लांब पल्ल्याची गाडी अखेरच्या स्टेशनात म्हणजे मुख्य स्टेशनात आल्यानंतर तपासणीसाठी व इतर छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी नेतात ते ठिकाण म्हणजे ‘यार्ड’. यार्डात प्रत्येक डब्याची कसोशीनं तपासणी होते, स्वच्छता होते व ती गाडी परत परतीच्या प्रवासासाठी सज्ज होते. या सर्व कामासाठी अनेक कर्मचारी फार कठीण परिस्थितीत यार्डात काम करीत असतात. उदाहरणार्थ, मुंबईतील माझगाव रेल्वेयार्डाच्या प्रसिद्ध झालेल्या समस्यांकडे पाहता येईल. काही वेळा कर्मचाऱ्यांना यार्डात जाण्यास योग्य रस्ता नसतो. ज्या रुळांवरून अनेक गाड्या वेगाने धावत असतात, त्या मार्गावरून जिवावर उदार होऊनच लाईन ओलांडावी लागते. त्यात भर म्हणून पावसाळ्यात वाढलेलं गवत, पाण्यानं भरलेले खड्डे यांचा सामना करावा लागतो आणि रात्रपाळीच्या कामगारांना तर ही सगळी कसरत काळोखातून करावी लागते. मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या खाली उभं राहून काम करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यानं सर्व काम वाकूनच करावं लागतं. चाकं तपासण्यासाठी बाजूनं जाण्यासाठी पुरेशी जागाच नसते. या पासून कँटीन फार दूर असल्यानं कँटीनपर्यंत पोहोचण्यासाठी बरंच चालावं लागतं आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दुपारचा डबा अपरिहार्यपणे उन्हात कुठेतरी झाडाखाली बसून खावा लागतो. माझगाव रेल्वेया मध्ये अतिशय गलिच्छ अशी एक छोटीशी पत्र्याची शेड एका गटाराजवळ बांधलेली आहे. अशा परिस्थितीत काम उत्तम त-हेनं करणं अशक्य होत चाललेलं आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा व वाडीबंदर या यार्डात डब्यांची मोठी दुरुस्ती केली जाते. तिथे दिवसेंदिवस सुट्या भागांची फार चणचण भासते आहे. शेवटी ठरावीक वेळात गाडी बाहेर काढणं आवश्यक असल्यानं ‘इसकी टोपी उसके सर’ या म्हणीप्रमाणे एका गाडीचे पार्ट्स दुसऱ्या गाडीला लावण्यावाचून पर्याय उरत नाही.
मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून, त्या प्रमाणात सुट्या सामानाचा पुरवठाही होत नाही. तरीही, अजून तरी गाडी रुळांवर येताना तिच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही असं रेल्वे जनसंपर्क अधिकारी ठामपणे सांगतात. हे यश यार्डातील कर्मचाऱ्यांचं आहे.
प्रवासीगाडी पुन्हा उत्तम स्थितीत आणून रुळांवर नेणं यामध्ये रेल्वे यार्डाची फार महत्त्वाची भूमिका असते. त्यामध्ये होणारी लहानशी चूकही प्रवाशांसाठी महागात पडते हेही तितकंच कठोर सत्य आहे.
–डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply