भारतीय रेल्वेचं वर्तुळाकार मार्गाचं (सर्क्युलर) तिकीट – एक अनुभव
१९५० ते १९६० सालांदरम्यान रेल्वेचं विविध विभागांचं अतिशय स्वस्त असं ‘झोनल तिकीट’ मिळत असे. निरनिराळी गावं त्या तिकिटात समाविष्ट होत व त्याची मुदत अगदी महिनाभर असे. निरनिराळ्या गावांतील नातेवाईक शोधून त्यांच्याकडे मुक्काम ठोकण्याचा हा एक उत्तम मार्ग होता. गमतीने तिकीटधारकाला ‘झोन्या’ म्हणत. ‘झोन्या’ केव्हा दत्त म्हणून समोर उभा राहील याचा भरवसा नसे. आल्यावर तो राजासारखा राहायचा. मनात आलं, की एक गाव सोडून दुसऱ्या गावात नातेवाइकांकडे पुख्खा झोडायचा. पुढे रेल्वेनंच अशी तिकिटं बंद केली.
आजही अशा प्रकारची सोय असलेलं भारतातील कुठल्याही मार्गावरचं टेलीस्कोपिक राऊंड तिकीट उपलब्ध असतं. ८ दिवसांपासून ४८ दिवसांपर्यंत कोणत्याही वर्गाचं तिकीट मिळू शकतं. आपल्याला ज्या गावांना जायचं आहे, ती गावं व तेथे जाणारा मार्ग रेल्वेला दिल्यावर ते त्या स्थळांचा नकाशाप्रमाणे कमीत कमी अंतराचा मार्ग आखून देतात. २००८ साली आम्ही चार मित्रांनी वातानुकूलित पहिल्या वर्गाने प्रवास करण्याची योजना आखली. सर्वच गाड्यांना हा वर्ग नसतो, व त्या तिकिटानं राजधानी एक्सप्रेसनं प्रवास करता येत नाही. तेव्हा आम्ही आमचं बायबल (रेल्वे टाईम टेबल) घेऊन अभ्यासाला सुरुवात केली. आमच्या आखून दिलेल्या मार्गावरील ज्या गाड्यांना वातानुकूलित पहिल्या वर्गाचे डबे आहेत, त्या गाड्यांची निवड केली. साधारणपणे बऱ्याच गाड्यांना ८ ते १० तिकिटं, तर काहींना २८ तिकिटांचा पूर्ण डबाही असतो; पण या वर्गामधील काही तिकिटं गाडी निघण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राखून ठेवलेली असतात. त्यामुळे ८ पेक्षा अधिक तिकिटं मिळणं कठीण असतं. बरोबर २ महिने आधी सकाळी ८ वाजता निरनिराळ्या दिवसांची आमच्या मार्गावरील स्टेशनांची तिकिटं पदरात पडल्यावर पुढील प्रवासाची आखणी केली. आम्हाला नुसता रेल्वेप्रवास करायचा नव्हता, तर प्रेक्षणीय स्थळं पाहायची होती. त्यामुळे आम्ही निवडलेला मार्ग असा होता.
मुंबई-पुणे-सिकंदराबाद-विशाखापट्टणम- बाळूगाव (ओडिसात भुवनेश्वर जवळील चिल्का सरोवराला जाण्याकरता उतरायचं स्टेशन) – जग्गनाथपुरी हावडा (कलकत्ता) सियालडा (कलकत्ता) न्युजलपईगुरी (बंगाल-आसाम सरहद्द) अलाहाबाद – लखनौ – मुंबई – पुणे.
हे सर्व अंतर होतं ६४०४ कि.मी. आणि रेल्वे तिकीट होतं प्रत्येकी ६३७० रुपये (ज्येष्ठ नागरिक सवलत धरून) प्रवासात प्रेक्षणीय स्थळं अशा प्रकारे पाहता आली.
१. हैद्राबाद (१ दिवस)
२. चिल्का सरोवर, भुवनेश्वर, नंदनकानन प्राणीसंग्रहालय, कोणार्क, जग्गनाथपुरी (५ दिवस)
३. सिक्कीम – गंगटोक, गुरडोगमार लेक (भारत-चीन सरहद्द) (४ दिवस)
४. अलाहाबाद – (१ दिवस)
५. लखनौ – (३ दिवस)
एकूण प्रवासाचे २१ दिवस होते.
वातानुकूलित पहिल्या वर्गाचे आलिशान डबे, चौघा जणांना एकेक भाग, त्यामुळे आम्हा चौघांचं तर बंदिस्त घरच झालं होतं. आतून डबल लॉकची सोय, उत्तम पडदे, झोपण्यास प्रशस्त फोमचे बेड, संपूर्ण डब्याला मऊ गालिच्याचे अच्छादन, दिव्यांची उत्तम सोय, कोणत्या बाजूचं स्वच्छतागृह मोकळं आहे ते दर्शविणारे बाण, अंघोळीकरता शॉवरची सोय, अशी सगळी उत्तम व्यवस्था होती. गाडीच्या डब्यांच्या काचा अतिशय स्वच्छ होत्या. त्यामुळे उत्तम फोटोग्राफी करता येत होती. डब्यात रेल्वेचा सेवक २४ तास दिमतीला असल्यानं चहापान, जेवणा-खाण्याची उत्तम सोय होती. हे सर्व सुखसोयीनी परिपूर्ण असलेले डबे म्हणजे भारतीय रेल्वेची शान आहे. या वर्तुळाकार मार्गासाठीच्या (सर्क्युलर) तिकिटामध्ये कोणत्याही गावाला ४ दिवस राहता येतं. वातानुकूलित विश्रामकक्षामध्ये १५ तासांपर्यंत थांबण्याची मुभा असते.
जगन्नाथपुरी स्टेशनचा विश्रांतिकक्ष पाहून तर डोळे दिपूनच गेले. अत्याधुनिक हॉल, बसण्यास उत्तम खुर्च्या, भिंतींवर उत्कृष्ट पेंटींग्ज, बसल्या-बसल्या समोरच्या भव्य टी.व्ही. पडद्यावर सुटणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांच्या वेळा, प्लॅटफॉर्म क्रमांक ही माहिती दिसत होती. जवळच खानपानाकरता आधुनिक कॅफेटेरिया होता. तिथे पिझ्झ्यापासून पुरी-भाजीपर्यंत सर्व काही अतिशय स्वच्छ पद्धतीनं उपलब्ध होतं.
‘संपर्क क्रांती एक्सप्रेस’ ही गाडी राजधानी एक्सप्रेस सारखीच, पण या गाडीमध्ये तिकिटाच्या किंमतीत जेवण नसतं, मात्र भाडंही बरंच कमी असतं.. न्यूजलपईगुरी ते अलाहाबाद हा १८ तासांचा प्रवास राजधानी एक्सप्रेससारखाच सुखकर होता.
‘गरीब रथ एक्सप्रेस’ गाडीही अशाच वेगाने जाणारी आणि स्वस्त तिकीट असलेली. बऱ्याच मार्गांवर धावत असणाऱ्या या गाड्यांचा उपयोगही या योजनेत करून घेता येतो.
‘लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस’ ही या प्रवासातली मानाची गाडी. हा प्रवास २४ तासांचा. या प्रवासाने संपूर्ण प्रवासाचा शिणवटा घालविला होता. दादर स्टेशनवर परतलो तेव्हा या अभूतपूर्व प्रवासाची हृदय-सांगता झाली.
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply