‘चितळे बंधू मिठाईवाले’ हा ब्रॅंड ज्यांनी जगभर नेला त्या नरसिंह ऊर्फ राजाभाऊ चितळे यांचा जन्म.२२ ऑगस्ट १९३२ रोजी कोल्हापूर येथे झाला.
चितळे बंधू’ हे नाव घेतले तरी दुधापासून बर्फी पर्यंत आणि फरसाणपासून बाकरवडीपर्यंत अनेक पदार्थ त्यांच्या खास चवींसह समोर येतात. कशासाठीही रांग लावणे ही काही पुण्याची संस्कृती नाही; परंतु चक्क्यासाठी असो वा बाकरवडीसाठी.. पुणेकर ‘चितळे बंधू’च्या दुकानामध्ये रांग लावतात. हा या ब्रॅंडचा महिमा- आणि तो काही एका रात्रीत निर्माण झालेला नाही. राजाभाऊ चितळेनी कष्टाने, सचोटीने, चोख व्यवहाराने आणि कल्पकतेने तो विकसित केला.
वास्तविक बाकरवडी हा गुजराती पदार्थ; परंतु बाकरवडी म्हटल्यावर गुजरातची नव्हे, तर ‘चितळें’ची बाकरवडी समोर येते. एखाद्या पदार्थाची चव थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल चाळीस वर्षे कायम ठेवणे ही काही सोपी गोष्ट नाही. राजाभाऊ आणि त्यांचे थोरले बंधू रघुनाथराव यांच्या नेतृत्वाखाली ‘चितळें’नी ही किमया साध्य केली आहे- आणि म्हणूनच त्याचा नावलौकिक झाला. राजाभाऊंना व्यवसायाचा वारसा घरातून मिळाला असला, तरी वाडवडिलांच्या पुण्याईवर समाधान न मानता त्यांनी त्यात भर घातली.
त्यांच्या वडिलांनी- बी. जी. चितळे यांनी भिलवडी जिल्हा सांगली येथे सुरू केलेला दुधाचा व्यवसाय रघुनाथरावांनी १९५० मध्ये पुण्यात आणला आणि चारच वर्षांनी राजाभाऊंनी पुण्यातच डेक्कन जिमखान्यावर दुसरी शाखा सुरू केली. दुधाचा व्यवसाय केवळ रतीब घालण्यापुरता मर्यादित न ठेवता त्यांनी विस्तारला. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारले आणि ते शिकण्यासाठी परदेश दौरेही केले. दूध भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी यंत्राद्वारे दुधाच्या पिशवीचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. पुणेरी चवीच्या बाकरवडीली मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर त्यांनी ती बनविण्यासाठी यंत्राचा आधार घेतला; पण चव बिघडणार नाही याची काळजी घेतली. यासाठी त्यांनी नेदरलॅंडमधून यंत्र आणले. मालाच्या दर्जाबाबत अजिबात तडजोड करायची नाही हे धोरण अवलंबत अतिशय कुशलतेने त्यांनी व्यवसाय पुढे नेला.
राजाभाऊंनी सामाजिक उपक्रमांतही हिरीरीने सहभाग घेतला. कर्वे स्त्री शिक्षण संस्था, जोशी हॉस्पिटल आदी संस्थांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली. नैसगिर्क आपत्तीच्या वेळी मदतीसाठी ते नेहमीच पुढे राहिले. अन्न प्रक्रिया उद्योगाकडे ते वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत. राजाभाऊंच्या या साऱ्या गुणवैशिष्ट्यांमुळेच ‘चितळे बंधू’ हे नाव सर्वत्र गेले.
राजाभाऊ चितळे यांचे १३ ऑक्टोबर २०१० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply