संगीतकार रोशन यांचा पुत्र, अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांची ही ओळख. घरात संगीताचे वातावरण. त्यामुळे लहानपणीच त्यांना संगीताचे बाळकडू मिळाले. पुढे विनोदवीर मेहमूद यांनी राजेश यांना ‘कुंवारा बाप’ मध्ये संधी दिली. त्यांचा जन्म २४ मे १९५५ रोजी झाला. स्वतंत्र संगीतकार म्हणून राजेश यांचा हा पहिलाच चित्रपट. यातील गाणी चांगलीच गाजली. यातले ‘आ री निंदिया आ’ हे गीत आजही रसिकप्रिय आहे. त्यानंतर आलेल्या ‘ज्युली ’मध्ये मात्र राजेश रोशन यांनी कमाल केली. यातले ‘भूल गया सब कुछ, याद नहीं अब कु छ ’ हे किशोर-लताचे गाणे आजही भान हरवायला लावते, तर ‘माय हार्ट इज बीटिंग’ ऐेकल्यानंतर मन प्रसन्न होते. रसिकांचा ‘मूड’ एकदम फ्रेश करणारे संगीत हा राजेश रोशन यांचा विशेष पैलू. एक रास्ता है जिंदगी (काला पत्थर ), परदेसिया (मि. नटवरलाल ), अंग्रेजी में कहते हैं कि (खुद्दार), सारा जमाना (याराना ), बाहें तेरी खुशबू के (काला पत्थर), तुज संग प्रीत लगाई (कामचोर), दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है (आखिर क्यों ), घर से निकलते ही (पापा कहते हैं ), जाती हूं मैं (करन अर्जुन ), हंसते हंसते (खून भरी मांग ), कहो ना प्यार है ही त्यांच्या प्रसन्न शैलीतील गाण्यांची काही उदाहरणे.
गायकाच्या प्रतिभेचा समर्पक वापर करण्यात राजेश रोशन नेहमीच यशस्वी ठरले आहेत. ‘दो और दो पांच’ मध्ये किशोरकुमार यांच्या आवाजातील ‘तूने अभी देखा नहीं’ हे गाणे राजेश रोशन यांच्या संगीतप्रतिभेची चुणूक दाखवणारे आहे. ‘खेल’मध्ये आशा भोसले यांच्याकडून ‘इडली डू’ हे कॅब्रे साँग आणि तेच गाणे भजन स्वरूपात गाऊन घेण्याचा अफलातून प्रयोग केवळ राजेश रोशनच करू जाणे. ‘इन्कार’ मधले त्यांचे ‘मुंगडा मुंगडा’ हे कॅब्रे साँगही असेच आपल्याला रिफ्रेश करणारे, ठेका धरायला लावणारे. ‘लूटमार’ मधले आशातार्इंच्या आवाजातले ‘जब छाये मेरा जादू’ हे गाणेही असेच. ‘कामचोर’ मधल्या त्यांच्या संगीताने नटलेल्या ‘तुमसे बढकर दुनिया में’ या गाण्यातला गोडवा तर मधाहून मधुर. ‘दूसरा आदमी’ मधल्या ‘चल कहीं दूर’ या साडेसहा मिनिटांच्या गाण्यात लता- किशोर- रफीच्या आवाजाचा वापर एकदम कर्णमधुर. ‘याराना’ मधल्या ‘भोले ओ भोले’ मधला निरागसपणा त्यांच्या संगीताने अधिकच खुलतो, तर ‘छूकर मेरे मन को’ मधला भाव मनाला चांगलाच भावतो. ‘खट्टा मीठा’ मधले ‘थोडा है थोडे की जरूरत है’ असेच काळजाला भिडणारे. ‘जुर्म’ मधले ‘जब कोई बात’ हे गाणेही मनाला वेगळा आधार देणारे. ‘खेल’ मधल्या ‘खत लिखना है’ गाण्यातून तिची आणि त्याची अगतिकता राजेश रोशनच्या संगीतामुळे आपल्यालाही अगतिक करते. बासरी, तबला, दिलरुबा, सारंगी, बोंगो, कोंगो, ट्रम्पेट, सॅक्सोफोन आदी वाद्यांचा उत्कृष्ट मेळ, त्यातून निर्माण होणारी उत्तम सुरावट, सहज ओठावर येतील अशा चाली, पार्श्वगायकांच्या आवाजाचा योग्य वापर ही राजेश रोशन यांच्या संगीताची वैशिष्ट्ये. अलीकडच्या काळात कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश आणि काइट्स या चित्रपटांतील संगीताने तरुणाईची मने जिंकणारा राजेश रोशन हा एक विरळाच संगीतकार. काळानुरूप परंतु अभिरुचिपूर्ण, सातत्याने फ्रेश करणारे संगीत देण्यात राजेश रोशन यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राजेश रोशन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=rU0PCK5mFbU
Leave a Reply