महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांचा जन्म १७ मार्चला झाला.
आदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व राष्ट्रवादी पक्षाच्या युवा नेत्या आहेत. विशेष म्हणजे त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत. वयाच्या ३१ व्या वर्षीच त्यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी आली.
आदिती तटकरे यांचे शिक्षण बी.ए., मास्टर ऑफ आर्टस् व एम. ए. असून त्यांनी जयहिंद कॉलेजमध्ये २००२-२००९ या काळात प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच यूपीएससी परीक्षांसाठीही त्यांनी पर्यवेक्षक (सुपरवायझर) म्हणून काम केले. त्यांनी राजकारणात यायचं ठरवलं नव्हतं. वडील सुनील तटकरे राजकारणात असल्याने घरात राजकारणाचं वातावरण होतं. त्या वातावरणात वाढल्याने त्या आपोआप राजकारणात आल्या. त्यांना विलासराव देशमुख आणि शरद पवारांना अत्यंत जवळून पाहण्याची संधी मिळाली. शरद पवार हे त्यांचे राजकारणातील रोल मॉडेल आहेत.जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यापूर्वीपासून २००८ २००९ पासून आदिती राजकारणात सक्रिय आहेत.२००८-२००९ मध्ये आपल्या वडिलांच्या प्रचार सभेत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी श्रीवर्धन हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार झाला होता. २०११-२०१२ मध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत आदितींनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. २०१२ पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम करत आहेत. फेब्रवारी २०१७ मध्ये रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या पहिल्यांदा विजयी झाल्या. मार्च २०१७ मध्ये त्यांची रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पाहिलं. २०१९ मध्ये श्रीवर्धनमधून आमदार म्हणून विजयी झाल्या.
आदिती तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या विषयीच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या.मी शाळेत असताना वर्गात कमी वर्गाच्या बाहेर अधिक राहणारी विद्यार्थीनी होते. पण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये क्रियाशील होत, असं त्यांनी सांगितलं होतं.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply