नवीन लेखन...

रेल्प्रवे वासाचं नियोजन – भाग १

लांब पल्ल्याच्या प्रवासीगाड्यांचं नियोजन

मेल, एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, अशा बारा तासांपासून अगदी ऐंशी ते पंच्याऐंशी तासांचा प्रवास करणाऱ्या निरनिराळ्या गाड्या आहेत. या गाड्यांना लांब पल्ल्याच्या गाड्या म्हणतात. त्यांचं नियोजन विविध विभागांमार्फत होत असतं.

इंजिनड्रायव्हर्स, गार्ड, हेल्पर, तिकीट तपासनीस, या सर्वांच्या एकत्रित काम करणाऱ्या गटाला ‘क्रू’ म्हणतात. या सर्वांची ड्यूटी साधारणतः आठ ते दहा तासांनंतर समाप्त होते. यासाठी रेल्वेमार्गावरील ज्या स्टेशनवर ‘क्रू’ बदलला जातो ते स्टेशन सर्व सोयींनी परिपूर्ण असावं लागतं. त्या कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीच्या जागा ठीकठाक असाव्या लागतात. महत्त्वाचं म्हणजे इंजिनाची तत्परतेनं करावी लागणारी तपासणी, प्रत्येक डब्याची तांत्रिक तपासणी, डब्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता, खानपानाची सोय, ह्या सर्व गोष्टी दहा मिनिटांत पूर्ण कराव्या लागतात. पूर्वीच्या काळी अशा जंक्शनस्टेशनवर गाडी अर्धा तास थांबत असे, परंतु आजकाल गाडी लवकरात लवकर स्टेशनातून बाहेर काढावी लागते. या गाड्यांचे इंजिनड्रायव्हर्सही सहा ते आठ तासांनंतर बदलले जातात.

प्रत्येक इंजिनमध्ये एक जड लाईन बॉक्स ठेवलेली असते, ज्यामध्ये संपूर्ण मार्गाचं तपशीलवार टाईम टेबल, ट्रॅकची सखोल माहिती, आवाज करू शकणारे व उजेड पाडणारे छोटे बॉम्बस्, सुटे दिवे व इतर छोटी-मोठी आयुधं असतात. ही पेटी जड असून, रेल्वेपोर्टर एका इंजिनामधून दुसऱ्या इंजिनात तिची ने-आण करतात.

इंजिनड्रायव्हरना गाडी सुटण्याच्या वेळेआधी तासभर यार्डात जाऊन इंजिनाची तपासणी करून ते प्लॅटफॉर्ममधील उभ्या असलेल्या गाडीला लावावं लागतं. राजधानी एक्सप्रेससारख्या अति-महत्त्वाच्या गाडीचे ड्रायव्हर त्यांच्यावरील जोखमीचे काम करताना पूर्ण दक्षता घेतात. इंजिनड्रायव्हरजवळील वर्किंग टाईम टेबल हे सर्वांर्थानं परिपूर्ण असतं. त्यामध्ये सर्व लेव्हल क्रॉसिंग्ज, छोटी गेट्स, वळणं, पूल, नद्या, मार्गाची चढण, उतार, संपूर्ण मार्गावरील सिग्नल्सच्या जागा, तत्काळ वैद्यकीय केंद्रं, या सर्वांची पूर्ण माहिती दिलेली असते. काही ठिकाणी तांत्रिक थांबे असतात, जे प्रवासी टाईम टेबलमध्ये नसतात.

प्रत्येक गाडीला Booked Maximum Speed, Commereial Speed आणि Maximum Permitted Speed यांचं कोष्टक आखून दिलेलं असतं. काही कारणाने गाडी उशिरा धावत असेल, तर अशा वेळी गाडी वरील कोष्टकाप्रमाणे वेगाने जाऊन वेळ भरून काढते. डबे ओढण्याची प्रत्येक इंजिनाची किती क्षमता आहे हे निश्चित केलेलं असतं. त्यानुसार अगदी जरूर पडल्यास पुढील बाजूस दोन इंजिनं जोडली जातात. २५०० कि.मी. प्रवास झाल्यानंतर प्रत्येक इंजिनाची कसून तपासणी होते. ३० ते ३५ दिवसांनी आयए, आयबी, आयसी अशा श्रेणीत तपासणी होत असते. प्रत्येक इंजिन कोणत्या शेडमध्ये तपासणीसाठी पाठवायचं हे ठरलेलं असतं. त्याप्रमाणेच ते गाडीला लावण्याचा क्रम आखला जातो.

‘ट्रेन सुपरिटेंडन्ट’ हा एक महत्त्वाचा अधिकारी राजधानी एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस, अशा काही खास गाड्यांसाठी नेमलेला असतो. गाडीतील संपूर्ण अंतर्गत व्यवस्थाप्रमुख म्हणून त्याचा हुद्दा असतो. सर्व प्रवाशांची झोपण्याची, जेवणाखाण्याची व्यवस्था, तसंच त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तत्परतेनं त्यांना मदत करणं ही या अधिकाऱ्याची जबाबदारी असते. या विशेष गाड्या रेल्वेमंत्र्यांच्या आधिपत्याखाली असतात. अनेक परदेशी प्रवासी अशा गाड्यांनी प्रवास करतात. त्यामुळे गाडीतील व्यवस्थापनाचा दर्जा उत्तमच राहील याकडे अधिकाऱ्यांचा नेहमीच कटाक्ष असतो. गाडी संपूर्ण प्रवास बरोबर वेळेवर करत आहे किंवा नाही हे पाहण्याकरता मार्गावर १५० ते २०० कि.मी. अंतराचे ‘कंट्रोल सेक्शन’ असतात. ते सर्व एकमेकांशी टेलिफोननं जोडलेले असतात. या सर्व विभागांवर एक मुख्य नियंता असतो. गाडीच्या वेळापत्रकावर काटेकोरपणे लक्ष ठेवलं जातं. समजा, अपघात झाला, तर तत्काळ आपत्कालीन यंत्रणेचा उपयोग करण्याची जबाबदारी मुख्य नियंत्यावर असते.

मुख्य व अतिमहत्त्वाच्या स्टेशनवरील कंट्रोल रूममध्ये भव्य कंट्रोल पॅनेल असतं, ज्यावर धावणारी प्रत्येक गाडी टिंबांच्या स्वरूपात दाखविली जाते. तांबडा ठिपका म्हणजे मेल व एक्सप्रेस गाड्या, निळा रंग पॅसेंजर गाडीचा, तर काळा रंग मालगाडी दर्शवितो. काही कारणाने गाडी मध्येच थांबून राहिली असेल तर ती ठळक जाड रेषेत दाखविली जाते.

‘केबिन कंट्रोल क्रू’ हे सर्व रेल्वेमार्गावरील सांधे, सिग्नल व त्यांची इंटर-लॉकिंग अरेंजमेंट या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देतात, ज्यामुळे गाडी सुरक्षितपणे स्टेशनात शिरते व बाहेर पडते. गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर घ्यायची हे मुख्य स्टेशनमास्तर ठरवितो. महत्त्वाच्या गाड्यांचे, जेथून गाडी सुरू होते व ज्या ठिकाणी शेवटचा थांबा असतो तेथील, प्लॅटफॉर्मस ठरलेले असतात. छोट्या स्टेशनात स्टेशनमास्तरना ही जबाबदारी एकट्याने सांभाळावी लागते.

मालगाड्या एकदा मुख्य यार्डातून निघाल्या, की त्यांना मधल्या स्टेशनचे थांबे नसतात. त्यामुळे अशा पट्ट्यात त्या वेगाने जातात. जलद मालगाडी-सेवा (मुंबई ते दिल्ली) घेऊन जाणाऱ्या मालगाड्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं, परंतु इतर मालगाड्यांना मात्र पक्कं वेळापत्रक नसतं.

एखाद्या वेळी तांत्रिक कारणामुळे डबे जोडण्यास विलंब होतो व त्यावेळी गाडी सुटण्यासच उशीर होतो. हे सर्व सांभाळणं म्हणजे एक कसरतच असते.

-– डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..