![p-44188-rajesh_khanna-300](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2017/12/p-44188-rajesh_khanna-300.jpg)
१९६६ मध्ये “आखरी खत” हा चेतन आनंद यांचा कृष्णधवल चित्रपट प्रदर्शीत् झाला. यात बंटी नावाच्या एका दिड वर्षाच्या मुला सभोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली होती. जाल मिस्त्री या प्रतिभावान छायाचित्रकाराने या मुलाचे विविध अंगाने इतके अप्रतिम छायाकंन केले होते की तेवढ्यासाठी प्रेक्षकवर्ग थिएटरकडे खेचला गेला. या चित्रपटात चेतन आनंद यांनी २३ वर्षाच्या एका तरूणाला सर्वप्रथम नायकाची भूमिका दिली जो यात त्या मुलाचा पिता असतो. नायिका होती इंद्राणी मुखर्जी. तरूणाची चित्रपटात फारशी छाप पडली नाही. मात्र या तरूणाचे डोळे अत्यंत स्वप्नाळू होते आणि ते फ्रेममध्ये अनेकदा स्पष्ट दिसत. चित्रपट मात्र चांगला चालला. यातील “बहारो मेरा जीवन भी सँवारो……” हे खय्यामने संगीत दिलेले गाणेही लोकप्रिय झाले. यातील नायकाची भूमिका करणाऱ्या तरूणाचे नाव होते जतीन खन्ना. नंतर हे दापंत्य पाकिस्तानातुन अमृतसर येथे येऊन राहू लागले. मुंबईचे श्रीमंत दापंत्य चुन्नीलाल आणि लिलावती हे यांचे जवळचे नातेवाईक होते. त्यांनी जतीनला दत्तक घेतले. गिरगावच्या सेंट सॅबेस्टियन इंग्रजी शाळेत त्याने प्रवेश घेतला. येथे त्यांची दोस्ती रवी कपूर याच्याशी झाली व दोघे चांगले मित्र झाले. दोघांनाही नाटकांत रूची विशेषत: जतीन ती अधिक होती. हळूहळू मग तो थिएटरकडे खेचला गेला. नाटकातल्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळवले. स्ट्रगलच्या काळात जतीन आपली स्पोर्ट कार घेऊन बाहेर पडत असे. यातुनच त्याला हा चित्रपट मिळाला होता. जतिन आणि रवी दोघांनी काही वर्षात चित्रपटसृष्टीत आपला जम बसवला. पूढे यातलाच एक मग चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार झाला तर दुसरा जंपिग स्टार झाला.
जतिनला १९६७ मध्ये दोन चित्रपट मिळाले. पहिला “राज” ज्यात बबीता त्याची नायिका होती आणि दुसरा नासिर हुसेनचा “बहारों के सपने” यात आशा पारेख नायिका होती. यातील आरडीची ‘चुनरी संभाल गोरी’ व ‘आजा पिया तोसे प्यार दू’ ही दोन गाणी तुफान गाजली. जतिनची कामगिरी ठिक म्हणण्या इतपत झाली होती. आणखी दोन वर्षाने जतिनच्या आयुष्यात एक जबरदस्त बदल घडणार होता जो त्याच्या ध्यानी मनीही नव्हता. ६० च्या दशकातील सचिन भौमिक हे प्रसिद्ध चित्रपट कथा-पटकथाकार होते. त्यांच्याच एका कथेवर शक्ती सामंतानी एक चित्रपट काढायचे नक्की केले. संगीतकार एस:डी. बर्मन,गीतकार आनंद बक्षी, संवाद रमेश पंत अशी त्रयी एकत्र आली आणि १९६९ मध्ये “आराधना” प्रदर्शीत झाला. या चित्रपटाने अक्षरश: धूम केली आणि जतिन हा खऱ्या अर्थाने राजेश खन्ना झाला. पूर्वीच्या तिनही चित्रपट नामावलीत त्याचे नाव राजेश खन्ना होते ते नंतर सुपर स्टार राजेश खन्ना झाले. त्याचा शाळेतला मित्र रवी कपूर ही पूढे जितेंद्र नावाने सुप्रसिद्ध अभिनेता झाला. गंमत म्हणजे एकदा एका ऑडिशनच्या वेळी कॅमेऱ्या समोर कसा अभिनय करायचा हे राजेश खन्नाने जितेंद्रला सांगितले त्यात जितेंद्र पास झाला आणि राजेश फेल झाला. जितेंद्र आणि त्याची पत्नी राजेश खन्नाला “काका” म्हणून हाक मारत असत.
खरे तर हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरस्टार अशोक कुमारला म्हटले जाते. पण त्याकाळात चित्रपट निर्माण होण्यास बराच कालावधी लागत असे शिवाय एका चित्रपटात काम करतानां अभिनेता दुसरीकडे काम करत नसे कारण निर्माता तसा करार करीत असे. त्यामुळे एका अभिनेत्याचे भारंभार चित्रपट येत नसत. पण नंतर परिस्थिती बदलली. अभिनेते शिफ्ट बेसीसवर काम करू लागले. १९७० पर्यंत खूप काही बदलले. राजेश खन्नाने १९६९ ते ७२ या तिन वर्षाच्या कालावधित सलग १५ चित्रपट सुपरहिट दिले. आराधना, इत्त्फ़ाक़, दो रास्ते, बंधन, डोली, सफ़र, खामोशी, कटी पतंग, आन मिलो सजना, ट्रैन, आनन्द, सच्चा झूठा, दुश्मन, महबूब की मेंहदी, हाथी मेरे साथी हे तुफान चालले. तर १९७२ ते ७५ च्या दरम्यान अमर प्रेम, दिल दौलत दुनिया, जोरू का गुलाम, शहज़ादा, बावर्ची, मेरे जीवन साथी, अपना देश, अनुराग, दाग, नमक हराम, अविष्कार, अज़नबी, प्रेम नगर, रोटी, आप की कसम, प्रेम कहानी हे चित्रपट यशस्वी झाले. राजेश खन्ना इतका यशस्वी का झाला असेल बरे? खरं तर त्याच्याकडे धमेंद्र सारखे तगडे शरीर नव्हते, जितेंद्र सारखे नाचू शकत नव्हता, संजीव कुमार इतकी खोली नव्हती, नवख्या ऋषी कपूर सारखा खानदानी रंग ही नव्हता, विनोद खन्ना सारखी वा अमिताभ सारखी उंचीही नव्हती किंवा मनोजकुमारसारख वेगळा दिसणारा चेहरा नव्हता. ७० च्या दशकातील विचार केला तर एक गोष्ट नक्की होती ती म्हणजी त्यावेळी तारूण्याच्या उंबरठ्यावर असणारी ती पिढी खूपशी स्वप्नाळू होती. राजेश खन्ना हा त्यांनां आपल्यातला एक वाटायचा. राजेश खन्नाला सुपरस्टार करण्यात सर्वात मोठा वाटा मला तरी वाटते त्यावेळच्या तरूणींचा होता. त्याचे डोळयात त्यांना आपला स्वप्नाळू प्रियकर दिसायचा. त्याचे ते किंचीत मान तिरकी करून हलकासा झटका देणे, चालताना किंचीत एका बाजूला झुकत चालणे, ओठांच्या नैसर्गिक हालचाली आणि सर्वात आकर्षक म्हणजे त्याचे अत्यंत प्रसन्न असे हसणे. त्याने कधी आपल्या चेहऱ्या वरील तारूण्यपिटीका लपविल्या नाहीत कदाचित त्यामुळे अधिक जवळचा वाटत असावा. अनेक तरूणींनी त्या काळात स्वत:च्या रक्ताने राजेश खन्नाला प्रेमपत्रं लिहीली आहेत. ज्या कार मधून तो जात असे त्याचे चुंबनही घेत तरूणी.
राजेश खन्नाचा अभिनय अगदी सहज वाटत असे. संवादाचे खूप मोठे चढउतार त्याने कधीच केले नाही. खलनायकाचा कितीही राग आला तरी त्याचे डोळे कधीच अंगार ओकत नसत जणू काही तो त्यानां पश्चातापाची संधी देतोय. हाणामारीच्या दृष्यापेक्षा कौटंबिक प्रसंगात तो छानच फुलत असे.अभिनय करताना त्याच्या चेहऱ्या वरील भाव सहज बदलत असत. कदाचित म्हणूनच त्याचा “आनंद” आपल्याला आजही वेगळी अनुभूती देतो. गुलजारच्या प्रत्येक संवादाचं राजेश खन्नाने सोनं केलंय. “बाबू मोशाय” या त्याच्या एका हाकेने अख्खा प्रेक्षक शहारून जात असे. “जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए” या त्यांच्या एका वाक्याने अनेक कॅन्सरग्रस्त रोग्यांचा मृत्यू राजेशच्या अभिनयाने सुसह्य केला होता. मला तरी असे वाटते की राजेश खन्ना थेटपणे समाजमनाला भिडत असावा. जेव्हा एकादा अभिनेता आपल्यातलाच कुणी तरी एक आहे असे वाटू लागते तेव्हा साहजिकच त्याला तिकाच जोरकस प्रतिसादही मिळू लागतो.
राजेश खन्नाच्या चित्रपटांची आणि पुरस्कारांची यादी खूपच लांबलचक आहे. “आराधना” या चित्रपटाने जसा राजेश सुपर स्टार झाला तसाच किशोरदाचा ही दुसरा जन्म झाला. किशोर आणि राजेश हे समिकरण इतके छान जुळले की जणूकाही राजेश खन्ना स्वत:च गात आहे. राजेशने गायलेली गाणी त्यांच्या ओठातुन नव्हे तर पोटातून यायची. पूर्वी असे देव आनंद बाबत होत असे. म्हणून त्याच्या सुपरस्टारच्या यशात किशोरदाचा आवाज आणि संगीतकारांचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. शक्ती सामंतानी जेव्हा “अमर प्रेम” करायचा ठरविला तेव्हा राजेश खन्ना यात काम करेल याची त्यानां शाश्वती वाटत नव्हती. ते बिचकतच राजेशकडे गेले व कथा ऐकवली. राजेश खन्नाला ती प्रचंड आवडली. त्यांनी फक्त एकच सूचना केली की त्यात त्यांचे नाव “आनंद” असावे. धोतर आणि कुर्ता या वेषातला आनंद बाबू शर्मिला टागोरला “पुsष्पाss” अशी हाक मारतो तेव्हा ती हाक हृदयाच्या खोल गाभाऱ्यातुन आल्या सारखी वाटते. “पुष्पा ….आय हेट टिअर्स” हा या चित्रपटातला गाजलेला संवाद. राजेशचा आवाज असा अनेकदा आरपार जात असे. खरं तर “हाथी मेरे साथी”तले खरे नायक प्राणीच होते. कारण निर्माता चिन्नप्पा देवर यासाठीच प्रसिद्ध होते. या चित्रपटातही राजेश अगदी सहज वावरला त्याच्या आवडत्या हत्तीच्या मृत्यू नंतर त्याचा गाण्यातील अभिनय सुंदरच होता. दुलाल गुहाच्या “दुश्मन” मधला त्याचा आगोदरचा बेफिकीर ट्रक ड्रायव्हर आणि नंतरचा पश्चाताप झालेला दुश्मनचाचा मस्तच …त्याकाळात पँट आणि त्यावर झब्बा किंवा गुरू शर्ट हा वेष तरूणांमध्ये अफाट लोकप्रिय झाला होता. ‘सच्चा झुठा’, ‘आनंद’ आणि ‘अविष्कार’ साठी तीन वेळा त्याला उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. फिल्म फेअरसाठी त्याला १४ वेळा नामाकंने मिळाली. मुमताज या अभिनेत्री बरोबर त्याची छान केमेस्ट्री जुळली. दोघांचे आठही चित्रपट सुपरहिट झाले. मग अचानक राजेश खन्नाने आपल्यापेक्षा १६ वर्षे लहान असलेल्या डिम्पलशी लग्न केले तर मुमताजने आपल्यापेक्षा एक वर्ष मोठ्या असलेल्या मयूर मध्वानीशी लग्न करून चित्रपट संन्यास घेतला. १६३ फिचर फिल्मपैकी १२८ चित्रपटात ते मूख्य नायक होते.
राजेश खन्नाचा संघर्षाचा काळ तसा खूप कमी होता. त्यात श्रीमंत घरात दत्तक गेल्यामुळे पैशांची चणचण कधी भासली नाही त्यानां. प्रसिद्धीचे सर्वोच्च शिखर काबीज केल्या नंतर खाली बघतानां ते एक गोष्ट मात्र विसरले की हे यश कायम स्वरूपी कधीही असत नाही. अमिताभच्या उदया नंतर त्यांच हे पद हिसकावले जाणार होते हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. खरं तर त्या काळात अमिताभ स्ट्रगलर होते. ते मेहमूदकडे अनेकदा म्हणत की- मला एकदा तरी राजेश खन्नाची भेट घालून दे. आणि मेहमूदने ती भेट घडवूनही आणली होती. आनंद नंतर १९७३ मध्ये आलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या “नमक हराम” मध्ये दोघांचा अतिशय सुंदर अभिनय बघता आला. यात राजेशपेक्षा थोडीशी अधिक सशक्त भूमिका अमिताभची होती आणि ती त्यांनी उत्कृष्ट साकार केली. पण याच चित्रपटाने दोघांच्या व्यक्तीक आयुष्यात एक आडवी रेषा मारली. ते परत कधीच एकत्र आले नाही. नंतर ही दरी वाढतच गेली. डिम्पल सोबतचे वैवाहिक जीवनही अडचणीत येत गेले. राजेश खन्ना एकलकोंडे होऊ लागले. यश पचवतानां अपयशाचा विचार कधी केलाच नाही राजेश खन्नाने आणि ही त्यांची मोठी चूक ठरली. जसजसे त्यांचे चित्रपट कोसळू लागले तसतसे ते प्रेक्षकां पासून दूर होत गेले. १९९२ ते ९६ या काळात ते काँग्रेसचे खासदार होते. सन २००९ मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे भारतीय जनता पार्टो राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात केलेले भाषण हे राजेश खन्नाचे अखेरचे जाहिर भाषण होते. अमिताभच्या यशाचा विषाद अनेकदा त्यांच्या बोलण्यातुन स्पष्ट दिसत असे. सन २०१४ मध्ये अमिताभच्या हस्ते त्यानां लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला…त्यावेळी ते म्हणाले होते- “इज्जते शोहरते उल्फते चाहते सब कुछ इस दुनियामे रहता नही, आज मै हूँ वहाँ कल और कोई था, ये भी एक दौर है वह भी एक दौर था”…. कायम यशाची चव चाखलेला हा सूपर स्टार अपयशानं मात्र खंगून गेला. २०१२ च्या जुलै मध्ये त्यांना मुंबईच्या लिलावती हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते. १८ जुलैला त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मला सर्वाधिक वेदना त्यांच्या मृत्यूमुळे नव्हे तर अखेरच्या काळातील त्यांचे छायाचित्र बघून झाल्या. त्यांच्या ज्या हास्याने मनाला टवटवीतपणा येई ते नैसर्गिक हास्य पार लोपलं होतं. डोळे हे विश्वास ठेवायला तयारच नव्हते की हे राजेश खन्नाचे छायाचित्र आहे………..माझ्या डोळ्या समोर आजही आनंद मधला समुद्र किनाऱ्यावरील वाळूतुन अनवाणी पायाने हातात मनस्वी स्वप्नाचें रंगीबेरंगी फुगे घेऊन गाणे म्हणणारा आनंद आठवतो…”जिंदगी कैसी है पहेली हाय”……………गुलजारनी यातला एक संवाद जणू फक्त राजेश खन्नासाठीच लिहला असावा- ‘आनंद मरा नही, आनंद कभी मरते नही’……….
-दासू भगत (१८ जुलै २०१७)
Leave a Reply