नवीन लेखन...

रेल्वे पोलिस आणि मी – भाग १ (आठवणींची मिसळ ०९)

तुम्ही सर्वांनीच अनेक वर्षे लोकलने किंवा अनेकवार दूर जाणाऱ्या गाड्यांनी प्रवास केला असेल आणि तरीही तुमचा कधीही रेल्वे पोलिसांशी संबंध आला नसेल. बहुतेकांनी रेल्वे पोलिसांना ओझरते कुठेतरी पाहिल्याच आठवत असेल. त्यामुळे तुम्हाला माझ्या आजच्या लेखाचा मथळा वाचून आश्चर्य वाटलं असेल. लेख लिहिण्याएवढा यांचा रेल्वे पोलिसांशी काय संबंध? विचार योग्य आहे.पण माझ्या बाबतीत अशा मजेदार घटना घडल्या की रेल्वे पोलिसांनी नाकी दम आणला.चार पाच वेगवेगळ्या घटनांमधे माझा त्यांचा संबंध आला. प्रत्येक वेळी नवा अनुभव गांठीशी जमा झाला.ह्या सर्व खऱ्या घटना आहेत. ह्यांत काल्पनिक कांहीच नाही. ज्या क्रमाने त्या घडल्या त्या क्रमानेच तुम्हाला ती हकीकत सांगतो.

रेल्वे पोलिसांची कामे काय याचा मी फक्त अंदाजच बांधू शकतो. रेल्वेच संपत्ती चोरणारे, रेल्वेवर होणारे अपघात, रेल्वे प्रवाशांच्या पाकीट, सामान यांच्या चोऱ्या, ई. संबंधीची कामे, रेल्वेचे नियम न पाळणाऱ्यांना पकडून रेल्वे मॅजिस्ट्रेट समोर हजर करणे, रेल्वेच्या आवारांत दंगल, आंदोलन झाल्यास कारावाई करणे. ही कामे आपली सहज आठवतात म्हणून लिहिली. मुंबई पोलिसांच्या कामांशी आणि तुमच्याशी येणाऱ्या त्यांच्या संबंधांबद्दल तुम्हाला लौकर माहिती होते. रेल्वे पोलिसांच तसं नाही.रेल्वेने रोजच सामान नेणारे आणणारे असतात ते रेल्वे पोलिसांना बरोबर ओळखून असतात.माझ्या एका नातेवाईकाशेजारी एक स्टेशनवर काम करणारे टी. सी. रहात.माझ्या नातेवाईकांच्या सांगण्याप्रमाणे तिच्या शेजाऱ्यांनी निवृतीपर्यंत कधीही भाजी, फळे, अंडी बाजारांतून आणली नाहीत. स्टेशनवरून सर्व कांही त्यांना मिळत असे. पण मग मी कुठे सांपडलो? रेल्वेचा साधा प्राथमिक नियम “रूळ ओलांडून जाऊ नये. रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. “हा नियम मोडण्याचा अपराध मी केला. खरं तर हे स्वतःसाठीच धोक्याचं आहे.आजही दरवर्षी अनेक नाहक बळी ह्या कारणाने जातात.

पूर्वी रेल्वेवर ओव्हर ब्रिज फारच कमी होते.वांद्र्याच्या पुढे नव्हतेच.स्टेशनवर ब्रिज असे.दहिसरनंतर तो ही नव्हता.अंधेरीला पश्चिमेकडून पुर्वेकडे जायला एक तर फाटकाचा उपयोग करावा लागे किंवा स्टेशनवरच्या ब्रिजचा.हे फाटक स्टेशनाच्या उत्तरेला जवळच होते.सर्वजण फाटकातूनच रूळांवर येत.त्या काळांत रूळ ओलांडून हव्या त्या प्लॅटफॉर्मवर जाणे हा जणू हक्कच समजला जाई.मग रेल्वेने पोलिसांची पथके अचानक पाठवायला सुरूवात केली.सर्वांनाचं सर्रास रूळ ओलांडण्याची सवय असल्यामुळे पोलिसांना भरपूर गिऱ्हाईक मिळत.ज्या दिवशी मी पकडला गेलो तेव्हां खरं तर स्टेशनवर जाण्याचा माझा उद्देशच नव्हता.मी अंधेरी स्टेशनाच्या थोड्या अंतरावर दक्षिणेला होतो.स्टेशनवरचं पोलिसांच पथक माझ्यापर्यंत आलच नसत.पण “विनाशकाले विपरीत बुध्दी”च्या चालीवर मी म्हणतो. विचित्र काले विपरीत बुध्दी.

मी त्या दिवशी रजेवर होतो आणि पूर्वेला रहाणाऱ्या माझ्या एका मित्राकडे साडेदहाच्या सुमारास निघालो होतो.अंधेरीला त्याकाळी रूळांचे आतासारखे जाळे नव्हते.गाड्यांचीही येजा कमी होती.रूळ ओलांडून गेल्यास त्या मित्राचे घर फार जवळ वाटे.तेच फाटकावरून वळसा घालून जायला ते लांब पडे.म्हणून मी रूळ ओलांडणेच पसंत करत असे.त्या दिवशी दोन्ही बाजूला बघून नीट रूळ ओलांडतांना माझ्या नांवाची स्टेशनच्या दिशेने हांक ऐकू आली.मी तिकडे पाहिलं तर माझ्या ओळखीचे एक सद्गृहस्थ मला रेल्वे प्लॅटफॉर्मच्या टोकाला उभे राहून हांक मारत होते.त्यांनी कानाला जानवे अडकवले होते.त्यावरून ते स्टेशनच्या टोकाला असणाऱ्या मुतारीतून नुकतेच बाहेर आले होते.बऱ्याच दिवसांनी ते भेटल्यामुळे मलाही त्यांच्याशी बोलण्याचा मोह झाला आणि मी रूळ ओलांडून प्लॅटफॉर्मच्या दिशेला जाऊ लागलो. तेही मला भेटायला चार पावले पुढे आले.आमच्या दुर्दैवाने पोलिसांचं पथक त्या दिवशी स्टेशनवर हजर होतं. ते ही खरं ह्या दिशेला नव्हतं. पण पोलिसांनाही “विधी” टाळता येत नाहीत. त्यातला एक पोलिस माझ्या मित्राप्रमाणेच कानाला जानवं अडकवून बाहेर आला.आम्ही प्लॅटफॉर्मच्या उताराच्या दोन पावले पुढे असताना त्याने आम्हाला पकडले व सहकाऱ्यांना हांक मारली.आम्हा दोघांना घेऊन ते एका डब्याकडे आले.अशाच पकडण्यात आलेल्या इतरांबरोबर आम्हांला ठेवण्यात आले.हातकड्या नव्हत्या पण बंदोबस्त कडक होता.एकूण तीस चाळीस अपराधी जमा झाल्यावर आम्हाला मुंबई सेंट्रलला नेण्यात आले.दोघा-दोघांची जोडी करून मुंबई सेंट्रल स्टेशनापासून रेल्वे मॅजिस्ट्रेटच्या कोर्टापर्यंत दुपारी बाराच्या सुमारास आमची मिरवणूक काढली.

वाटेत जाताना आणि तिथे गेल्यावर आमच्यातले “अनुभवी” आम्हाला वेगवेगळे सल्ले देऊ लागले.कांहीजणांचे सल्ले हे दुसऱ्या कुणाच्या अनुभवावर आधारीत होते.एक सांगत होता,”खरी नांवे देऊ नका. कांहीतरी नाव ठोकून द्या.”त्याकाळी ओळखपत्र, आधार, पॅन असे कांही नव्हतेच. त्याहून विचारी माणसाचा सल्लाः “आणि नोकरी कुठे करता, ते ही सांगू नका. ऑफीसला कळवलं तर नोकरी जाईल.”कुठल्यातरी खून खटल्यात भाग घेतल्यासारखं वाटायला लागलं.”काय दंड करतील तो मुकाट्यानं भरा.’एवढा कां?’ म्हणून वाद करू नका.नाही तर दंड वाढत जातो.”आणखी एकाचा प्रामाणिक सल्ला.”हो, एक जण आर्ग्युमेंट करायला लागला तसा प्रत्येक वेळी डबल दंड करत मॅजिस्ट्रेटने तो ५००रुपयांपर्यंत वाढवला.”कोणीतरी ऐकीव गोष्ट सांगितली.मग आम्हाला फॉर्म भरायला देण्यात आला.नांव, वय आणि पत्ता एवढीच माहिती त्यात भरायची होती.कोणी काल्पनिक नावे लिहिली, खोटे पत्ते दिले.कोणी आपलं नाव आणि वडिलांच नाव एवढच लिहिलं आणि आडनाव लपवण्याची हुशारी दाखवली. मी तेव्हां रिझर्व्ह बँकेत होतो.तरीही मी माझं खरं नाव आणि खरा पत्ता लिहिला.

आमचे फॉर्म भरून घेण्यात आल्यावर थोड्या वेळाने आम्हांला मॅजिस्ट्रेटसाहेबांच्या दालनांत नेण्यांत आलं. पांच पाचच्या रांगामधे आम्हाला बसवण्यात आलं.मॅजिस्ट्रेटसाहेब अजून यायचे होते.मधे एक लाकडाचं रेलिंग होतं.पलिकडे उंच प्लॅटफॉर्मवर साहेबांच मोठे टेबल होते.थोड्याच वेळांत साहेब येत असल्याची ललकारी देण्यात आली आणि साहेब प्रवेश करते झाले.आम्हाला ते नाटक नवीन असलं तरी साहेबांसाठी ते नित्याचंच होतं.ते कंटाळलेले दिसत होते. त्यांचं डोक तरी दुखत असावं किंवा त्यांना झोप तरी येत असावी.आल्या आल्या ते कोर्टाच्या क्लार्कशी कांही तरी बोलले. मग त्यांनी आपले हात एकात एक टेबलावर गुंफले आणि ते झोपले.त्यांनी अशी समाधी लावल्यावर कोर्टाची कारवाई सुरू झाली. कोर्टाचा क्लार्क एक एक नाव सांगू लागला. बेलीफ तेंच नाव दरबारात पुकारावे तसे पुकारू लागला आणि पुढे “हाजीर हो” अशी पुस्ती जोडू लागला.पहिल्या रांगेतल्या पांचही जणांची नांवे पुकारली गेली आणि त्यांना रांगेत रेलिंगसमोर उभं करण्यात आलं. मग त्यांना रेल्वे ट्रेसपासिंगचा गुन्हा त्यांनी केल्याचे जाहीर करून, सामूहीकपणेच विचारण्यात आलं “गुन्हा कबूल है?” अनुभवी लोकांचे सल्ले ऐकल्यामुळे सावध असलेल्या पांचीजणांनी एकमुखाने “कबूल है” म्हणून सांगितले.पुढचा क्षण सर्वांसाठीच फार महत्त्वाचा होता.कारण सुनावण्यात येणारी शिक्षा त्या दिवशीच्या दंडाच्या रकमेची कल्पना देणार होती. मॅजिस्ट्रेटसाहेब समाधितच होते. कोर्टाच्या क्लार्कने बेलिफला कांही सांगितले. त्याने आम्हाला सगळ्याना आनंदीत करणारा पुकारा केला, “पहिलाही गुन्हा होनेके कारण ताकीद देके छोड दिया जाता है.”आता हा पहिलाच गुन्हा होता हे कसं कळलं कोणास ठाऊक? फॉर्ममधेही त्यांनी तसं कांही विचारलं नव्हतं.असो. पण त्यांचा उद्देश चांगला होता. मॅजिस्ट्रेटसाहेबांना आवडणारा पदार्थ त्यांच्या पत्नीने त्यांना खिलवला असणार. त्यामुळे खुशीने त्यांनी दिवशी मामुली दंडाची सजादेखील सांगितली नाही.

पण हे पहिल्या पाच जणांच झालं.आमचं काय? मी चांगला मागे चौथ्या रांगेत होतो.दुसरी पांच नांव खड्या आवाजात पुकारली गेली.गुन्हा सांगणं, कबूल हे विचारणं आणि “पहिलाही गुन्हा होनेके कारण ताकीद देके छोड दिया जाता है” ह्या सर्व गोष्टी त्याच क्रमाने पार पडल्या. आणि आणखी पांच जण आनंदात पळाले. अर्थात कांही जणांना कॅज्युअल लीव्ह फुकट गेल्याचं दुःख होतंच. पण दंडाशिवाय सुटका झाल्याचा आणि साडेबाराच्या आत मोकळं झाल्याचा आनंद मोठा होता. मग यथावकाश माझं नांव पुकारण्यांत आलं. “अरविंद आत्माराम खानोलकर, हाजीर हो.” म्हटल्यावर मी ताबडतोब उभा राहीलो. गुन्हा कबूल करून ताकीद स्वीकारून बाहेर पडलो. मला बोलावून घेऊन गोत्यात आणणारे सद्गृहस्थ आधीच बाहेर पडले होते. मला वाटलं माझ्यासाठी थांबले असतील पण त्यांना कामावर जायची घाई असावी. ते तिथे थांबले नव्हते.

एक आगळावेगळा मजेदार अनुभव गांठीशी बांधून मी तिथून बाहेर पडलो. मित्रांना सांगायला मला एक किस्सा मिळाला. मी अगदी सर्व तपशील रंगवून सांगत असे. “अरविंद आत्माराम खानोलकर, हाजीर हो” हें कसं ओरडला ते मी साभिनय दाखवत असे. माझा एक मित्र (मागच्या लेखांतला नाना) पुढे अनेक वर्षे मी भेटताच त्या ललकारीनेच माझं स्वागत करत असे. रेल्वे रूळ ओलांडण हे खरं तर पूर्णपणे थांबायला हवं. रेल्वेने त्या दृष्टीने बऱ्याच ठिकाणी कुंपणही घातली आहेत. पण थोडा वेळ वाचवायचा मोह किंवा थोडा आळस यामुळे अनेकजण जिथे जमेल तिथे रूळ ओलांडत असतात. जिथे गाडीच्या दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म असतो, तिथे गाडी येताना दिसत असतांना, एका बाजूने उडी मारून रूळावर उतरून दुसऱ्या बाजूला चढण्याची कांही गरज असते कां? पण हे मी अनेकदा पाहिलं आहे. माझ्या ३६ वर्षाच्या प्रवासांत मी अनेक अपघात पाहिले. जे टाळता येण्यासारखे होते. १९९२पासून माझा आणि रेल्वेचा फार कमी संबंध आला. पण पेपरात कधीतरी वाचतो त्यावरून आजही असे टाळण्यासारखे अपघात घडतात असं दिसतं आणि वाईट वाटतं. माझ्यापुरता मी तेव्हांपासून कानाला खडा लावला. पोलिसांच्या भितीने नव्हे तर चूक माझ्या लक्षात आल्यामुळे. तरीही माझा आणि रेल्वे पोलिसांचा संबंध येतच राहिला.

एकदा मी अंधेरी स्टेशनवर गाडीची वाट पहात उभा होतो. साधारण शेवटच्या डब्यामधे मित्र बसत, म्हणून मी तसा टोकालाच उभा होतो. तिथे पाहिलं तर मला दिसलं की त्या दिवशीही रेल्वे पोलिसांच भरारी पथक रूळ ओलांडून येणाऱ्या लोकांना पकडत होतं. लोक वैतागत होते, पण पकडल्यावर त्यांनी कितीही गयावया केली तरी त्याचा कांही फायदा होत नसे. यावरून एक आठवण झाली, ती थोडं विषयांतर करून सांगतो. एकदा चुकीच्या ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्याला सुटाबुटांतल्या गृहस्थाला पोलिसांनी पकडलं. त्याने खूप गयावया केल्यावर पोलिसांनी त्याला दहा उठाबशा काढायला लावल्या. सूटबूट घालून त्याने भर चौकात चर्चगेट येथे इरॉस थिएटरसमोर दहा उठाबशा काढल्या. चौकांत जमलेले लोक कोरसमधे मोजत होते, “दहा, नऊ, आठ……” सर्वानी एक म्हणताच तो पळत जाऊन गर्दीत मिसळला. पण रेल्वे पोलिस असे विनोद वगैरे करणारे नसतात. डोकं बाजूला ठेऊन ते काम करतात. त्यामुळे कोणाला ते सोडत नव्हते. मी हे पहातानाच मला दिसलं की माझ्या अगदी जवळच्या नात्यातलं एक जोडपं अंधेरी फाटकाकडून तिथे येत होतं. ते आणखी थोडे पुढे आले की रेल्वे पोलिस त्यांना पकडणार हे मला दिसत होतं. खरं तर ते गृहस्थही रेल्वेतच नोकरीला होते. पण म्हणून पोलिसांनी त्यांना सोडून देण्याची शक्यता कमीच होती. बहुदा रेल्वेत काम करतो हे त्यांनी सांगितलेच नसते.

मी ताबडतोब पुढे झालो आणि प्लॅटफॉर्मच्या टोकावरून पण उतारावर न जाता, त्याना पुढे न येता मागच्या मागे जाण्याच्या खुणा करू लागलो.त्यांचे माझ्याकडे लक्ष जावं म्हणून शेवटी त्याना हांक मारली.त्यांनी मला पाहिलं, माझ्या खुणा त्यांना कळल्या. ते मागे गेले. पण मी खुणा केल्यामुळे ते परत गेल्याचे पोलिसांनीही पाहिले. ते चिडले. मी खुणा केल्याने आणखीही कांही लोक (पोलिसांचे बकरे) माघारी गेले होते. पोलिसांनी मलाच पकडले. मी म्हणालो, “देखो, मैने लाईन क्रॉसिंग नही किया है. आप मुझे नही पकड सकते.” पण ते ऐकेनात. मी परत म्हणालो, “मैने दुसरेको ‘लाईन क्रॉस मत करो’, ऐसा कहा. यह मेरा गुनाह नही हो सकता.” पण ते मठ्ठपणे माझं ऐकत नव्हते. एकाने माझी कॉलर पकडली व मला लगेज डब्यांत ढकलण्यासाठी घेऊन गेला. आधी पकडून भरलेले ३०-४०लोक आत होते. आणि आम्हां दोघा तिघाना आत ढकलण्यात येत होते. माझा शाब्दिक प्रतिकार चालूच होता.दरवाजांत मला ढकलायचा प्रयत्न करत असताना त्या पोलिसाची पकड सैल झाली आणि त्या क्षणाचा फायदा घेऊन मी एक हिसडा दिला आणि पळू लागलो. मला पळताना पाहून डब्याजवळ असणारे दोन तीन पोलिस मला पकडण्यासाठी माझ्या मागे येऊ लागले. दाराशी पोलिस नाहीत म्हणताच डब्यातले पकडलेले लोक भराभर बाहेर पडून पळू लागले. तसे पोलिस माझा पाठलाग सोडून परत डब्याकडे वळले. तोपर्यंत दहाबारा लोक बाहेर पळालेच. मी ॲथलीटच्या वेगाने आणि प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीशी खोखो खेळत त्याच गाडीच्या पुढच्या एका डब्यात जाऊन साळसूदपणे दोन माणसांच्या मध्ये जाऊन शांतपणे जणू कांही झालचं नाही असं दर्शवत बसलो. मनात अजून थोडी धाकधूक होतीच. पण एक दोन मिनिटातच गाडी सुटली. मीही त्या दिवशी रेल्वे पोलिसांच्या तावडीतून सुटलो. नाही तर “दुसरे बार गुनाह करनेकी सजा” काय झाली असती कुणास ठाऊक. ह्यानंतरही दोन प्रसंगात माझा रेल्वे पोलिसांशी संबंध आला पण तो लोकल प्रवासात नाही तर दूरच्या प्रवासांत. ते प्रसंग ह्यापेक्षा वेगळे होते, कठीण होते.ते आता पुढच्या भागात.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..