रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या पहिला प्रयोगाला ६० वर्षे झाली. या नाटकाचा २६ ऑक्टोबर १९६२ रोजी पहिला प्रयोग झाला.
मराठी रंगभूमीवर प्रा.वसंत कानेटकर हे नाटककार म्हणून उदयास आले ते ‘वेडय़ाचं घर उन्हात’मधून! ‘देवांचे मनोराज्य’, ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही नाटके पीडीएमार्फत रंगमंचावर आली. पण ती हौशी रंगभूमीवरील नाटकांच्या स्वरूपात. वसंत कानेटकरांचे व्यावसायिक आणि तरीही प्रयोगशील नाटककार हे स्वरूप सिकांना अजून दिसायचे होते. तो मणिकांचन योग जुळून आला ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटय़प्रयोगाने! – दि गोवा हिंदू असोसिएशन – कला विभाग- मुंबई या संस्थेतर्फे शुक्रवार दिनांक २६ ऑक्टोबर १९६२ रोजी रात्री ८.३० वाजता भारतीय विद्याभवन, चौपाटी, मुंबई येथे ‘रायगड’चा शुभारंभाचा प्रयोग सादर झाला. ‘सह्य़गिरीच्या कुशीत निजल्या रायगडा हो जागा, शिवरायांच्या हृदयांतरीचे शल्य मला सांगा’. रायगडाच्या भूपाळीच्या सुरावटीत रंगमंचावरील दर्शनी पडदा दूर झाला. रंगमंच प्रकाशला. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगृहातील महाल दिसू लागला आणि पुढील तीन-साडेतीन तासांत छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे यांच्या मानसिक संघर्षांचा पट उलगडू लागला. छत्रपती शिवरायांच्या अखेरच्या पर्वात त्यांना सोसाव्या लागलेल्या गृहकलहाचं आणि त्यापायी त्यांना ग्रासून राहिलेल्या विषण्णतेचं भावव्याकुळ करणारं चित्र म्हणजे वसंत कानेटकरांचं ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक होय!
या नाटकाचा प्रारंभ शके १५९८ (इ.स. १६७६) कार्तिक मास, शुद्ध पक्ष नोव्हेंबर महिन्यातल्या एका उष:काली होतो आणि नाटकाची अखेर शके १६०२ (इ.स. १६८०) आषाढ, जुलै महिन्यातील एका संध्याकाळी घडते. इतिहासाच्या या अवघ्या चार वर्षांच्या कालखंडात या इतिहासातील अजरामर व्यक्तींच्या- छत्रपती शिवाजीराजे आणि युवराज संभाजीराजे यांच्या- जीवनात किती वादळे घोंगावली आणि काळपुरुषाने एका शोकांतिकेचा कसा घाट निर्माण केला याचे दर्शन प्रेक्षकांना घडते. अवतारतूल्य कार्य करणारी पितापुत्रांची ही जोडी म्हणजे अखेर ‘माणसे’च होती. वसंत कानेटकरांनी या थोर पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वामधून आणि विविधरंगी प्रसंगातून माणूस शोधण्याचा प्रयत्न केला. मराठी नाटय़सृष्टीत हा असा पहिलाच प्रयोग असावा. कानेटकरांनी तो लिहिला आणि धि गोवाच्या रंगमंचावरील आणि आतील कलाकारांनी तो यशस्वीपणे पेलला. प्रयोगशील, यशस्वी व्यावसायिक नाटककार हे ‘बिरुद’ वसंत कानेटकरांनी भूषविले. ‘रायगड’ला अमाप यश मिळाले. प्रसिद्धी मिळाली, लौकिक मिळाला, या गोष्टी जरी ऐतिहासिक सत्य असल्या तरी ‘रायगड’चे लेखन करताना प्रा. कानेटकरांनी केलेली तपश्चर्या खरोखरीच कौतुकास्पद आणि अनुकरणीय अशीच आहे. ‘रायगड’ नाटकाच्या पुस्तकात कानेटकर लिहितात- ‘आता ये मऱ्हाष्ट राज्यात छत्रपतींचे नाटक रचिलें जावें ही स्वामींची इच्छा. मनोरथ पूर्ण करणे हे तो श्रींचे हाती. त्येनिमित्य बालके अवघी हिंमत धरोन साल दोन साल बहुतप्रकारे कष्ट घेतले. लहानथोर ग्रंथ वाचिले, नवे-जुने दप्तर धुंडाळिले, खलिते तपासिले, जेणेकरून ये नाटय़रचनेस भलाई लाभेल ते ते सर्व केले.. एखाद्या नाटय़विषयाने झपाटून जाणे आणि तो सिद्धीस नेण्यासाठी जिवाचे रान करणे म्हणजे काय याची प्रचिती या मजकुरावरून येते.
मानवी सुखदु:खाची सूक्ष्मता, स्वभावातील अन्तर्विरोध आणि जीवनदर्शनातील भेदकता इत्यादी गुणांचा आविष्कार नाटय़माध्यमातून करता येत नाही. तो प्रांत आपला नव्हे असे मानणारे वसंत कानेटकर बघता बघता नाटय़माध्यमांच्या प्रेमात पडले आणि विविध विषयांवरील (ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक, कौटुंबिक) आणि विविध रसातील नाटय़कलाकृती लिहू लागले.
रायगडाला आणि ते नाटय़ निर्माण करणाऱ्या नाटककार प्रा. वसंत कानेटकरांना मानाचा मुजरा! तुम्हा तो सुखकर हो शंकर! धी गोवा हिदू असोसिएशन‘च्या या संस्थेनं या नाटकाचे ६६६ प्रयोग केले. त्यानंतर हे नाटक थांबलं. मास्टर दत्ताराम यांनी ‘रायगड’च्या शेकडो प्रयोगांत शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. पन्नास वर्षांच्या वाटचालीत या नाटकाने फक्त दोन शिवाजी पाहिले. पहिले दत्ताराम आणि दुसरा शिवाजी म्हणजे अविनाश देशमुख आणि ते आजही करत आहे. मात्र संभाजीची भूमिका अनेकांनी साकारली. सर्वात गाजली ती अर्थातच डॉ. काशीनाथ घाणेकरांची. पण सुमारे ८० प्रयोगांनंतर घाणेकरांनी संभाजीची भूमिका सोडली आणि त्यानंतर अनेक अभिनेत्यांनी संभाजीची भूमिका साकारली. १९८४ साला पासून पुण्यातल्या “सीमान्त‘ या संस्थेतर्फे त्याचे प्रयोग सुरू आहेत. नाटकाचे निर्माते आणि शिवाजी महारांजाची भूमिका करणारे अविनाश देशमुख गेली अनेक वर्षं एका श्रद्धेनं हे नाटक करत आहेत. या नाटकानं देशमुखांना वेगळी ओळख तर मिळालीच; पण सर्वांत मोठी गोष्ट लाभली, ती म्हणजे या नाटकाचे लेखक, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांचे आशीर्वाद. हे नाटक पाहून कानेटकर यांनी समाधान व्यक्त केलं होतं, हीही देशमुख यांची मोठी कमाई. नाटककाराला जे हवं होतं, ते प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात देशमुख शंभर टक्के यशस्वी तर झालेच; पण लेखक आणि समीक्षकांनीही या नाटकाच्या सादरीकरणावर या नाटकाच्या आधीच्या प्रयोगानंतर घेतलेले आक्षेप मागे घेतले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / श्रीराम रानडे / विनायक लिमये
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply