रेल्वेच्या विस्तारामुळे मालाच्या देशांतर्गत वाहतुकीत प्रचंड प्रमाणात वाढ होत गेली असून, त्याचा आलेख दिवसेंदिवस चढताच आहे. त्याचबरोबर परदेशांशी होणारी आयात व निर्यात यांतही भरघोस भर पडलेली आहे. शेतीच्या अर्थव्यवस्थेत तर क्रांतीच घडविली गेली. रेल्वेद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीमुळे देश प्रगतीच्या वाटेने चालू लागला व त्यामुळे आज भारत स्वत:च्या पायांवर खंबीरपणे उभा आहे.
आसाममधील चहा व ज्यूट; राणीगंजमधील कोळसा; उत्तरप्रदेश व महाराष्ट्र यांत बनणारी साखर; पंजाब, हिमाचल प्रदेशातली फळं; अशा अनेक गोष्टींचं वितरण भारतभर करणं आता सहजपणे शक्य झालं आहे. सर्वांत स्वस्त आणि खात्रीची अशी पोस्ट योजना व पार्सल्स भारताच्या कानाकोपऱ्यांतील दुर्गम जागी रेल्वेमुळेच पोहोचू शकतात. नवीन तयार होणाऱ्या मोटारी, दुचाकी वाहनं, थेट प्रत्येक प्रांतातील गावांपर्यंत पोहोचतात.
रेल्वेमुळे दुष्काळाच्या वेळी अन्नधान्याचा त्वरित पुरवठा तर होतोच, परंतु काही वेळा पाणी सुद्धा पोहचवलं गेलं आहे. सन २०१६ मध्ये लातूर (मराठवाडा) येथे रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला.
डिझेल, पेट्रोल, तसेच थंडगार दुधाचे कंटेनर्स घेऊन मालगाडीचे डबे सतत धावत असतात. मेल एक्सप्रेस गाड्या धावत असताना काही वेळा मालगाड्यांना बराच वेळ खोळंबून ठेवलं जातं. एखादी मालगाडी जर प्रवासीगाड्यांना थांबवून ठेवून पुढे काढली गेली तर प्रवासी किती अस्वस्थ होतात! परंतु खरं पाहता रेल्वेचं ५५ ते ६० टक्के उत्पन्न या मालवाहतुकीमधूनच मिळत असत. युद्धकाळात तर मालगाडी आपल्या सैन्याची जीवनवाहिनीच असते.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply