रेल्वेची चाकं व्यवस्थितपणे, विनासायास फिरत जातील अशा ‘दोन समांतर रेषेत असलेल्या; कठीण, तरीही गुळगुळीत अशा; सलग व लांबच लांब लोखंडी पट्टया’ म्हणजे रेल्वेचा ‘ट्रॅक.’ तो व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक धोकादायक अडचणींवर मात करावी लागते आणि तो बनविण्यासाठी कल्पनेबाहेर खर्च येतो. आजच्या जमान्यात रेल्वेची बांधणी ही बाब अतिशय सहजपणे गृहीत धरली जाते, त्यामुळे त्याकडे आवर्जून फारसं लक्षही दिलं जात नाही; पण, १५० वर्षांपूर्वी भारतात या लोखंडी सडका उभारण्यास सुरुवात झाली तेव्हा मात्र बहुसंख्य लोकांचे डोळे विस्फारले गेले होते. प्रथम हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे असा जनसमज होता. ‘डब्यांची गाडी या सडकेवरून जाताना बाजूच्या घरांवर कोसळेल’ या भीतीने त्याविरुद्ध अनेक तक्रारी नोंदविल्या गेल्या होत्या. या गैरसमजांचं निराकरण करणं हे एक मोठं कामच होऊन बसलं होतं व याकरता सरकारकडे अनेक शिष्टमंडळं कैफियत मांडण्यासाठी गेली होती.
लोखंडी सडकांआधी, म्हणजेच रेल्वेयुग येण्याच्या आधी रोमन राज्यात लाकडी फळ्यांचा रुळांसारखा वापर करून, जड सामान एका गावातून दुसऱ्या गावात हलविलं जात असे. १५ व्या शतकात युरोपमध्ये लाकडी अथवा दगडी किंवा विटांच्या समांतर पट्ट्यांवरून घोडे, गाढवं जोडलेल्या छोट्या गाडीचे डबे खेचून नेले जात असत. त्यांना ‘ट्रेनवेज्’ किंवा ‘वॅगनवेज्’ असे म्हणत. १७ व्या शतकापासून या लाकडी व इतर मार्गाऐवजी लोखंडी पट्ट्या वापरण्यास सुरुवात झाली होती.
हे रूळ जमिनीला घट्टपणे धरून राहावेत याकरता अनेक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांदरम्यान खूप समस्यांना तोंड द्यावं लागलं. नंतर त्यावर बरंच संशोधन झालं व सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक अशा लोखंडी सडका तयार झाल्या. मात्र आजही त्यात सुधारणा होतच आहेत.
भारतीय रेल्वेबांधणीत, रुळांच्या मध्यात ठरावीक अंतरावर रुळांना काटकोनात राहतील अशा लाकडी फळ्या (Sleepers) बसविण्यात आल्या. रशियन रेल्वेमार्गावर तेथील रुळांच्या खालच्या बाजूस रुळांबरोबर पुढे जाणारे स्लीपर्स आहेत. भारतात ते लाकडाचे, ओतीव लोखंडाचे किंवा सिमेंटचे आहेत. रुळांच्या बाजूंनी टाकलेल्या खडीमुळे ज्याला Ballast म्हणतात त्या खडी व स्लीपर्सच्या आधारानं रूळ जमिनीला घट्ट पकडून राहतात. रेल्वेरुळांच्या लोखंडात मँगेनिज धातूचं प्रमाण जास्त असल्यानं त्यांना बळकटी येते.
जुन्या पद्धतीचे रूळ ‘बुल-हेडेड’ असत, तर सध्या नेहमीचे वापरात असलेले रूळ ‘फ्लॅट फोटेड’ या प्रकारात मोडतात.
साधारणपणे मुख्य मार्गावर रुळाची लांबी ४२ फूट, तर बाजूनं येणाऱ्या उपमार्गावरील रुळाची लांबी ३० फूट असते. ज्या लोखंडी पट्टीने दोन रूळ एकमेकांना जोडले जातात तिला फिशप्लेट म्हणतात. या फिशप्लेटस् रुळाच्या आतील व बाहेरील अशा रीतीने दोन्ही बाजूंना फिशबोल्ट्सने पक्क्या केलेल्या असतात. त्याकरता खास छिद्रांची सोय असते. दोन रुळांच्या जोडणीदरम्यान मध्यात थोडी मोकळी जागा सोडलेली असते, कारण तीव्र उन्हाळ्यात व थंडीत रूळ प्रसरण किंवा आकुंचन पावतात. घातपातीकृत्यात याच फिशप्लेट्स काढून आजही गाडी घसरवली जाते. आजकाल बऱ्याच ठिकाणी रूळ एकमेकांना वेल्डिंग करून जोडले जातात. विशेषत: नदी व खोऱ्यांमधील मोठमोठे पूल, तसंच घाटातील, अवघड वळणांच्या जागी ही काळजी घेतली जाते.
भारतामध्ये रुळांसाठी तीन प्रकारच्या गेज पद्धती आहेत. दोन समांतर रुळांमधील अंतरानुसार ती पद्धत ओळखली जाते. ब्रॉड गेज रुळांमधील अंतर ५ फूट ६ इंच, मीटर गेजचे ३ फूट ३ इंच व नॅरो गेजमध्ये हेच अंतर २ फूट ५ इंच आहे. जगातील प्रत्येक देशात रुळांमधील ही अंतरं वेगवेगळी असतात. सन १९५० मध्ये भारतातील या तीन प्रकारच्या गेज पद्धतीप्रमाणे रुळांच्या लांबीचे आकडे पुढीलप्रमाणे होते.
- ब्रॉड गेज – १६,००० मैल
- मीटर गेज- १३,००० मैल
- नॅरो गेज – ३,००० मैल
रुळांचं वजनाचं कोष्टक हे त्या रुळाच्या लांबीच्या प्रमाणात ठरवलं जातं. एक यार्ड (तीन फूट) लांबीसाठी ब्रॉड गेजच्या रुळाचं वजन ९० पौंड, तर मीटर गेजसाठी तेवढ्याच लांबीसाठी ते वजन ५० ते ६० पौंड असतं.
या सर्व रेल्वेमार्गांची सतत देखरेख करण्याचं काम गुंतागुंतीचं असतं. उदाहरणार्थ, स्लीपर्स सारखे बदलणं, सांध्यांच्या फिशप्लेटस्चं तेलपाणी पाहणं, खडी बदलणं हे काम करत असताना रुळाला कुठे तडा गेल्याचं आढळून आल्यास गँगमन धोक्याचा सिग्नल देतो. आजकाल मोबाईलमार्फत एस.एम.एस. करून धोक्याची बरोबर जागा कळविली जाते. आता ‘वायरलेस सेन्सर सिक्युरिटी सिस्टिम’च्या मदतीनं रुळांना पडलेले तडे शोधले जातात.
सुरुवातीला ताशी २० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्यांच्या रेल्वेमार्गांवर आता ताशी १६० कि.मी. वेगाने जाण्याची क्षमता असलेल्या गाड्या जाऊ शकतील या दृष्टीने रुळांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
जगभरातील सर्व देशांतील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ७.७० लाख मैल आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीला तीस प्रदक्षिणा घालता येतील इतकी अवाढव्य रुळांमधील अंतर सांगणारं कोष्टक
नॅरो मेज-२ फूट
नॅरो गेज – २ फूट ५ इंच
मीटर गेज – ३ फूट ३/ इंच
स्टॅन्डर्ड गेज – ४ फूट ५/, इंच
ब्रॉड गेज – ५ फूट ६ इंच
आहे. तसंच, जगभरात रेल्वेगाड्या ६२०० दक्षलक्ष मैल धावतात. हे अंतर सूर्यापासून प्लेटो या ग्रहापर्यंत असणाऱ्या अंतराच्या तोडीचं आहे.
औद्योगिक व आर्थिक क्रांतीचा अभूतपूर्व मिलाफ जगभरच्या या रेल्वे रुळांनी घडविला आहे आणि त्यातही जगामधील सर्वांत प्रभावी औद्योगिक संकुल म्हणून भारतीय रेल्वेनं अग्रस्थानी जे मानाचं स्थान पटकावलं आहे, ते तर आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पदच आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply