छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू, राजर्षी शाहू, चौथे शाहू अशा नावाने प्रसिद्ध होते. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केलं. बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. छत्रपती शाहू महाराजांचे कार्य हे फार थोर होतं.
वास्तविक छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कागल येथील घाटगे घराण्यात झाला होता. त्यांचे मूळ नाव यशवंत, वडिलांचे नाव जयसिंगराव ऊर्फ अप्पासाहेब व आईचे नाव राधाबाई होतं. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतलं व शाहू हे नाव ठेवलं. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. छत्रपती शाहू महाराज हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत, असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढले होते.
राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत चित्रपट चित्रकला व लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचं कार्य केलं. कलाक्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव घ्यायचं झालं तर ‘नारायण श्रीपाद राजहंस’ म्हणजेच ‘बाल गंधर्व’ यांना महाराजांनी दहा वर्षाचे असताना कोल्हापुरातील एका कार्यक्रमात भजन गाताना ऐकलं. त्यांनी लगेच त्यांची गाठभेट ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’ समूहाशी करून दिली. अशाच एका नामवंत चित्रकाराला राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय दिला होता त्या चित्रकाराचं नाव होतं ‘आबालाल रहिमान.’
१८९६ च्या काळात आलेल्या दुष्काळात व त्यानंतर आलेल्या प्लेगच्या साथीच्या वेळेस महाराजांनी गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी शक्य ती मदत केली आणि त्यामुळेच रयतेला असा राजा होणे नाही असं ठामपणे कळून चुकलं.
अशा या दानशूर, कर्मवीर व कलाप्रेमी छत्रपती शाहू महाराजांना आपल्या समूहातर्फे जयंतीचे औचित्य साधून लेखरुपी पुष्पांजली अर्पण.
– आदित्य दि. संभूस.
२६/०६/२०२१.
Leave a Reply