प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील प्रवासात काही गोष्टीचे महत्व असते. त्यामध्ये काही जणांना लोकलचे, तर काहींना बसचे. तर काहींना रिक्षाचे, मला मात्र रेल्वे ट्रॅकचे लहानपणी आमच्या गावातील रेल्वे ट्रॅक आमच्या जीवनाचा भाग होता. आमची वसाहत या ट्रॅक मुळे दोन भागात विभागलेली होती. मुंबईच्या भाषेत ईस्टआणि वेस्ट. ट्रॅक च्या दोन्ही बाजूस उंचवटा होता. कोल्हापूर ते मुंबई जाणाऱ्या मीटर गेज गाड्या येथून जात. दिवसातून तीन चार प्रवासी रेल्वे आणि दोन तीन मालगाड्या नक्कीच असत.
गाडीची वेळ झाली की आम्ही मुले उंचवट्यावर उभे राहून ड्रायव्हर, प्रवासी ते गार्ड सर्वांना हात हलवत टाटा असे ओरडत गाडी बरोबर वेगाने पळत जात असू. तर कधी गाडी येण्याच्या आधी रुळावर दोन , तीन पैश्याचे नाणे ठेवायचं आणि त्यावरून गाडीची चाके गेली की ते चपटे होई. त्या चपट्या नाण्यास भोके पाडून चक्कर तयार करून फिरवणे असे खेळ चालत. यशवंतनगर मध्ये चौथी पर्यंतच शाळा होती. वसाहतीतील मुलांना शाळे करिता एकतर सांगलीला बसने नाहीतर तीन किमी चालत माधवनगरला जावे लागे. बस खर्च फारसा कुणाला परवडत नसे त्यामुळे सर्वजण माधवनगरला जात. जाण्याकरिता रस्ता म्हणजे रेल्वे ट्रॅक. रुळाच्या दोन्ही बाजूस तीन तीन फूट रिकामी जागा. सायकल सोडून इतर कोणते ही वाहन येथून जाणे शक्य न्हवते त्यामुळे रोज सहा किलोमीटर ट्रॅकच्या कडेने जावे लागे. हा ट्रॅक जणू आमच्या शिक्षणाचा मार्ग होता.
वसाहतीतील 15 ते 20 मुले मुली साडे अकराच्या शाळे करिता सकाळी नऊ वाजता चादरीची पिशवी ( दप्तर) घेऊन निघत आणि रमतगमत शाळेत जात. रुळाच्या दुतर्फा आमचे अनेक रेंगाळण्याच्या आणि खेळण्याच्या जागा होत्या. गाव सोडले की सुरवातीलाच राजमाने मळा तेथे चिकू, आंबा, चिंच अशी झाडे होती. तेथून चोरून चिक्कू खाणे हा आमचा आवडता उद्योग. तेथून पुढे एक किमी. गेले की रेल्वे क्रॉसिंग, तिथूनच डाव्या बाजूस साखर कारखान्याला जाणारा रस्ता त्यावरून उसाच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर यांची येजा चाले . त्यामधील ऊस काढून खातखातच शाळेला जाणे हा आमचा उसाच्या सिझन मधला दिनक्रम असे. क्रॉसिंग ओलांडून जरा पुढे गेले की कारखान्याच्या साठवलेल्या मळीत तासनतास चपटा दगड आडवा मारून तो मळी च्या पृष्ठभागावर किती टप्पे मारतो हे पाहण्याचा खेळ चाले. वाटेत मिळालेल्या ऊसाला सर्वांच्या पिशव्या अडकवून ,एका टोकास ऐकाने आणि दुसऱ्या टोकास दुसऱ्याने पकडून दोन्ही रुळावरून तोल सांभाळत शाळेत पोहचत.
पावसाळ्यात तर मज्जा काही वेगळीच. पावसापासून डोके, दप्तर व पाठ याचा फक्त बचाव करण्यासाठी गोंणपाटाची खोपी उपयोगी येई. छत्री, रेनकोट हे शब्दच न्हवते. घसरून पडणे हे रोजचेच असे पण शाळेस दांडी मारण्याकरिता हे फारच उपयोगी पडे.( मुद्दाम पडणे हे स्किल असे) अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी शाळेस जात असताना रुळाच्या कडेस हमखास नारळ, लिंबू, बिब्बा अश्या वस्तू दिसत. काही त्यास घाबरत तर काही तोच नारळ फोडून खात. कधी रुळावर मेलेली व्यक्ती दिसे व मोठ्यांची चर्चा कानावर पडे, रेल्वे रुळावर पडला की कुणी टाकला. तेथून पुढील दोन तीन दिवस तेथून जाताना …रामरक्षा तोंडात असे. या वाटेवर काही खाज खुजलीची झाडे विशिष्ट दिवसात दिसत त्याची पाने मित्रांना लावण्याचा खोडसाळपणा चाले. त्याचे औषध ( झेंडूची पाने) लगेचच त्याला लाऊन दिले जाई.
मी पाचवीत असताना मला चौथी च्या स्कॉलरशिप चे महिना 5 रुपया प्रमाणे वर्षाचे 60 रुपये मिळाले होते. ते साठ रुपये आईस देण्याकरिता मुठीत घट्ट पकडून मी आणि माझी बहिण तीन किमी घरी पळत आलेले आज हि आठवते. पहिली मिळकत आईच्या हाती देण्याचा आनंद आजच्या लाख रुपयात नाही. बरेच वेळा इंजिन shuntting करिता स्टेशन वरून दोन ,दोन किलोमीटर उलटे येई, त्या वेळेस ड्रायव्हर काका आम्हास इंजिन वर बसवून घेत आणि यशवंतनगरच्या वाटेवर सोडत.
असे अनेक अनुभव देणारी मीटर गेज गाडी ब्रॉड गेज मध्ये रुपांतरीत झाली आणि तेथील ट्रॅक लांब गेला. ट्रॅक चे रूपांतर रस्त्यात झाले आणि आमचे शाळेस जाणे आणि त्याचा, अनुभव बदलत गेला. हा ट्रॅक फक्त शाळेत पोहचण्याचा नुसता मार्ग न्हवता,तर त्याने आमचे जीवन अनुभवांनी भरून टाकले.मैत्री,सहजीवन, शेअरिंग या गोष्टी आम्ही या वाटेवरच अनुभवल्या आणि आत्मसात केल्या. आनंदाचे क्षण सुद्धा याच ट्रॅक वर अनुभवले. तर भीतीवर मात करण्याचे इथेच शिकलो. कधी जायचे कधी थांबायचे हे या ट्रॅक आणि त्यावरील सिग्नलने शिकवले. म्हणूनच जीवनाची गाडी योग्य मार्गावर राहिली.
— जयराम भिडे
12/7/20
Leave a Reply