रेल्वेव्यवस्थापनात ‘स्टेशनमास्तर’ हे पद जसं महत्त्वाचं असतं, तसंच तांत्रिकदृष्ट्या ‘गार्ड’ हा संपूर्ण गाडीचा प्रमुख असतो. स्टेशनमास्तर गार्डला गाडी स्टेशनवरून सोडण्याची विनंती करतो, गार्ड-इंजिन ड्रायव्हरला आज्ञा देतो आणि मगच गाडी स्टेशनाबाहेर पडते.
गार्डला गरज वाटल्यास, काही अपरिहार्य कारणासाठी तो इंजिनड्रायव्हरला गाडी थांबविण्यास भाग पडू शकतो. तत्काळ ब्रेक लावण्याचा अधिकार गार्डकडे.
दिलेला आहे, म्हणूनच तत्काळ ब्रेकव्हॅनचा डबा हा गाडीच्या शेवटी गार्डच्या जवळ तैनात केला जातो. अणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास गार्ड मार्गावरती छोटा स्फोट घडवून उजेडाची सोयही करून देऊ शकतो. सिग्नल्समध्ये बिघाड असेल किंवा गाडीच्या मशिनचा एखादा भाग काम करीत नसेल, तुटला असेल, तर अशा वेळी इंजिनड्रायव्हर गार्डला विचारल्याशिवाय गाडी पुढे नेऊ शकत नाही. एखाद्या संकटकाळी गाडी पुढे न्यावयाचीच असेल, तर गार्ड तशा लेखी सूचना ड्रायव्हरला द्याव्या लागतात, मगच तो गाडी पुढे नेऊ शकतो. प्रत्येक स्टेशनातून गाडी जात असताना गार्ड स्टेशनमास्तरला दिवा वा झेंडा दाखवतो आणि मगच गाडी पुढे जाते. क्वचितप्रसंगी अगदी छोट्या स्टेशनवर तिकीट देण्याची सोय नसेल, तर गार्ड प्रवाशांना तिकीट देऊ शकतो.
गजमुखी गार्ड: भारतीय रेल्वेच्या १५० वर्षांपूर्तीनिमित्त प्रसिद्ध केलेलं व्यंगचित्र
मालगाडीलाही गार्ड असतो. अगदी क्वचित, कधीतरी छोट्या प्रवासात गाडी गार्डशिवाय जाते.
डिसेंबर २०१३ मध्ये बांद्रे-डेहराहून एक्सप्रेसच्या तीन डब्यांना भीषण आग लागली. त्या स्थितीत गाडी लवकरात लवकर थांबविण्यात यश आलं. गाडीचे गार्ड श्री. पतंगे धावत धावत दोन रेल्वे कामगारांबरोबर जळत्या डब्यांत शिरले. जिवावर उदार होऊन त्यांनी आठ ते दहा प्रवाशांना जळणाऱ्या व कोंडलेल्या धुराच्या डब्यांतून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचविले. ही घटना गार्डचे कौतुक करण्यासारखी होती, आणि गाडीच्या ‘तांत्रिकदृष्ट्या प्रमुख पदाची जबाबदारी दाखवणारीही होती.
भारतीय रेल्वेची १५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा एक व्यंगचित्र खास प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यात ‘गार्ड’ हा चालत्या गाडीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो हे सूचित करण्यासाठी हत्तीच्या तोंडासारख्या ‘भोलूला’ गार्डचं प्रतीक बनविण्यात आलं होतं. ह्या गजमुखी गार्डच्या हातात एक हिरवा दिवा दिलेला होता. तो गाडीसाठी पुढील रस्ता मोकळा आहे हे दर्शवीत होता. गार्ड हा गाडीच्या प्रवासात खास भूमिका बजावतो हे प्रतिबिंबित केलेलं व्यंगचित्र रेल्वेमधलं गार्डचं महत्त्व बोलकेपणानं सांगणारं होतं.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply