वळणा मागुनि राजस वळणे टाकित मागे,
हलके फुलके घेऊनि वळसे मार्गावरती,
कैफात वेगळ्या अन् धुंदित आगळ्या,
कधी न कळले, आलो केव्हां एकसष्ठीच्या वळणावरती ।
आलो केव्हां एकसष्ठीच्या वळणावरती ।।धृ।।
किती करावे अन् काय करावे, उत्साहाला उधाण आले,
सुर-तालांची पडतां गांठ, जीणे अवघे लयींत जगले ।
नाद-ब्रम्हीं टाळी लागतां, नसा-नसांत भिनले गाणे,
सुर-लयींच्या तालावरती, धुंद गायनीं हे आयु सजले ।।
कैफात वेगळ्या अन् धुंदीत आगळ्या,
कधी न कळले, आलो केव्हां एकसष्ठीच्या वळणावरती ।।१।।
नित्य नवा ध्यास उरीं, ज्ञान-संपदा कवेंत होण्याचा,
जगा वेगळा, छंद आगळा ध्यास सदा नित नाविन्याचा ।
जिद्दी परी हट्टही मोठा, नूतन सारे, सगळे शिकण्याचा,
वाटचाल ही स्वच्छंदी, सिंहापरी, यज्ञांत वाटा पत्नीचा ।।
कैफात वेगळ्या अन् धुंदीत आगळ्या,
कधी न कळले, आलो केव्हां एकसष्ठीच्या वळणावरती ।।२।।
आंस मनीं, अहंकार अन् ईर्षा, दूर दूर सारण्याची,
वाटचाल चुस्त-मस्त, म्हणूनि लाभली, स्वानंदाची ।
सान बाळा परी, मनीं सदैव, नित ओढ नाविन्याची,
लीन राहुनि ईशाचरणी, खाण गवसली सौख्याची ।।
कैफात वेगळ्या अन् धुंदीत आगळ्या,
कधी न कळले, आलो केव्हां एकसष्ठीच्या वळणावरती ।।३।।
नव्हते ठावूक नटणे, ज्ञाततयां नवनवीन जपणे,
ध्येयावरती नजर ठेवुनि, अविरत यनी सदैव झटणे,
रंग-रंगले, नाना ढंगी, असे इंद्रधनुहे सुरेल देखणे ।।
कैफात वेगळ्या अन् धुंदीत आगळ्या,
कधी न कळले, आलो केव्हां एकसष्ठीच्या वळणावरती ।।४।।
-गुरुदास / सुरेश नाईक
सप्टेंबर २३, २००५२, विश्वकर्मा, पुण्यनगरी
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply