गेली १७५ वर्ष जगातील लहान थोर सर्व वयोगटातील नागरिकांना वाफेच्या इंजिनाबद्दल कुतूहल वाटत आलं आहे, आणि विशेष म्हणजे हे कुतूहल आजही कायम राहिलेलं आहे. वाफेची इंजिनं हा एकेकाळी भारतीय रेल्वेचा कणा होता. आजही रोज दिल्ली ते अलवार (पंजाब) या मार्गावर धुराच्या इंजिनाची गाडी सोडली जाते.
रेल्वे जगातील सुधारित इंजिन इ. सन. १८२९ मध्ये जॉर्ज स्टीफनसननं बनविलं होतं. त्या इंजिनची रंगसंगती होती काळी आणि पांढरी, ज्याचं नाव होतं ‘रॉकेट’. हे इंजिन चालविण्याचा मान जॉर्जलाच मिळाला होता.
तसं पाहू गेल्यास त्या काळात वाफेच्या इंजिनाला आकाराच्या मर्यादा होत्या, तसंच त्यामध्ये काही हानिकारक घटकही होते. दगडी कोळशापासून निघणारा काळा धूर, धगधगत्या ज्वाळा, वाफेचा प्रचंड दाब या सर्व गोष्टी शरीराला त्रासदायकच होत्या. तरीही जवळजवळ १०० वर्ष वाफेची इंजिनं हा भारतीय रेल्वेची अविभाज्य घटक होता. सुरुवातीचा बराच काळ जवळपास ५०० तऱ्हेच्या वाफेची इंजिनं वापरली गेली होती. साधारणत: ८ लाख पौंड ते ५॥ टनाचे वजन असलेली अवाढव्य इंजिनं तेव्हा वापरली जात. त्यांची लांबी २० फूट ते १०० फूटांपर्यंत असे. रुळांची पद्धतशीर बांधणी आणि इंजिनाची रचना या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असत. याचा अर्थ असा की जरी गाडीचा वेग कमी किंवा जास्त असला तरी डब्यांचा समतोलपणा अतिशय काटेकोरपणे संभाळला जाई. अगदी क्वचित डब्यांना धक्के बसतात. गाडीचा वाढीव वेग, सुरक्षितता आणि अचूकपणा साध्य करण्यामागे बरेच संशोधन असतं. देशातील अनेक रेल्वे कार्यशाळा संपूर्ण गाडीची विशेषत: गाडीच्या ब्रेक्सचे कपलिंग्ज, चाकाची मांडणी वगैरे गोष्टींची देखभाल सातत्याने करीत असतात.
रेल्वेचं पहिलं मोठं वर्कशॉप बिहारमधील जमालपूर येथे १५० एकर जागेत उभारलं गेलं. त्याच्या बाजूने ७ ते १५ मैल लांब रेल्वे वसाहत बांधली गेली. त्यानंतर परळ, माटुंगा (मुंबई), दोहाद, खडकपूर, कांचचारापूरा, पेरांबूर चारबाग, अजमेर, गोरखपूर, हुबळी अशा भारतभर रेल्वेच्या कार्यशाळा व त्याचबरोबर वसाहती स्थापन झाल्या. चित्तरंजन (बंगाल) येथे इंजिनं बांधण्याचा भव्य प्रकल्प उभारण्यात आला.
रेल्वेचं विद्युतीकरण हा प्रगतीचा मोठा टप्पा होता. सन १८९५ मध्ये रेल्वेचं पहिलं विद्युत पॉवर स्टेशन जमालपूर येथे सुरू झालं आणि हळूहळू खडकपूर व पुढे चोला (कल्याण) येथील विद्युत स्टेशनमधून १ लाख किलो वॉटपेक्षा जास्त वीजनिर्मिती सुरू झाली. इंजिनामधल्या बदलांचा हा मोठा टप्पा होता. वीज निर्मिती झाली आणि मग प्रथम विजेवर धावणाऱ्या लोकल गाड्या आणि इलेक्ट्रिक इंजिनं आयात केली गेली. महत्त्वाच्या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनं असलेल्या प्रवासी गाड्या धावू लागल्या. वाफेची इंजिनं इतिहासजमा झाली. आजमितीला फक्त तीन रेल्वेमार्गांवर जुना वारसा म्हणून वाफेचं इंजिन असलेल्या गाड्या धावतात. दिल्ली – अलवार, दार्जिलिंग व उदगमंडलम (उटकमंड) ही ती तीन ठिकाणं आहेत.
इलेक्ट्रिकची इंजिनं आली आणि गाड्यांचे वेग वाढले. इंजिनड्रायव्हरचं जीवन सुसह्य झालं. मालगाड्यांच्या डब्यांची संख्या वाढू लागली. सन १९६२ पासून, म्हणजेच जेव्हा मालगाड्यांच्या डब्यांची संख्या वाढू लागली तेव्हापासून, डिझेल इंजिनाचं आगमन झालं. डिझेलवर चालणाऱ्या इंजिनाची हॉर्सपॉवर २६०० ते ५५०० पर्यंत असल्याने लांब पल्ल्याच्या २२ ते २५ डब्यांच्या प्रवासी गाड्यांचा वेग वाढला. रेल्वेचं विद्युतीकरण संपूर्ण मार्गापैकी काही ठिकाणी नव्हतं. अशा ठिकाणी डिझेल इंजिनं वरदान ठरली. यापुढील काळात नवीन तयार होणारी डिझेल इंजिनं १०,००० हॉर्सपॉवरची असणार आहेत, परंतु त्यांच्या विशेष देखभालीचा खर्चही भरपूर आहे. डिझेलच्या किंमतीही भरमसाठ वाढत आहेत. यावर पर्याय म्हणून डिझेल व इलेक्ट्रिक असा दोन्हींचा वापर करून नवीन इंजिनंही तयार केली जात आहेत.
बहुतेक सर्व रेल्वे इंजिनांवर इंग्रजी कॅपिटल लेटर्सच्या खुणा केलेल्या दिसतात. उदाहरणार्थ, WYZN या सांकेतिक खुणांवरून ते इंजिन कोणत्या लाईन करता म्हणजे ब्रॉडगेज, नॅरो किंवा मीटर गेज; तसेच डिझेल वा इलेक्ट्रिक; यांशिवाय मालगाडी, पॅसेंजर, एक्सप्रेस, मेल, यांपैकी कशाकरता वापरण्यात येणार आहे हे दर्शवलं जातं.
डिझेल इंजिनांना साहाय्यक अशी आधारभूत पर्यायी यंत्रणा बसविलेली असल्याने, जेव्हा गाडी स्टेशनवर उभी असते किंवा इंजिन यार्डात तात्पुरते उभे केले जाते तेव्हा डिझेलच्या वापरामध्ये ८५ टक्के बचत केली जाते.
इंजिनं बनविण्यासाठी लागणाऱ्या हजारो लहान-मोठ्या भागांची निर्मिती करण्याकरता अनेक कारखाने स्थापन झाले. जगभर रेल्वेने जी औद्यागिक क्रांती घडवली त्याचाच हाही एक भाग आहे.
– डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply