रेल्वेनं गेल्या २० वर्षांत अनेक नवीन प्रवासी गाड्या सुरू केल्या. त्यांपैकी गेल्या ४ वर्षांत प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या गाड्या म्हणजे ‘दुरान्तो एक्सप्रेस’. ‘दुरान्तो’ हा बंगाली शब्द असून, त्याचा अर्थ दूर पल्ल्याची शेवटच्या स्थानकापर्यंत सतत धावणारी गाडी. या गाड्यांची सुरुवात ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना झाली होती. त्यामुळे पहिली दुरान्तो मुंबई-कलकत्ता सुरू झाली व हळूहळू भारतभरात अनेक मार्गांवर दुरान्तो गाड्या धावू लागल्या.
कुर्ला ते एर्नाकुलम (केरळ) ही १२९३ कि.मी. अंतर धावणारी दुरान्तो ही यांपैकी एक महत्त्वाची गाडी. या गाडीचा महाराष्ट्र (कोकण), गोवा, कर्नाटक व उत्तर केरळ असा २२ तासांचा प्रवास म्हणजे रेल्वेप्रेमींसाठी सुखद अनुभव आहे. या गाडीला तांत्रिक गोष्टींकरता रत्नागिरी, मडगाव, मंगलोर, कोझीकोड (कालिकत) येथे थांबे आहेत; परंतु सर्व प्रवासी शेवटच्या स्टेशनपर्यंत जाणारे, त्यामुळे उतरणाऱ्या व चढणाऱ्या प्रवाशांची गडबड-गोंधळ अजिबात नसतो.
संपूर्ण गाडीला डिझाईन केलेल्या हिरवट-पिवळ्या रंगाच्या पातळ आवरणाने वेगळी रंगविल्याने ती इतर गाड्यांपेक्षा स्वतंत्रपणे अशी उठून दिसते. गाडी पूर्णपणे वातानुकूलित, पैंट्रीचा डबा एकदम चकाचक, सीटखालील काळपट, परंतु गालिच्यासारखे फ्लोअरिंग, या गालिच्याची सफाई करणारे सतत स्प्रे मारणारे कर्मचारी – त्यामुळे या गाडीमध्ये अगदी हॉटेलचं वातावरण अनुभवण्यास मिळतं. सकाळी उठता उठताच चहा, कॉफी, बिस्किटं हजर. मग खाण्याचा माराच असतो. ऑम्लेट, कटलेट, केशरी दूध, चिकन, पनीर ते थेट मोतीचूर लाडू, गुलाबजामपर्यंत विविध प्रकार. खाणं आणून देणारी सर्व नेपाळी मुलं रुबाबदार कपड्यांत येतात. उशाशी ताजं वर्तमानपत्र, प्रशस्त बाकं, उत्तम खिडक्या, जागोजागी चार्जरसाठी प्लग्ज अशा सुखसोयींनी युक्त असलेल्या या गाडीत अनेक प्रवासी लॅपटॉप लावून कामात गर्क असतात.
संपूर्ण प्रवासात १७१ स्टेशनं लागतात आणि प्रत्येक प्रदेशाचा निसर्ग परस्परांहून अगदी वेगळा आहे. या प्रवासात कर्नाटकाची हिरवळ, वाटेत येणाऱ्या अनेक नद्या, खाड्या, त्यांवरील उत्तम पूल पाहता येतात; तर केरळात गाडी समुद्राच्या कडेकडेने जात असते. दर ५-१० कि.मी.वर छोटी सुबक स्टेशनं व तिथले रिकामे प्लॅटफॉर्मे, दोन्ही बाजूंनी हिरव्यागार नारळ-पोफळीच्या वाड्यांतील आकर्षक बंगले; त्यांच्या सुंदर लाल रंगाच्या भिंती, घरातील, अंगणातील पांढऱ्या संगमरवरातील काम; सारंच वेधक दिसतं. या भागात अरब देशांतील पैसा जागोजागी बोलतो. सर्व स्टेशनांवरील स्वच्छता हे या मार्गावरचं वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात कोकणातील रेल्वेमार्ग बेभरवशाचा असल्याने या गाडीला ८-८ तास उशीर होतो वा गाडी दुसऱ्या मार्गाने न्यावी लागते. त्यावेळी प्रवासी कमी असतात, परंतु एकंदरीत दुरान्तो गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे हे या गाडीला असणाऱ्या भरपूर गर्दीतून नेहमीच लक्षात येतं.
वातानुकूलित (एसी) दुसऱ्या वर्गाचं तिकीट ज्येष्ठ नागरिकांसाठी १७५५ आहे आणि त्यांतील २५० रु. खाण्याच्या सुविधेचे आहेत.
कोकणचे छाती दडपून टाकणारे बोगदे, गोव्यातील मांडवी नदीवरील अजस्र पूल, कर्नाटकची हिरवीगार बनं, शरावती नदीचं पात्र, मागे टाकत केरळच्या समुद्राला सलाम करीत पुढे धावणारी दुरान्तो एक्सप्रेस २२ तासांनी एर्नाकुलम या शेवटच्या स्टेशनात शिरते आणि एका अविस्मरणीय प्रवासाची सांगता होते.
कोकण किनारपट्टीवरील दिघी बंदर ते कोकण रेल्वेवरील महत्त्वाचं असलेलं स्टेशन रोहा’. ह्या दोन्ही जागा एकपदरी ब्रॉडगेजने जोडणारा ३३ कि.मी. लांब रेल्वेमार्ग बांधण्याच्या कामास जोरात सुरवात झाली असून त्यावर ८४ छोटे-मोठे पूल व ४ बोगदे आहेत. प्रकल्पासाठी लागणारा निधी ८०० कोटी रुपये एवढा अपेक्षित आहे. या मार्गामुळे परदेशातून होणारी मालाची आयात, तसेच परदेशांना केली जाणारी निर्यात-आयात संपूर्ण देशातून मुंबईपर्यंत न येता होणार आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply