वाढत्या लोकसंख्येच्या रेटयाने माणसांच्या मुलभूत गरजा भागवीताना सुखसोयी व विकासाच्या नावाखाली सुंदर वसुंधरेचे अगणित लचके तोडले जात आहेत याला कुणीही अपवाद नाही. पर्यावरणाचे ऐवढया प्रमाणात प्रदुषण होत आहे की तापमान वृद्धीने नैसर्गिक ऋतू बदलत आहेत. पाऊस कुठे कमी तर कुठे जास्त तर कधी अवेळी पडल्याने
शेतकर्यांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पाणी टंचाईने शहर व गावातील माणसांना टँकरने किंवा मैलोंनमैल लांब जाऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मुख्य म्हणजे पाण्याचे जमिनीतील स्त्रोत दिवसेंदीवस कमी होत आहेत याला आपली जीवनशैली जबाबदार आहे.
आजकाल “रेनवॉटर हारवेस्टींग” हा शब्द प्रयोग पाण्याच्या संबंधात सर्वप्रकारच्या मिडीयातून ऐकाला व वाचायला मिळतो. ४००० हजार वर्षापूर्वी पॅलेस्टाईन व ग्रीस या देशात पावसाचे पाणी साठविण्यासाठी उपकरणे व आवजारे वापरली जाईची अशी नोंद आहे. कैक वर्षापूर्वी बलूचिस्तान व कुचमधील शेतकरी पावसाचे पाणी साठवून छोटया छोटया कालव्यांच्या साहयाने शेतीसाठी वापरत असत. भारतातील कित्येक किल्यांमध्ये तळी व विहिरीतून पावसाचे पाणी पिण्यासाठी व इतर वापरासाठी उपयोगात आणीत असत.
मुंबईतील गृहनिर्माण संस्था ईकोफ्रेंडली करण्याचे उद्दीष्ट नक्कीच काळाशी सुसंगत आहे यात वाद नाही. आज निसर्गाने पाणी एवढे स्वच्छ शुद्ध व मुबल प्रमाणात दिले आहे ते जरी आपण जपून वापरले व त्याचे योग्य नियोजन केले तर असलेले पाणी आपल्या सर्वाना पूरून उरेल ऐवढे आहे.
पाणी वापरताना योग्य ती काळजी घेत नाही आणि मग पाऊस कमी पडला नद्या तळी विहीरींचे पाणी आटले आणि बोरवेल खणतांना खूप खोल खणावे लागले की आपण निसर्गाला दोष देत राहातो. पण पाणी मिळविण्यासाठी जेवढे खोल खणावे लागते तेवढे जरी पाणी कसे साठवावे व जिरवावे हया समस्येच्या खोलात जाऊन विचार व कृती केली तर पाण्याची समस्या
नक्की जास्त न खणता सुटेल.
पावसाचे पाणी घराच्या छपरावरून सोसायटीच्या गच्चीतून नद्या व शेतांतून गटारात वाहून जाते किंवा समुद्रास मिळते ते विविध पद्धतिने साठवून पिण्यासाठी शेतीसाठी आणि काही जमिनीत मुरवून जमिनी खालील पाण्याचा साठा व पातळी वाढण्यास उपयोगात आणता येते. यालाच “रेनवॉटर हार्वेस्टींग” म्हणतात. असो.
मुंबईत पिण्याचे पाणी शंभर दोनशे किलोमिटरवरून मोठमोठया पाईपांतून आणले जाते व त्याचे शुद्धीकरण करून सर्व मुंबई व आसपासच्या परिसराला पुरविले जाते. पिण्याचे शुद्ध पाणी मुंबईत येताना खुप ठिकाणी चोरले जाते व त्याची गळतीही होते. ऐवढे शुद्ध पाणी मुंबईत संडास व तत्सम कारणांसाठी वापरले जाते तर काही नागरीक पाण्याचा मोठया प्रमाणावर अपव्यय करतात. पाण्याची नासाडी व गरजा कमी केल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई भविष्यात जाणवणार नाही असे वाटते. सर्वच पक्षांची इच्छाशक्ती व नागरीकांच्या सकारात्मक मानसिकतेवर अवलंबून आहे.
शहारांतील सोसायटींच्या जागेत पावसाचे पाणी ऐवढया मोठया टाक्यांतून जमा करून पूर्ण वर्षासाठी पुरविणे जागे अभावी शक्य नाही. संडासासाठी वापरलेले पाण्या व्यतिरिक्त घराघरातील सांडपाणी एका मोठया टाकीत साठवून त्यावर प्रक्रिया करून परत गार्डनसाठी व संडास बाथरूमसाठी वापरता येऊ शकते. याने पाण्याची नासाडीही होणार नाही व पैशाची बचत होईल कारण बीएमसीचे पाणी अंघोळ व पिण्यापुरतेच वापरले जाईल. शहारातील गृहनिर्माण सहकारी संस्थांनी अश्या प्रकारचे उपक्रम राबवावे म्हणून मुंबई महा.नगरपालिकेने त्यांच्या टॅक्स्मध्ये काही सवलतीही जाहिर केल्या आहेत. ७० ते ८० फ्लॅट असलेल्या प्रत्येक बिल्डींगच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुर्नवापरासाठी उपयोगात आणण्यासाठी अंदाजे खर्च एक ते दीडलाखाच्या घरात येऊ शकतो. मुंबईत विकासकाला इमारत बांधण्यासाठी बीएमसीकडून नाहरकत परवांगी मिळण्यासाठी आधी बोरवेल खणावी लागते.
विषेशतः मुंबई व आसपासच्या परिसरातील सर्व विहिरी बुजवून टाकल्या आहेत त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक झरे बंद झाले आहेत. रस्त्यांचे सिमेंटीकरण व डांबरीकरणाने शहरातील पावसाचे पाणी जमिनीत न मुरता गटारांतून वाहून जाते व जमिनीतील पाण्याचा साठा व पातळी कमी होते. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने जमिनीखालील पाणी गरजेच्या वेळी उपयोगात आणता येते. म्हणून हल्ली शहरातील सर्व रत्यांच्या दुतर्फा पेवमेंन्ट ब्लॉक्स् टाकले जातात ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरावे. जमिनीखालील पाण्याचे साठे एकमेकांना जोडलेजाऊन पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते तसेच बाष्पिभवन क्रियेने उडून जाणारे पाणी जमिनीत मुरल्याने वाचते. जिवंत झरे मृत न होता पाणी मुरल्याने जिवंत राहाण्यास मदत होते. बोरवेल खणताना जास्त खोल खणावे लागत नाही व त्याला पाणी वर्षभर पुरू शकते.
ज्या गावात पावसाचे पाणी धरणांतून जमा होत नाही किंवा पाऊस कमी पडतो व रोजच्या वापररासाठी पाण्याचा जमिनीतून उपसा होतो तेथे पावसाचे पाणी अडविण्यासाठी जमिनीत १ ते २ मीटर लांबीरूंदीचे व ३ मीटर खोलीचे चर खणून त्यात दगडगोटे व रेती व वाळू घालून बुजविलेले असतात ज्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते हे फक्त जिथे ओसाड जागा आहे किंवा खेडेगावात करता येते. लहान नदी ओहोळ व जिथून आजूबाजूचे पावसाचे पाणी वाहात येते अशा जागी १ मीटर रूंदीचे व १० ते २० मीटर लांबीचे व १ ते १.५ मीटर खोलीचे खडडे खणून त्यात पाणी गाळले जाईल अशा प्रकारच्या विटांचे तुकडे वगैरे टाकले जातात असे करण्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरून पाण्याचा साठा व पातळी वाढविण्यास मदत होते व विहिरींना हातपंप व बोरवेलना पाणी वर्षभर पुरण्यास मदत होते.
केरळ शेतकरी विद्यापीठ व आयसीएआर यांच्या विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र कन्नुर यांनी काही ठिकाणी पावसाचे पाणी जमिनीवरून नैसर्गिकरित्या वाहून जाऊ नये म्हणून त्याला
बांध बंदिस्ती करून पाणी जमिनीत मुरल्याने जमिनीखाली
पाण्याचे साठे व पातळी वाढण्यास मदत झाली आहे.
आपण बँकेत पैसे ठेवतो व जेव्हां त्यांची गरज लागते तेव्हां काढतो कधी कधी एफ.डी. करतो कधी व्याजाने पैसे घेतो तसाच पाण्याचा व्यवहार. आपल्या कडील जास्तीचे पाणी त्यांनी बनविलेल्या कृत्रिम तलावात नेऊन ओतायचे व जेव्हां लागेल तेव्हा भरून न्यायचे. अशा प्रकारचा व्यवहार इतरही माणसे करू शकतात. तीच ही “वॉटर बँक”. या व्यवहारात फायदे तोटेही आहेत ते समजूनच पाण्याचा व्यवहार करावा.
सोलापूरातील श्री.अरूण देशपांडे यांनी गरीब व आवर्षणग्रस्त गावाकर्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागूनये व शेतासाठी व पिण्यासाठी पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून “वॉटर बँके”च्या मदतीने गावकर्यांच्या पाण्याच्या गर्जा भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत सध्या हे प्रायोगीक तत्वावर चालले आहे त्याला चांगला प्रतिसादही लाभत आहे.
भविष्यात पाण्याला सोन्याची किमंत येणार आहे आणि सोन्यासाठी जशी युद्धे झाली तशी पाण्यासाठी युद्धे होण्याची वेळ येऊ नये हिच ईश्वर चरणी प्रार्थना !
जगदीश पटवर्धन बोरिवली (प.)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply