१८९० ते १९१० च्या दरम्यान चोवीस तास वा त्यापेक्षा जास्त वेळ प्रवास करण्यासाठीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या. त्यावेळी प्रवासात जेवणाची, खाण्यापिण्याची सोय प्रवासी स्वत:च करत असत. चार ते पाच-कप्पी पितळी वा अॅल्युमिनियम डबे, फिरकीचे तांबे, खुजे अशा जय्यत तयारीनिशी प्रवासी मंडळी दूरच्या प्रवासास निघत. ब्रिटिश उच्च अधिकारी पहिल्या वर्गानं प्रवास करत. त्यांना ताजं जेवण लागत असल्यानं त्यांच्या गाडीला एक वेगळा खानपान बनविण्याचा डबा जोडण्यात येऊ लागला. तिथे बर्फ ठेवण्याचीही सोय असे. पुढे पहिल्या वर्गाचे प्रवासी आपल्या डब्यांतून पॅन्ट्रीकारमध्ये जाऊन नाश्ता व जेवण करत. तिथे बसण्यास हॉटेलसारखी टेबलं-खुा असत. त्या काळात दोन डब्यांतून प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी जोडणारी व्यवस्था (Vestibule) नव्हती, त्यामुळे या खानपानाच्या डब्यापर्यंत प्रवाशांना पोहोचता यावं म्हणून लांब पल्ल्याची गाडी मधल्या लहान स्टेशनवर तीन ते पाच मिनिटं थांबत असे व प्रवासी तेवढ्या वेळात आपल्या डब्यातून उतरून पॅन्ट्रीकारपर्यंत जात असत. फ्रंटीयर मेल, ग्रँड ट्रंक एक्सप्रेस या अशा गाड्या होत्या. मुंबई-दिल्ली मार्गावर गाडी विरारला थांबे.
हळूहळू जेवणाची मागणी वाढत गेल्यानं, जेवणाची ताटं प्रवाशांच्या जागेवर आणून देण्याची सोय झाली. ज्या गाड्यांना पॅन्ट्रीकार लागत असे त्यांची नोंद टाईम टेबलमध्ये ‘पी.’ पॅन्ट्री म्हणून होते, पण पॅन्ट्री डबे सर्व गाड्यांना नसतात; त्यामुळे प्रवाशांच्या जेवणाच्या सोयीसाठी वाटेतील मोठ्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेची कँटीन्स सुरू झाली. तिथे गाडी २० ते ३० मिनिटं थांबत असे. तेवढ्या वेळात अनेक प्रवासी या कँटीनमध्ये भरभर जात व जेवण उरकत. यामध्ये गाडीचा वेळ फुकट जाऊ लागल्यानं, जेवणाची ताटं ऑर्डरप्रमाणे गाडीच्या प्रत्येक डब्यात पोचवण्याची सोय झाली. या सोयी जरी उपलब्ध होत्या, तरीही घरातून डबे नेण्याचं प्रमाणही बरंच होतं.
अति-लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अॅल्युमिनियम फॉईलमधून जेवणाची बंद पाकिटं येण्यास सुरुवात झाली. अनेक प्रकारचं व चविष्ट खाणं देण्यासही सुरुवात झाली. राजधानी, शताब्दी, दुरान्तो या गाड्यांमध्ये उत्तम जेवणाची सोय असते आणि त्याचा खर्च तिकिटातच घेतला जातो.
खानपान विषयक रेल्वेची भावी योजना
रेल्वेकडून भारतभर २५० भव्य स्वयंपाकघरं उभारली जाणार आहेत. तिथे दिवसाला जेवणाची व नाष्ट्याची सहा लाख पाकिटं अतिशय आधुनिक पद्धतीनं बनविली जातील. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर रेल्वेची कडक नजर असेल. स्वयंपाकघरासाठी स्टेशनजवळ एक रुपया चौरस फुटाच्या दरानं कंत्राटदाराला जागा दिली जाईल.
निर्जंतुक आरोग्यदायी अन्नपदार्थ (हायजेनिक) बनविण्याकडे कटाक्षानं लक्ष दिलं जाईल. प्रवासी मोबाईलवरून एस.एम.एस.द्वारा आपल्या आवडीचं जेवण मागवू शकेल व ते त्याला त्याच्या जागेवर मिळेल. रेल नीर’नं (बिसलरी) तर क्रांतीच केली आहे. या योजनेमुळे वर्षाला अंदाजे २००० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रारी आल्यास कंत्राटदारावर कडक कारवाई केली जाईल. काही काळापूर्वी कोकण रेल्वेवरील मंगलोर येथील कंत्राटदाराला याबाबत एक लाख रुपये दंड ठोठावून तो वसूलही करण्यात आला आहे.
पितळी कप्प्यांचे डबे, फिरकीचे तांबे बघता-बघता इतिहासजमा झाले आणि आता खानपान क्रांतीचं नवं युग आलं आहे. रेल्वे सर्वच बाबतींत अत्याधुनिक होत असल्याचा प्रत्यय खानपान-पुरवठ्याबाबतही येत आहे.
आता-आतापर्यंत डेक्कन क्वीनला असणारा ‘डायनिंग कार’ हा डबा नुकताच गाडीला लावणं बंद करण्यात आलं, कारण अशा त-हेचे डबे आता भारतातील कोणत्याच गाडीला जोडले जात नसल्यानं त्यांचं उत्पादन थांबविलं गेलं आहे. पण या गाडीचा तो एक मानाचा डबा होता याची दखल घेत तशा त-हेचा डबा मुंबई रेल्वे वर्कशॉपमध्ये बनविण्यात येणार असून, तो ‘डेक्कन क्वीन’ला पुन्हा जोडला जाणार आहे. असे आहे ‘दख्खनच्या राणी’चे महत्त्व! डायनिंग कार: डेक्कन क्वीन
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply