अमृतसर येथे रेल्वेच्या खाली येऊन अनेक लोक चिरडले गेले. रात्री अंधार झालेला होता, रेल्वे लाईनवर गाड्यांची ये-जा होती, तरी लोक रेल्वे लाईनवर उभे होते. रावण दहन आणि गाडीचे येणे एकत्र घडले. लोकांना फटाक्यांच्या आवाजात गाडीची शिटी ऐकू आली नाही आणि अपघात झाला. या भयावह अपघातासाठी एका दुसर्यावर दोषारोपण हि सुरु झाले. पण खरे कारण काय आहे, या बाबत सर्वच मौन आहेत.
पहिले कारण आपली शिक्षण व्यवस्था. आपल्या देशात शालेय शिक्षण म्हणजे ‘रटंतु विद्या’. शाळेत विध्यार्थींना अनुशासित रीतीने कायद्याचे पालन करणे शिकवलेच जात नाही. विदेशात स्थानांतरीत झालेल्या एका नातलगाचा फोन आला. त्यांनी आपल्या मुलीला पहिल्या वर्गात टाकले होते. तिथे त्याच्या मुलीला पहिल्याच दिवशी वर्गातील मुलांना एका लाईनीत वर्गाचा बाहेर आणण्याचे काम दिले. वर्गातील प्रत्येक मुलाला आळीपाळीने हे कार्य करावे लागते. छोटेसे उदाहरण बोलके आहे. शाळेत पहिल्यादिवशी पासून अनुशासन काय असते, हे मुलांना शिकविले जाते.
दुसरे मुख्य कारण, व्यवस्थेला कायद्याचे पालन जनते कडून करवून घ्यायचे असते, याचे भानच नाही. फक्त मोठा गुन्हा घडला कि व्यवस्थेला जाग येते. रस्त्यावर थुंकणार्यांवर, कचरा फेकणार्यांवर हेल्मेट न घालता बाईक चालविणार्यांवर क्वचितच कायद्याची कार्रवाई होते. रेल्वे फाटकावर तर विचित्र परिस्थिती असते. फाटक बंद झाल्यावर हि बाईक व सायकल वाले, पायी चालणारे रेल्वे लाईन क्रास करत राहतात अगदी गाडी जवळ येत पर्यंत. जिथे फाटक नसेल तर आपले वाहन गाडीपेक्षा जास्त वेगात चालते, हे दाखविण्याचा प्रयत्न वाहन चालक करतात. परिणाम दरवर्षी हजारो लोक मरतात. पादचारी मार्गावर दुकानदारांचे अतिक्रमण, रेल्वे लाईनच्या किनार्यावर अवैध बनलेल्या झुग्गी वस्त्या इत्यादीवर कधी व्यवस्थेची कार्रवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
सुरक्षा नियमांप्रती अनास्था हे तिसरे प्रमुख कारण. कुठला हि कार्यक्रम असो, सुरक्षा नियमांचे पालन केले पाहिजे, याची जाणीव कुणालाच नसते. कार्यक्रम सुरु होण्या अगोदर, त्या जागेतून सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग कोणते, दुर्घटना झाल्यास काय करावे, याचे मार्गदर्शन कधीच केले जात नाही. शाळा असो व कालेज, नौकरीच्या जागी- सरकारी असो वा निजी, साधी आग विझवण्याचे ज्ञान सुद्धा कुणालाच दिले जात नाही. एवढेच काय कमी, जेथून सरकारचा कारभार चालतो, अश्या इमारतीत हि सुरक्षा नियमांना डावलून इमारतीच्या आत अनेक अवैध निर्माण केले जातात. इमारत अग्नी पासून सुरक्षित आहे, याचे प्रमाण पत्र अनेक इमारतींच्या संदर्भात नाही. कधी आग इत्यादी लागली तर कर्मचारीच नव्हे तर मंत्र्यांचे जीव सुद्धा धोक्यात येतील अशी अवस्था आहे. पण कुणालाच चिंता नाही.
आपल्या देशात आज अशी पिढी निर्माण झाली आहे, जी कुठल्याही कायद्याचे व नियमांचे पालन करत नाही. या पिढीला स्वत:च्या जीवाची सुद्धा चिंता नाही. परिणाम एकच, अश्या दुर्घटना होत राहतील. राजनेता एका-दुसर्यावर खापर फोडत राहतील. कुणाला तरी दोषी ठरवून, त्याच्यावर कार्रवाई होईल. मुख्य कारण दूर करण्याचा प्रयत्न कुणीही करत नाही.
— विवेक पटाईत