१.
राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. स्पर्धा आली. पक्षांतर्गत सत्ता, शासन करण्यासाठी सत्ता ह्यांत ते सर्व गुंततात. राजकारण करणाऱ्या माणसांत अनेक पातळ्यांवर स्पर्धा असते. कधी कधी ही इतकी तीव्र होते की दोन राजकारणी एकमेकांच्या जीवावर उठतात किंवा दोघांतील एक जण तरी दुसऱ्याचा इतका द्वेष करू लागतो की तो दुसऱ्याचा जीव घ्यायचा विचार करू लागतो. अर्थात उघडपणे तो हे दाखवेल तर तो कसला राजकारणी. बाहेर तो खूप मैत्री दाखवू शकतो पण त्याच वेळी वैऱ्याच्या खूनाचा बेत मनांत रचत असतो. कधीतरी तो आपला बेत पार पाडण्यात यशस्वी होतो. राजकारणी नेत्याला इतरही विरोधक असतात, जे राजकारणांत असतातच असं नाही. त्यांच्यापैकीही एखादा असाच बेत रचून त्याला मारू शकतो. असे अनेक पदर असलेला हा गुन्हा प्रत्यक्षात घडला होता. एकेकाळी स्थानिक नगरपालिकेचा अध्यक्ष असणाऱ्या एका राजकारणी व्यक्तींचा खून झाला होता आणि दीड महिना होऊन गेला तरी पोलिसांना कांही धागा मिळत नव्हता म्हणून हे प्रकरण घेऊन इनस्पेक्टर हिरवे यशवंताकडे आले होते.
२.
हिरवे म्हणाले, “धुरंधर साहेब, तुम्ही पेपरमध्ये वाचलंच असेल की दिनांक २५ ॲाक्टोबरला मुंबईच्या उपनगरापैकी एकात (नांव जाहिर करता येत नाही) नानाभाई राठोड नांवाच्या नगरसेवकाचा भर सभेत खून झाला. नानाभाई एका भागातील नवरात्रीच्या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे होते. तात्पुरत्या बांधलेल्या रंगमंचावर ते बसले होते. आयोजकांनी ठरविल्याप्रमाणे नियोजित वेळी ते भाषण करू लागले. दहा मिनिटांनंतर रंगमंचाच्या मागच्या बाजूने एकजण अचानक पिस्तुल हातात घेऊन तिथे आला. अगदी जवळून म्हणजे तीन साडेतीन फूटांवरून त्याने नानाभाईंच्या डोक्यांत गोळ्या घातल्या आणि आला त्याच मार्गाने तो धांवत निघून गेला. कोणी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला नाही. त्या ठीकाणी बंदोबस्तासाठी फक्त एक पोलिस होता. तो केवळ टवाळी करणाऱ्या मुलांना हाकलण्यासाठी असतो. लोकांचे मामुली झगडे सोडविण्यासाठी. एखाद्याने फारच गडबड केली तरच तो त्याला चांगला खडसावतो. आम्ही तिथे सर्वसाधारण शिस्त कार्यक्रमाला रहावी ह्यासाठी त्याला पोस्ट करतो. ह्या कार्यक्रमांत खून होईल असे कधी वाटत नाही व साधारण अनुभव तसाच आहे. अनेक ठीकाणी आम्ही केवळ एक किंवा दोन पोलिस पोस्ट करतो.
३.
यशवंत धुरंधर गंभीरपणे हिरवेंची माहिती लक्षपूर्वक होते. त्यांनी विचारले, “खून कोणत्या प्रकारच्या पिस्तुलाने झाला? त्यावरून कांही माग मिळत नाही कां?” इन्सपेक्टर हिरवे म्हणाले, “नानाभाईच्या डोक्यांतील गोळ्यांवरून, त्या गांवठी पिस्तुलातून घातल्या गेल्यांत, असा अंदाज आहे. म्हणूनच खूनी इसमाला अगदी जवळ जाऊन खून करावा लागला. मी पोस्ट मॅार्टेम रिपोर्ट व इतर सर्व कागदपत्रांच्या कॅापीज तुमच्या सोयीसाठी आणल्या आहेत. नानाभाई ह्यापूर्वीही नगरसेवक होता पण त्याच्या मतदारसंघाबाहेर त्याला कुणी फारसे ओळखत नव्हते. तो कुटुंबवत्सल होता. राजकारणाखेरीज तो एक दुकानदार म्हणून ओळखला जाई. राजकारणांत आल्यावर त्याने दुकान चालवायला मेहुण्याकडे दिले. पध्दतीप्रमाणे एक ठराविक रक्कम मेहुणा दर महिन्याला नानाभाईला देत असे. त्यांत त्याने कधीही चूक केली नाही. नानाभाईने राजकारणांत प्रवेश केला, तो ज्या एका पक्षाचा पाठीराखा होता, त्याच्या नेत्यांनी आग्रह केला म्हणून. नानाभाई प्रथम निवडून आला तो तिथे त्यापूर्वी चार वेळा निवडून आलेल्या वृध्द उमेदवाराचा पराभव करून. त्या वृध्दाची राजकीय कारकिर्दच संपली.
४.
इनस्पेक्टर हिरवे म्हणाले, “तिथे एक सीसाटीव्ही होता. त्यावरही ही घटना आली आहे. परंतु झूम करूनही त्या मारेकऱ्याचा चेहरा दिसत नाही. त्याने मास्क लावला नव्हता पण चेहऱ्यावर कांहीतरी रंग असे फासले होते की त्याचे खरे रूप ओळखू येऊ नये.” यशवंत म्हणाले, “इनस्पेक्टर, तुम्ही त्याची चित्रकाराकडून त्यांच्या अंदाजाने तो खोट्या रंगाशिवाय कसा दिसू शकेल, ह्याची चित्रे काढून घ्या. कदाचित तुमच्या रेकॅार्डवरील एखाद्या चेहऱ्याशी साम्य आढळेल.” इनस्पेक्टर हिरवे म्हणाले, “ही कल्पना चांगली आहे.” यशवंत म्हणाले, “तो मारेकरी भाडोत्रीच असणार. खरा सूत्रधार वेगळाच असणार. तुम्हाला वर्तमानपत्रांतली जपानच्या माजी पंतप्रधानाच्या खूनाची बातमी आठवत असेल. अगदी त्याच पध्दतीने हा खून झाला आहे. माजी पंतप्रधान छोट्या सभेत बोलत असतांना मागून येऊन गुन्हेगाराने ते कृत्य केलं होतं. अगदी तीच कल्पना ह्याने वापरली आहे.” इनस्पेक्टर हिरवे म्हणाले, “माझ्याही ते लक्षांत आलं पण त्या घटनेत हल्लेखोराला तिथेच पकडण्यात आलं होतं. पोलिस अधिकारी जवळच होते व त्यांनी त्याला लागलीच पकडले. हा गुन्हेगार पळून गेला आहे.”
५.
यशवंत आणि चंदू दोघे कामाला लागले. चंदू मृताच्या मतदारसंघात कांही जास्त माहिती मिळते कां पाहू लागला. मृताबद्दल लोक कांही फारसं वाईट बोलत नव्हते. तो निवडणुकीला उभा रहाणार होता व लोकांचा त्याला पाठींबाच दिसून आला. विरोधी पक्षाचे संभाव्य उमेदवारही सर्वसामान्यपणे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नव्हते. विरोधी पक्ष ह्या जागेबद्दल आक्रमकही नव्हते. चंदूने सहज प्रथम ज्याचा पराभव नानाभाईने केला होता, त्याची चौकशी केली. तो वृध्दत्वामुळे दोन वर्षांपूर्वी मरण पावला होता. त्याचा मुलगा चिमणभाई आता राजकारणांत होता आणि त्याच्याकडे पैसाही होता. यशवंतानी चंदूला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले. तसेच त्या भागातील उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षांत कोणी कोणी प्रयत्न केले होते, ती माहिती काढण्यास सांगितले. चंदूने मेहनतीने एक मोठी यादीच तयार केली. त्या एका नगरसेवकाच्या जागेसाठी वेगवेगळे पक्ष व स्वतंत्र उमेदवार मिळून एकूण एकावन्न लोकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा दाखवली होती. निवडणूक अजून जाहिरही झाली नव्हती. चंदूने दिलेली यादी पाहतांना यशवंताना त्यात चिमणभाईचे नांव दिसले. चिमणभाईची अधिक चौकशी करणे आवश्यक होतं. चंदू नजर ठेवून होताच. तसेंच नानाभाईच्या पक्षातील त्याचे प्रतिस्पर्धी अशोक रामचंदानी आणि देवजीभाई मेहता ह्यांच्यावरही नजर ठेवण्यास सांगितले.
६.
यशवंतानी इनस्पेक्टर हिरवेंच्या मदतीने त्या भागांतील अवैध धंदे करणाऱ्यांची माहिती मिळवली. मुंबईतील प्रमुख टोळीचे कांही गुंड त्या भागांतील गांवठी बेकायदेशीर दारूचे गुत्ते चालवणाऱ्यांसाठी काम करत होते. त्या भागातील पोलिसांबद्दलही लोकांच्यात असमाधान होतं कारण हे दारूचे गुत्ते उघडपणे चालत होते. यशवंतानी चंदूला तिथल्या स्थानिक गुंडांची जितकी माहिती काढतां येईल तितकी काढायला सांगितले. शक्य झाल्यास त्यांचे फोटो मिळवायलाही सांगितले. यशवंतांचा कयास होता की हे काम कुणीतरी स्थानिक गुंडाने केले आहे. तिथून पटकन पळून दिसेनासे कसे होतां येईल, हे त्या गुन्हेगाराला चांगले ठाऊक होते. यशवंतानी चंदूला बरोबर घेऊन त्या जागेचीही पहाणी केली होती. मागच्या बाजूने पळाल्यानंतर पळणाऱ्याच्या समोर एक उंच भिंत येत असे. नेहमी तो रस्ता वापरणाऱ्यालाच ठाऊक असे की भिंतीला लोकांनी डाव्या बाजूला खिंडार पाडले होते व तिथून बाहेर जाता येते. यशवंताची खात्रीच झाली की खून स्थानिक गुंडानेच केला असणार आणि तो तिथून पळाला असणार. त्यांनी स्थानिक पोलिस स्टेशनवरून तिथल्या गुंडांची माहिती मिळवली. कांहींचे फोटोही काढून घेतले.
७.
यशवंतांच्या सूचनेप्रमाणे क्राईम ब्रॅंचच्या इनस्पेक्टर हिरवेंनी त्या व्हीडीओत अस्पष्ट दिसणाऱ्या खून्याचे चार संभाव्य चेहरे चित्रकाराकडून काढून घेतले. ते चारही फोटो त्यांनी यशवंतांकडे पाठवून दिले. यशवंत स्थानिक गुंडांचे चंदूने मिळवलेले कांही फोटो आणि स्थानिक पोलिस स्टेशनवरून मिळवलेले फोटो ह्या चार फोटोंशी ताडून पहात होते. त्यांतील एक चेहरा त्यांना सारखाच वाटला. मोबाईलवरून त्यांनी चंदूला तो पाठवला. चंदूने सांगितले, “ह्याचे नांव भुवन. हा तर इथे एका दारूच्या गुत्त्यात असतो. पिणाऱ्याने पैसे दिले नाही अथवा पिणाऱ्यांनी तिथे कांही धांदल केली तर वसुली करण्याचे आणि धांदल करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम करतो.” यशवंत म्हणाले, “मला तर हा भुवनच संशयित गुन्हेगार वाटतो.” त्यांनी इनस्पेक्टर हिरवेंना बोलावून आपला तर्क सांगितला. इनस्पेक्टर हिरवे म्हणाले, “ह्या ना त्या कारणाने मी भुवनला कस्टडीत तर घेतोच. मलाही हा चेहरा व्हीडीओतील पुसट चेहऱ्याशी जुळतोय असं वाटतयं. एकदा कां ह्याच्याकडून खूनाची कबुली मिळाली तर त्याने खून कोणाच्या सांगण्यावरून केला, ते समजायला कठीण पडणार नाही.”
८.
भुवनला पोलिसांनी संशयित म्हणून कस्टडीत घेतला पण त्याने पोलिसांना कांहीही सांगितले नाही. “मला कांही माहित नाही.” हेच ते बोलत राहिला. भुवन जिथे रहायचा तिथे आणि जिथे असायचा त्या गुत्त्याचीही पोलिसांनी झडती घेतली. त्यांत त्यांना दोन गांवठी पिस्तुले मिळाली. त्यापैकी वापरलेले पिस्तुल गोळ्यांवरून पोलिसांच्या लॅबने ओळखले. भुवनचा गुन्हा सिध्द झाला पण कारण काय? पोलिसांनी अधिक चौकशीसाठी भुवनची कस्टडी वाढवून घेतली. मध्यंतरात चिमणभाईंनी आपला पक्ष बदलला होता. नानाभाईचे विरोधक चिमणभाई आता नानाभाईच्या पक्षांत गेले होते. निवडणुकीत त्यांनाच तिकीट मिळणार अशी सर्वत्र चर्चा होती. यशवंत इनस्पेक्टर पेक्टर हिरवेंना म्हणाले, “भुवनला सांगा की त्याला फांशी होणार हे नक्की आणि त्याची प्रतिक्रिया पहा.” पोलिसांनी ते पिस्तुल दाखवले आणि सांगितले, “तू नांव सांग नाही तर नको सांगूस. तुझी फांशी आता कांही चुकत नाही. तुला सुपारी देणारा जो कोणी असेल तो मात्र आणखी मोठा नेता होईल.” हे ऐकून भुवन थुंकला आणि बोलून गेला, “साsला मला दोन दिवस बाहेर सोडा. त्या चिमणभाईचा कोथळाच बाहेर काढतो.” पोलिसांना खूनामागचा सूत्रधार मिळाला. चिमणभाईला अटक झाल्यावर तो पोलिसांना म्हणाला, “नानाभाईने माझ्या बुढ्ढया बापाला निवडणुकीत हरवला, तेव्हांपासूनच मी नानाभाईला माझा वैरी मानत होतो. तेव्हापासूनच त्याला संपवण्याचा विचार माझ्या मनांत होता. शेवटी असा संपवावा लागला पण मी उत्तम वकील देऊन सुटेन ह्या केसमध्ये.” असं कांही झालं नाही. भुवनला व त्याला जन्मठेप देण्यांत आली.
अरविंद खानोलकर
वि.सू.
कथेतील पात्रे, प्रसंग आणि घटना सर्वस्वी काल्पनिक आहेत.
Leave a Reply