पण नंतर लक्षात आले की आपण जे काही शिकलो त्यावरच आपण उभे आहोत. आपल्या सांगितीक जीवनात सर्वच गुरुंचे खूप महत्वाचे योगदान आहे असे ते मानतात.

त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी अजून एक व्यक्ती म्हणजे पु. ल. देशपांडे. पुलंचा फ़ार मोठ पगडा राहुलजींवर होता. पुलं दरवर्षी राहुलजींचे गाणं ऎकायला यायचे. असेच एकदा पुलं आले असताना राहुलजी सगळ्या कुमार गंधर्वांच्या बंदिशी गायले. राहुलजींच्या घरात सगळेच कुमारभक्त होते. पण त्यावेळी राहुलजींची आई, पुलंना म्हणाली की हा कुमार काकांसारखा गातो यात आनंद आहे पण हा बाबांसारखा(वसंतरावांसारखा) गात नाही याची कुठेतरी खंत आहे. तेव्हा पुलं म्हणाले की आत्ता तो कुमारसारखा गातो आहे ना! आवाज फ़ुटू दे!

मग तो आपोआप वसंतासारखा गाईल. आणि झालं ही तसेच. आवाज फ़ुटल्यावर राहुलजींचा आवाज खूप आजोबांच्या जवळ गेला आणि मग ते जे काही गायचे तेव आजोबांसारखे ऎकू यायला लागले. नंतर सुरताल हया कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी वसंतरावाची गाणी बसवली आणि ती लोकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर त्यांनी आजोबांच्या गायकीचा मागोवा घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना ते गाणं हळूहळू उलगडू लागले. अजूनही ते संपूर्णपणे उलगडलेले नाही असे त्यांना वाटते. कॉलेजमध्ये असताना CA foundation पास झाल्यावर आर्टिकल्स सुरु असताना ते पुलंना भेटायला गेले. पुलंची तब्येत त्यावेळी बरीच खालावली होती. पुलंनी जवळ बोलावून विचारले की तू असा बारीक का झाला आहेस? तेव्हा राहुलजींनी सांगितले की कॉलेज, क्लास आणि रियाझ या सगळ्या गोष्टी सांभाळताना खूप दगदग होते. तेव्हा पुलंनी विचारले की तू स्टेशनपासून घरापर्यंत जातोस तेव्हा तुला डॉक्टर्स, आर्किटेक्टस, इंजिनीयर अशा खूप पाट्या दिसत असतील पण गायक अशी पाटी दिसते का? नाही ना? मग तुला अशी पाटी लावायची आहे. त्यामुळे तू गाण्याकडे लक्ष दे.

मग राहुलजींनी घरच्यांशी सल्लामसलत केली आणि पूर्णवेळ गाण्यासाठी द्यायचे ठरविले. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. रियाज हा अतिशय महत्वाचा आहे असे ते मानतात. गाणं ही एक-दोन वर्षात येणारी कला नाही. त्यासाठी अनेक वर्ष कष्ट घ्यावे लागतात. पण जसेजसे तुम्ही रियाज करत जाता तसे रियाजच तुम्हाला फ़ळ देतो. सुरुवातीच्या काळात ठराविक वेळ रियाज झाला नाही तर जेवायचे नाही असे बंधन त्यांनी घालून घेतले होते. आजही त्यांच्या अतिशय व्यस्त अशा दिनचर्येतून वेळ काढून ते ठराविक वेळ रियाजासाठी देतात. सुरुवातीच्या काळात ते जेव्हा कुमारजींच्या बंदिशी, भजनं सादर करायचे त्यावेळी नागपूरला त्यांचा कार्यक्रम झाला होता. तिथेही त्यांनी कुमारजींच्या बंदिशी आणि भजनम सादर केली आणि दुसर~या दिवशी पेपरमधे बातम्या आल्या की नातू वसंतरावांचा पण गायकी कुमारांची. त्यावेळी थोडे वाईट वाटले असे त्यांनी सांगितले. पण आता ते वसंतरावांची गायकी लोकांपर्यंत पोहचवत आहेत याचा त्यांना अभिमान आहे. वसंतरावांची गायकी लोकांना आवडते आणि ती त्यांच्यामार्फ़त लोकांपर्यंत पोहचते आहे.

गेली अनेक वर्षे ते वसंतोत्सव हया कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. त्यांचे वडील दरवर्षी वसंतरावांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्यक्रम करायचे. वसंतरावांवर प्रेम करणारे कुमार गंधर्व, भीमसेन, वीणाताई, अभिषेकी असे अनेक कलाकार त्यात गाऊन गेले होते. २५ वर्षे झाल्यावर वडीलांनी सांगितले की मी आता निवृत्त होत आहे. यापुढे तू तुला पाहिजे त्या पध्दतीने कार्यक्रम कर. वसंतरावांचे जसे व्यक्तिमत्व होते त्याला साजेसाच कार्यक्रम व्हावा असे राहुलजींना वाटत होते. नाना पाटेकर आणि वसंतरावांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे राहुलजी पाटेकरांना भेटले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण्याचा प्रस्ताव पाटेकरांनी लगेच स्वीकारला आणि कायम पाठीशी उभे राहिले. मा. वसंतराव देशपांडे गझल गायचे चित्रपटातही गाणी त्यांनी गायली आहेत. शास्त्रीय,ठुमरी, नाट्यसंगीत तर ते गायचेच पण लावणीही उत्तम सादर करायचे. पाश्चात्य आणि दक्षिण भारतीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. ते नृत्य शिकले होते. उत्तम अदा करायचे. त्यामुळे राहुलजींनी ठरविले की अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या स्मृतीप्रीत्यर्थ फ़क्त शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम न करता सर्व प्रकारचे संगीत समाविष्ट असलेला कार्यक्रम करावा, त्यामुळे या उत्सवात गझल, फ़्युजन, शास्त्रीय संगीत, जुगलबंदी, लोकसंगीत, सूफ़ी संगीत असे विविध प्रकार लोकांना ऎकायला मिळाले.

युवावर्ग मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाकडॆ आकर्षिला गेला. आजोबांसारखेच हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेले राहुलजी समर्थपणे गेली काही वर्षे हा कार्यक्रम आयोजित करत आहेत. कट्यार काळजात घुसली आणि संशयकल्लोळ ही नाटके राहुलजींनी पुन्हा रंगमंचावर आणली. त्याविषयी सांगताना ते म्हणतात की लहान असताना कट्यार मधे छोट्या सदाशिवाचे काम त्यांनी केले होते. पण नंतर नाटकात काम करावे असे कधी वाटले नाही. वसंतोत्सवाच्या निमित्ताने पत्रकार परिषद चालू होती. तेव्हा एका पत्रकाराने विचारले की वसंतरावांनी संगीत नाटकांसाठी एव्हढे मोठे योगदान दिले तर तुम्ही संगीत रंगभूमीसाठी काय करणार? तर राहुलजी म्हणाले की मी दरवर्षी एक नाटक करीन. मग त्यावर विचार सुरु झाला आणि ’कट्यार काळजात घुसली’ करुन पहावे असे ठरले. सुरुवातीला हे आव्हान पेलू शकू की नाही अशी धास्ती होती. पण सगळयांनी प्रोत्साहन दिले आणि तालमींना सुरुवात झाली. सुबोध भावेंनी हे नाटक दिग्दर्शित केले. त्यांनी सल्ला दिला की मुस्लिम व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तू मशिदीत जाऊन बस आणि निरिक्षण कर. त्याप्रमाणे राहुलजींनी केले आणि त्यामुळे मी ती भूमिका प्रामाणिकपणे करु शकलो असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या मते नाटक ही एक नशा आहे.त्यामुळेच कट्यार नंतर तिथेच न थांबता त्यांनी संशयकल्लोळ करायला घेतलं. त्यावेळी मात्र अनेकांनी हे नाटक करु नकोस असा सल्ला दिला कारण संशयकल्लोळ हे खूप यशस्वी नाटक आधीही नव्हते. पण संशयकल्लोळ यशस्वी ठरले. त्यातील राहुलजींची भूमिकाही रसिकांना खूप आवडली जेष्ठ नागरिकांप्रमाणे युवा पीढीही ह्या नाटकाकडे आकृष्ट झाली.
त्यानंतर आला बालगंधर्व सिनेमा. या सिनेमासाठी रवी जाधवांनी राहुलजींना भूमिका करण्याविषयी विचारले. नाटक आणि सिनेमाचे तंत्र वेगळे असते आणि या चित्रपटात नाट्यगीत चित्रीत करायचे होते. पण सारेगमपच्या चित्रीकरणाचा अनुभव होता आणि त्यामुळे पेशन्स वाढला होता. त्याचा या चित्रपटाच्यावेळी फ़ायदा झाला.या चित्रपटासाठी स्टुडिओमध्ये १०-१५ मिनिटांचे गाणे चित्रीत झाले आणि नंतर एडिट करुन ते तीन मिनिटांवर आणले गेले.सारेगमपच्या वेळी काम करतानाही खूप मजा आली असे ते म्हणतात.

सतत नवीन प्रयोग करत रहाणे हा राहुल देशपांडे यांचा स्थायीभाव आहे.कुठलीही गोष्ट करताना खूप मेहनत घेऊन, अभ्यासपूर्वक करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांनी आत्तापर्यंत केलेले विविध प्रयोग पाहिले की जाणवतो.सध्या संगीताचे तंत्र खूपच बदलले आहे. त्यामुळे पठडीबाज शिक्षणाबरोबरच थोडेसे वेगळे प्रयोग आवश्यक आहेत असे त्यांना वाटते. प्रत्येक विद्यार्थी हा कलाकार बनू शकत नाही. तशी गरजही नाही. चांगला कलाकार चांगला समीक्षक असेलच असे नाही तसेच चांगला समीक्षक चांगला कलाकार असेलच असे नाही.

संगीतशिक्षणातून चांगले कलाकार, समीक्षक, संगीतकार तसेच चांगले जाणकार रसिक श्रोतेही निर्माण झाले पाहिजेत. केवळ गाणे आवडते म्हणून ऎकण्यापेक्षा त्याचे शास्त्र माहित झाले की ऎकण्यातली मजा अजून वाढते. राहुल देशपांडे यांनी भारतातल्या जवळजवळ सर्व नावाजलेल्या संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. तसेच परदेशातील रसिकांची ही वाहवा मिळवलेली आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार आणि सुधीर फ़डके पुरस्कार हे त्यातील काही प्रमुख. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सामान्यतः ज्या वयात कारकीर्दीला सुरुवात होते त्या वयात राहुल देशपांडे यांनी खूप यश मिळविले आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विराट गर्जना.कॉम

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..