महात्मा गांधींना दक्षिण अफ्रिकेत रेल्वेने प्रवास करत असताना फारच कटू अनुभव आला होता. ते फर्स्ट क्लासच्या डब्यामधून प्रवास करत असताना त्यांच्या डब्यात एक गोरा माणूस चढला. ‘भारतीय काळा माणूस माझ्याबरोबर प्रवास करण्यास धजतोच कसा?’ असं म्हणून गांधीजींना सामानासकट डब्यातून ढकलून देण्यात आलं होतं. या घटनेचे गंभीर पडसाद त्यांच्या पुढील जीवनातील विचारसरणीत पडले. आफ्रिकेतून भारतात परतल्यावर आपला देश जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या, बसण्यास लाकडी बाके असलेल्या डब्यातून त्यांनी भारत पालथा घातला. त्या प्रवासादरम्यान भारतीय जनता, तिची जीवनशैली, ते भोगीत असलेली गरिबी, शेतांत राबणारे पुरुष व स्त्रिया, पाण्याकरता वणवण भटकणारे लोक, असं सर्व दृश्य पाहून त्यांचं मन विषण्ण झालं. डब्यातील सहप्रवाशांशी हितगुज करताना त्यांना खऱ्या भारताचं दर्शन झालं. एकदा गांधीजी रेल्वेने प्रवास करत होते. नदीवरील रेल्वेपुलावर गाडी थांबली. नदीच्या पात्रात एका अर्धनग्न गरीब स्त्रीचे डोळे वस्त्र मिळवण्याकरता भिरभिरत होते. गांधीजींना खिडकीतून हे दृश्य दिसले. लागलीच त्यांनी आपल्या खांद्यावरचा पंचा नदीच्या पात्रात फेकला. पाण्याबरोबर वाहत जाऊन तो त्या स्त्रीच्या हातापर्यंत पोहोचला.
तो उचलून घेताना तिच्या लज्जित चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव उतरला. तो पाहून गांधींजींचे डोळे पाणावले. असे मनाला चटका लावणारे अनेक प्रसंग त्यांना भारतभरातील रेल्वे प्रवासात मिळत होते. त्यांनी तिसऱ्या वर्गातून प्रवास करणं कधीच सोडलं नाही, परंतु जसजशी त्यांची लोकप्रियता वाढू लागली. तसतसं त्यांच्या डब्यासमोरच्या प्लॅटफॉर्मवर दर्शनास होणारी गर्दी आवरणं फार कठीण काम होऊ लागलं. हा गोरगरिबांचा राजा मात्र त्यांच्या अडचणीच्या वेळी भर दंगेधोपे, जाळपोळ, चालू असतानाही रेल्वेनेच त्यांच्या मदतीला धावून जात असे. (उदाहरणार्थ, नौखाली, कलकत्ता, पंजाब, लाहोर.)
रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद, सुभाषचंद्र बोस व इतर अनेक महत्त्वाच्या व्यक्ती रेल्वे प्रवासामुळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचत असत. त्यांच्या अडचणी, दुःखं जाणून घेणं या नेत्यांना रेल्वेमुळेच सुकर झालं.
रशियन साहित्यिक व महान तत्त्ववेत्ता लिओ टॉलस्टॉय वेषांतर करून एक सामान्य खेडूत म्हणून दिवसचे दिवस रशियाभर रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करीत असे. डब्यातील सहप्रवाशांशी गावरान भाषेत गप्पागोष्टी करत असे. या सर्व अनुभवांतूनच त्याचं अजरामर साहित्य निर्माण झालं. योगायोग असा, की लिओ टॉलस्टॉयच्या जीवनातील शेवटचा प्रवासही रेल्वेनंच झाला. अखेरीस रेल्वेप्रवासादरम्यान त्याचा मृत्यू स्टेशनवरील वेटिंग रूम मध्येच झाला.
हिटलर व त्याचे सहकारी यांचं रेल्वेवर अतिशय प्रेम होतं. किंबहुना, १९३४ ते १९४५ या काळात जर्मन रेल्वे जगातील सर्वात उत्तम म्हणून गणल्या जात असत. हिटलर ज्या डब्याने प्रवास करत असे त्यात अनेक सोयी होत्या. एकसारखे दिसणारे अनेक गाडीचे डबे त्याच्या वापरात असत. शत्रू आपल्याला मारण्याचा प्रयत्न करील या भीतीने तो सतत डब्यांची व रेल्वेमार्गांची अदलाबदली एका वर्षामध्ये १९४४ साली अमेरिकेच्या या अध्यक्षाने ५०,००० मैल प्रवास केला होता.
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply