नवीन लेखन...

रेल्वे आणि मुंबईचा डबेवाला

रेल्वेचा पगार घेणारे रेल्वेचे कर्मचारी हा जितक्या सहजतेनं कुतूहलाचा विषय होतो, तेवढ्याच सहजपणे रेल्वेशी अतूटपणे बांधले गेलेले मुंबई शहराचे डबेवाले, रेल्वेतले फेरीवाले, लाल डगलेवाले हमाल, प्लॅटफॉर्मवरची निराधार मुलंमुली यांच्या आणि रेल्वेच्या नात्याबद्दलही कमालीची उत्सुकता वाटते. या लोकांचं जगं, त्यांचे व्यवसाय रेल्वे’शिवाय अगदी कोलमडून पडतील असे असतात आणि म्हणून वेगळ्या अर्थाने ही मंडळी रेल्वेची मंडळी’ असतात. यापैकी ‘मुंबईचा डबेवाला’ हे व्यवस्थापनशास्त्रातलं नेमकं उदाहरण.

जगप्रसिद्ध असलेला हा ‘मुंबई शहरातील डबेवाला’ म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरापासून त्याच्या जेवणाचे डबे त्याच्या कामाच्या जागी घेऊन जाणारी अत्यंत योजनाबद्ध व कल्पक अशी एकमेव यंत्रणा आणि संघटना. या योजनेकरता इंधन लागत नाही, संगणकाची गरज नाही आणि आधुनिक यंत्रंही लागत नाहीत. शोधूनही उणीव सापडणार नाही अशी ही कौशल्यपूर्ण यंत्रणा केवळ मनुष्यबळावर उभी आहे. पांढरा लेंगा-शर्ट, पांढरी टोपी, सायकल, डोक्यावरून सहजपणे वाहून नेता येणारे डबे ठेवलेले लाकडी पसरट खोके आणि मुंबई शहराची लोकल सेवा हेच ह्या धंद्याचे भांडवल. गेल्या १२५ वर्षांत एकदाही संप न झालेली ही एकमात्र संघटना असेल. मुंबईच्या डबेवाल्याची ही डबेवाटप योजना स.न. १८९० मध्ये सुरू झाली आणि १९२५ सालापासून लोकल गाड्या सुरू झाल्यावर त्यात आमूलाग्र बदल घडत गेले. दररोज ४५०० ते ५००० डबेवाले डब्यांच्या नेण्याआणण्याचे काम पाहतात. यामध्ये अंदाजे १,७५,००० ते २ लाख इतक्या मोठ्या संख्येनं जेवणाच्या डब्यांची उलाढाल चालते. या लाखोंच्या आकड्यातील डबे पोहोचविण्यात एखादीही चूक न होणं यासारखी अचूकता अन्यत्र कुठे सापडेल?

नाहीच सापडणार! म्हणूनच फोर्बस कंपनीने त्यांना ‘सर्वोत्तम गुणवत्ता क्रमांक’ दिला आहे. इंग्लंडचे राजे फिलीप यांनी मुंबईत डबेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या कामाला जगप्रसिद्धी मिळाली. बी.बी.सी.नं तर त्यांच्यावर एक माहितीपटदेखील काढला होता.

जागतिक मॅनेजमेंट संस्थेनं या डबेवाल्यांच्या संघटनाप्रमुखाकडून त्यांचं काम कसं चालतं हे विस्तृतपणे समजून घ्यावं म्हणून खास भाषणाकरता त्यांना आमंत्रित केलं होतं.

मोबाईलवर एस.एम.एस. येण्यापूर्वीच्या जमान्यात घरचे महत्त्वाचे निरोप जेवणाच्या डब्यांतून चिठ्या ठेवून पोहोचविले जात. डब्यांच्या झाकणांवर तांबड्या-काळ्या रंगात उभ्या-आडव्या रेषा, आकडे व इंग्रजी मुळाक्षरं असतात. त्यांचे संदर्भ लावण्याचं कौशल्य प्रत्येक डबेवाल्यानं आत्मसात केलेलं असतं. कोणत्या भागातून डबा उचलायचा, कोणत्या रेल्वेमार्गानं जाऊन कोणत्या स्टेशनवर उतरवायचा व पुढे ऑफिसचा रस्ता बरोबर शोधून तो डबा योग्य वेळी, योग्य व्यक्तीपर्यंत कसा पोहोचवायचा या सर्वांचं प्रशिक्षण डबेवाल्यांना दिलेलं असतं. हीच प्रक्रिया दुपारी उलट्या मार्गानं करीत संध्याकाळपर्यंत रिकामा डबा योग्य घरी पोहोचतो. डबेवाले व लोकल गाड्या यांचं गणित अचूक असतं. केवळ ४० सेकंदांत आपल्या लाकडी खोक्यांसकट गर्दीत डबे चढविणे हे डबेवाल्यांसाठी एक महान दिव्यच असतं. त्यात प्रवाशांची भांडणं, आरडाओरडा हे सर्व सहन करीत पुन्हा योग्य त्या स्टेशनात उतरणं हेही तितकंच कठीण असतं.

हल्ली काही वर्षांपासून सकाळी १० ते १२ या वेळात चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस) व नंतर दुपारी २ ते ४.३० या वेळेपर्यंत सामानाचा खास डबा या डबेवाल्यांसाठी राखून ठेवण्यात येतो. त्यामुळे त्यांचे हाल बरेच कमी झाले आहेत.

दोन्ही रेल्वे प्रशासनांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून ही अंमलबजावणी केलेली आहे. पावसाळा, संप, दंगली या सर्वांना तोंड देत डबेवाल्यांची सेवा अखंड चालू आहे. एक गोष्ट मात्र तितकीच सत्य आहे, की हे डबेवाले आज मुंबई लोकल रेल्वेवर पूर्णपणे अवलंबून आहेत. रेल्वे व डबेवाल्यांची मेहनत या दोन्ही गोष्टींमुळे ही योजना लोकांसाठी जिवाभावाची झाली आहे.

जगामध्ये अशा प्रकारची व्यापक सेवा अन्यत्र कुठेही नाही.

डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..