नवीन लेखन...

‘राजा’ चित्रपंढरीचा

‘लाखाची गोष्ट’ चित्रपट तयार झाला होता. सर्व तंत्रज्ञांनी एकत्र बसून त्याची ट्रायल पाहिली. संपूर्ण चित्रपट पाहून कुणीही त्यातील विनोदी प्रसंगांच्या वेळी हसलं नाही. दिग्दर्शक राजा परांजपे निराश झाले. तेव्हा एका तरुणाने त्यांना विनंती केली की, ‘मला दोन दिवसांची मुदत द्या, मी नव्याने या चित्रपटाचं संकलन करतो. त्यानंतर मला आपला अभिप्राय द्या.’ राजा परांजपे तयार झाले. त्या तरुणाने दोन दिवसांनंतर पुन्हा चित्रपटाचा शो ठेवला. यावेळी चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व तंत्रज्ञ हसत होते. ही अजब किमया केली होती, संकलनातील कल्पक जादूगार ‘राजा ठाकूर’ या तरुणाने! त्यानंतर राजा परांजपे यांच्या अनेक चित्रपटांचे संकलक म्हणून राजा ठाकूर यांनी काम केले.
राजा ठाकूर यांचा जन्म १९२३ साली कोल्हापूर जवळील फोंडा येथे झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यात होते. ते नाट्यरसिक होते. गावात नाटक आलं की, त्यातील कलाकारांची ते हौसेनं जेवणाची व्यवस्था करायचे. साहजिकच त्या कलाकारांना पाहून राजाला नाटकाची गोडी लागली. देशबंधू नाटक कंपनीत राजाने प्राॅम्टींगचे काम केले. काही दिवसांनी जुन्नरकर यांचे हाताखाली संकलन शिकण्यास सुरुवात केली. चित्रपटाविषयीचे राजाचे आकर्षण पाहून जुन्नरकरांनी त्याला वसंत कुलकर्णी यांचेकडे दिग्दर्शन सहाय्यक म्हणून पाठवले.
काही दिवसांतच मा. विनायक यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राजा ठाकूर यांची वर्णी लागली. १९४८ साली राजा परांजपे यांच्या ‘बलिदान’ चित्रपटापासून त्यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामास सुरुवात केली.
‘जिवाचा सखा’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटांच्या दरम्यान कॅमेरामन बाळ बापट यांच्याशी राजा ठाकूरांची छान मैत्री जमली. हे दोघेही कॅम्पमधील ‘वेस्टएंड’, ‘एम्पायर’ अशा टाॅकीजमध्ये जाऊन इंग्रजी चित्रपट पहात असत. ते पाहून आल्यावर त्या चित्रपटातील तंत्रज्ञानाविषयी राजा परांजपे यांच्याशी चर्चा करीत असत. या अभ्यासातूनच ‘पेडगावचे शहाणे’ मधील कात्रीचा प्रसंग राजा ठाकूर यांनी सर्वोत्तम केला.
१९५२ सालातील ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांनी स्वतंत्र दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. एकूण २५ वर्षांच्या कालावधीत २५ चित्रपट केले. त्यातील २२ मराठी, २ हिंदी व १ इंग्रजी. मराठी चित्रपटांसाठी मराठी साहित्यातील नामवंत लेखकांच्या कथांना प्राधान्य दिलं.
२२ मराठी चित्रपटांतील चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ते म्हणजे ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘रंगल्या रात्री अश्या’, ‘एकटी’, ‘मुंबईचा जावई’.
तीन चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला, ते म्हणजे ‘मुंबईचा जावई’, ‘घरकुल’, ‘जावई विकत घेणे आहे’.
राजा ठाकूर यांनी मध्यमवर्गीय जीवनावरील विषयांबरोबरच ऐतिहासिक ‘रायगडचा राजबंदी’, पौराणिक ‘गजगौरी’ (प्रभात), धार्मिक ‘संत गोरा कुंभार’ असेही चित्रपट केले.
संगीतकार सी. रामचंद्र यांना राजा ठाकूर यांनी त्यांच्या ‘धनंजय’ या चित्रपटात नायकाची भूमिका दिली होती. त्याच सी. रामचंद्र यांच्यावर १९७१ सालातील ‘घरकुल’ या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवली. त्यातील इतर अन्य गाण्यांबरोबरच ‘पपा सांगा कुणाचे..’ हे गाणं खूप गाजलं होतं.
त्यांचे मराठी चित्रपट थिएटरमध्ये काही महिन्यांच्यापुढे चालले नाहीत, मात्र ताहीर हुसेन निर्मित, त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच हिंदी चित्रपट ‘जखमी’ हा मुंबईत तब्बल ४० आठवडे तुफान चालला. त्यानंतर दिग्दर्शन करायला घेतलेल्या ‘रईसजादा’ या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान त्यांचे निधन झाले. अवघ्या ५१ वर्षांच्या जीवनप्रवासात एकाहून एक सरस चित्रपट देऊन हा ‘राजा’ अर्ध्यातूनच मायानगरी सोडून गेला…
आजही मला त्यांचा ‘एकटी’ हा चित्रपट फार आवडतो.‌ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम चित्रपट आहे. राजा ठाकूर दिग्दर्शन करताना कलाकारांना स्वतः अभिनय करुन दाखवत नसत, उलट त्यांना काय अपेक्षित आहे, ते कलाकारांना समजावून सांगत असत. ते कलाकारही मातब्बर होते, त्यांनी दिलेल्या भूमिकेचं चीज केलं.
कॅमेरामन बाळ बापट आमच्या सदाशिव पेठेतील घरी येत असत. त्यावेळी त्यांच्या आणि राजा ठाकूर यांच्या मैत्रीबद्दल कल्पना नव्हती, नाही तर त्यांना त्या विषयी नक्कीच बोलतं केलं असतं…
१९९० साली मी ‘सूडचक्र’ या मराठी चित्रपटासाठी स्थिरचित्रणाचे काम करीत होतो. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक होता, अविनाश ठाकूर. राजा ठाकूरांना नाही भेटता आलं, त्यांच्या मुलाला भेटलो. अविनाशनं सचिन पिळगांवकरकडे अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आज अविनाशही या जगात नाहीये…
मराठी मातीतील चित्रपटांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा, बहुधा हा एकमेवच ‘राजा’ असावा…
— सुरेश नावडकर. 
मोबाईल: ९७३००३४२८४
९-३-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..