नको रायगडा, तू रडू नकोस
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
शिवस्पर्शाची पावन धूळ मी मस्तकी लावताना
तू विषण्णपणे हसला होतास
अन् काळजाला हात घातल्यागत तुझी जखम वाहू लागली
तुझ्या तोंडच्या शिवकथा ऐकताना
ढासळणारी मातीही जीव गोळा करुन थांबली होती
गादीवरच्या खादीमध्ये गहाणलेली मराठी अस्मिता
पाहून तू वेडापिसा झाला होतास
तुझ्या असहाय नजरेत तरळणाऱ्या अश्रूंना
केवळ मीच साक्षीदार होतो
पण नको, रायगडा तू रडू नकोस
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
डोळ्यांत घुमारे, गळा दाटलेला नि मी निर्धारलो
धुमसती आग ‘हरहर महादेव’ नाही अजूनी विझली
पवित्र तुझ्या मातीशपथ ती मी जागवीन
निद्रिस्त निखाऱ्यावरील राख प्राणपणाने फुंकीन
शिंपणाने रक्ताच्या, स्वाभिमान मराठी फडकत ठेवीन
अन् तुजवरला एक पत्थर जिवंत पाहून तू कृतार्थलास
आतातरी रायगडा, तू रडू नकोस
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
न पाहवे बेईमानी पिढीची तुझ्याच, तुझ्याशी
न साहवे तुला मराठी रक्ताची उदासीनता
तुला जाणवे नाद टापांचा अजूनी
व्याकुळसी तू भारावसी फिरुनी फिरुनी
जिथे नित्यनेमे मिरवलेस पाऊल भाळी जयाचे
कुठे स्मरण कोणा इथे त्या महामानवाचे
तुझ्या वृद्ध डोळ्यांत अजून साकारे
तुला न अप्रूप ना अपूर्वाई तीनशेव्या सोहळ्याची
शल्य तुझे असावे- कारण तुला ठावे
पुनः स्मरणासाठी अजून वर्षे तीनशे जावयाची
पण आता आश्वस्त रायगडा तू रडू नको
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
— यतीन सामंत
Leave a Reply