राजेश टोपे यांचा जन्म ११ जानेवारी १९६९ रोजी झाला.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे नाव अनेकांच्या ओठावर आहे. संयमाने ते स्थिती हाताळत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कुतूहूल निर्माण झाले आहे.
राजेश टोपे यांना जवळचे लोक भैय्यासाहेब या नावाने ओळखतात. राजेश टोपे यांचे शिक्षण BE (Civil) पर्यत झाले आहे. उच्चशिक्षित राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. घरातच राजकीय वारसा असल्याने राजकारणासोबत समाजकारणाची ही ओढ होतीच ह्या अनुषंगाने १९९१-९२ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी त्यांची निवड झाली.
राजेश टोपे यांचा २३ वर्षाचे असताना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने जिल्ह्य़ाच्या राजकारणात प्रवेश झाला. त्यांचे वडील अंकुशराव टोपे यांनी ज्याप्रमाणे संघर्ष करीत राजकारण आणि सहकार त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील अस्तित्व निर्माण केले. तेवढा संघर्ष राजेश टोपे यांना करावा लागला नाही. राजेश टोपे यांची राजकारणातील खरी सुरुवात १९९६ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाने झाली. तत्पूर्वी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरी त्यानंतर १९९९ मध्ये राजेश टोपे विधानसभेवर निवडून आले. तेव्हापासून सलग पाच वेळेस त्यांनी ही निवडणूक जिंकली. १९९९ मध्ये निवडून आल्यावर त्यांनी पहिल्यांदा राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु त्यांचे हे मंत्रिपद औटघटकेचे ठरले. पक्षांतर्गत कारणांमुळे त्यांना लगेच या पदावरून पायउतार व्हावे लागले. परंतु मार्च २००१ मध्ये पुन्हा त्यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आणि त्यानंतर सलगच १४ वर्षे ते मंत्रिपदावर राहिले.
जलसंधारण, ऊर्जा, पर्यावरण, नगरविकास, कमाल नागरी जमीन धारणा, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सामान्य प्रशासन, सांसदीय कार्य इत्यादी अनेक खात्यांचा कारभार त्यांनी या काळात सांभाळला.
त्यांचे वडील अंकुशराव टोपे यांनी उभारणी केलेल्या अनेक संस्थांच्या प्रमुखपदांची जबाबदारी त्यांच्या हयातीतच राजेश टोपे यांच्याकडे आली. दोन सहकारी साखर कारखाने, १२ शाखांचे जाळे असणारी समर्थ सहकारी बँक, ५०पेक्षा अधिक शाळा-महाविद्यालये असणारी मत्स्योदरी शिक्षण संस्था, सहकारी सूतगिरणी, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सनिकी शाळा इत्यादी संस्थात्मक कारभाराची जबाबदारी सांभाळीत जिल्हयातील पक्षीय राजकारण आणि संस्थांमध्ये राजेश टोपे कार्यरत आहेत. जिल्हा बँकेवर त्यांचे वर्चस्व असून जिल्हा परिषदेतील सत्तेत त्यांचा पक्ष सहभागी आहे. अंबड आणि घनसावंगीमधील पंचायत समित्या, खरेदी विक्री संघ, बाजार समिती, नगर पंचायत त्यांच्या अधिपत्याखाली आहे. तर पक्षीय पातळीवरील राष्ट्रवादीची जिल्हा संघटना संपूर्णपणे आपल्या अधिपत्याखाली कशी यासाठी ते दक्ष असतात.
विकासाची दृष्टी असणारे आणि त्यासाठी अथक वेळ देणारे शिस्तीचे नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. सर्वाचेच ऐकायचे हा त्यांचा स्वभाव असला तरी कुणाचे आणि कोणते काम करायचे याबाबत मात्र ते कमालीचे जागरूक असल्याचे मानले जाते.
त्यांच्याकडे अनेक संस्थांचा कारभार वडिलांकडून वारसाहक्काने आल्याची टीका विरोधक करीत असतात. परंतु राजेश टोपे यांनी मृदू भाषेत विरोधकांशी सामना करीत या संस्थाचा कारभार चालविलेला आहे. संस्थांचा कारभार आणि राजकारणातील व्यापामुळे दैनंदिन जीवनात अतिशय व्यस्त असलेले राजेश टोपे संयमी, मृदू भाषेत बोलणारे परंतु राजकीय व पक्षीय राजकारणात स्वत:च्या भूमिकेवर दृढ असणारे नेते म्हणून ओळखले जातात.
राजेश टोपे हे सध्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून ते भरीव काम करत आहेत. पेशाने डॉक्टर नसलेले टोपे आरोग्यमंत्री पद सांभाळतील की नाही असे लोकांना वाटायचे. परंतु आजघडीला कोरोनाच्या उपाययोजनासंबंधी अनेकांच्या ओठी त्यांचे नाव आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply