नवीन लेखन...

राजकीय नेत्यांना आला सामान्य माणसाचा पुळका

नोट बंदीचा निर्णय जालियानवाला बाग पेक्षाही भयंकर असल्याची टीका शिवसेनेने केली असल्याचे फेसबुक वर वाचले. अनेक राजकीय पक्षांनी असाच सूर काढल्याच अन्य पेपर मध्ये वाचले. दिल्लीतील सरकारने सामान्य लोकांना भुकेकंगाल केल्याचा उल्लेख सामनात असल्याचं याच पोस्टमध्ये म्हटलं आहे. या लेखात शिवसेनेने किंवा इतर पक्षांनी सामान्य माणूस म्हणजे नेमका कोण याचा उल्लेख केलेला नाही. शिवसेना असो की नोटा बंदीला विरोध करणारा कोणताही राजकीय पक्ष असो, यांच्या बोलण्यात नेहेमी सामन्य माणूस, जनता असा उल्लेख असतो. मला हे कळत नाही अशा कोणत्या ‘सामान्य’ माणसाचा हे लोक हवाला देतात? किंवा कोणता ‘सामान्य’ माणूस यांच्याकडे तक्रार घेऊन गेलेला असतो? सामान्य माणसांचा आणि यांचा काहीतरी संबंध उरला आहे काय? आणि एवढाच जर सामान्य माणसांचा पुळका असेल तर त्याला रोजच्या रोज ज्या मानव निर्मित कटकटीना तोंड द्याव लागत त्या बद्दल हे का बोलत नाहीत..? या लेखात विचारलेला माझा प्रश्न नोटा बंदीला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना आहे.

सामान्य जनतेच्या त्रासाचाच विचार करायचा तर अनेक गोष्टी सांगता येतील. तुम्ही मोर्चे, रस्ता रोको, हे बंद, ते बंद करता तेंव्हा सामान्य माणसाला खूप मोठा आनंद होतो का याचा विचार तुम्ही कधी करता का? मी ज्या दहिसर पश्चिम विभागात राहतो त्या दहिसरला स्टेशननजीक गेली काही वर्ष फुटपाथवर झोपड्या बांधल्या गेल्या आहेत. त्या झोपडीतल्या सर्वांचे सर्व व्यवहार झोपडीच्या बाहेर रस्त्यावर होतात. केवळ दोन लेनच्या त्या रस्त्याची जवपास एक लेन त्या झोपडपट्टीवासियांनी व्यापली आहे. आमची नगरसेविका शिवसेनेची आहे आणि आमदार भाजपची. लोकांना रस्त्यावरून आणि फुटपाथवरून चालण्याची सोय उरलेली नाही. गम्मत म्हणजे रोज सकाळी पोलिसची एक व्हॅन साखळी चोरांपासून सामान्य माणसांनी सावध रहाव म्हणून फुटपाथ वरून चालावं असं लाउड स्पीकरवरून आवाहन करत याच झोपड्यांच्या शेजारून जाते तेंव्हा हसावं की रडावं हेच काळात नाही. ‘सामान्य’ माणसाच्या या त्रासाची तुम्हाला कधी दाखल घ्यावीशी का वाटली नाही..? तसंच या ठिकाणी अगडबंब स्काय वॉक बांधून ठेवला आहे आणि त्याचा उपयोग तुमच्या तथाकथित ‘सामान्य’ माणसापेक्षा मोबाईल चोर, प्रेमी युगुले, गर्दुल्ले हेच करत आहेत. सर्वसामान्य माणसाला होणाऱ्या या त्रासाबद्दल तुम्ही कधी आकांडतांडव केल्याच ऐकल नाही. रस्ते, पेव्हर ब्लॉक हे या रांगांपेक्षा कितीतरी त्रासाचे विषय आहेत. मी केवळ दहिसरचं उदाहरण दिलं असलं तरी सर्व मुंबईभर असे प्रकार चालले असतील यात शंका नाही आणि त्यात तुमची भागीदारी नाही असं कसं म्हणता येईल? नोट बंदी ‘जालियनवाला’ तर तुमच्या या भ्रष्ट कारभाराला ‘मोगलाई’ असं नाव दिलं तर चुकेल का?

नोटा बंदिवरील थयथयटाचे खरं दुखण हे आहे की गेली अनेक वर्ष अश्या भ्रष्ट मार्गाने जमवलेली यांची रोकड माया आता अक्षरक्ष: मातीमोल झाली आहे. कोणताही दृश्य व्यवसाय नसताना हे नेते एवढे श्रीमंत कसे याच गुपित हे ज्यांचा हवाला देतात त्या सामान्य माणसाला चांगलच ठाऊक आहे. सामान्य माणूस ‘सामान्य’च राहिला याच एकमेव कारण हे सर्वपक्षीय राजकीय नेते आणि त्यांचे बगलबच्चे आहेत. काल परवा पर्यंत नाक्यावर उभ्या असणाऱ्या एखाद्या रिकामटेकड्या तरुणाला एखादा पक्ष कोणतं तरी फुटकळ पद देतो आणि मग बघता बघता त्या रिकामटेकड्या माणसाची जी भरभराट होते त्यामागचं कारण सामान्य जनतेला कळत नाही असं नाही. ते दिवस आता गेले. आता जनता सुबुद्ध झाली आहे. तिला सर्व काही कळतंय. मोदिनी १०००/५०० च्या नोटांवर बंदी आणली आणि ते ही न सांगता याचं खरं दु:ख या नेतेगिरी करणाऱ्या लोकांना आहे कारण इतक्या वर्षात ह्याच सामान्य माणसाच्या जीवावर ओरबाडलेली काळी माया आता मातीमोल झाली आहे. यांच्या मोर्चा, संसदेचा कारभार बंद पाडणं ह्या थयथयटामागील खरं कारण हेच आहे.

भविष्यात देशाला जर चांगले दिवस येणार असतील तर आम्हाला रांगेत उभं राहायला कोणताही त्रास नाही. अशीही आम्हाला रांगेची सवय असतेच, अडचण असते ती तुम्हाला. जिथ तिथे, अगदी देवाच्या दरबारातही, तुम्हाला रांगेतून न जाता आपली व्हिआयपिगिरी (आमच्या जिवावरची) दाखवत पुढे जायचं असतं. नोटा बदलण्यासाठी रांगेत उभं राहिलेल्यांचा कधी आपण कानोसा घेतलाय का? या रांगेतल्या माणसांपैकी ७०-८०टक्के लोक तुमच्यासारख्यांसाठी रांगेत उभे असतात. २०० रुपये कमिशनवर तुमच्यासारखे लोक या गरिबांना त्याचं ओळखपत्र देऊन नोटा बदलण्यासाठी रांगेत उभं करतात आणि तुम्ही स्वतः रांगेच्या नावाने गळे काढायला मोकळे राहता. पकडले गेले तर ते गरीब जातील, तुम्ही नामानिराळे राहायला मोकळे. बोटांना शाई लावायला सुरुवात केल्यावर लाईन एकदम कमी का झाली हो मग? त्याच कारण तेच वर सांगितलं ते. प्रामाणिकपणे आपल्या खात्यात पैसे भरायला येणारे लोक तुलनेने कमी आहेत, बदलाणारेच जास्त तेही दोन दोन वेळा बदलणारे.

कोणी मोठे लोक, उद्योगपती, श्रीमंत, बडे नोकरशहा लायनीत का उभे नाहीत हा आणखी एक तुमचा आक्षेप. ते लोक तर तसंही कोणत्याच लायनीत कधीच उभे नसतात. त्यांच्यासाठी काम करणारा त्यांचा स्टाफ असतो व बँकिंग पासून ते घरी भाजी आणण्यापर्यंत सर्व कामे ते नोकर लोकच करत असतात. ते भाजी बाजारात कधी दिसत नाहीत त्याबद्दल कधी कोणी तक्रार केलेली वाचलेली नाही. आपण पुढारी लोक तरी कधी जाता हो बाजारात?

देशाचं हीत असेल तर लॉकर काय घरही तपासायला द्यायला आम्हा सामन्यांची हरकत नाही. कारण सामन्यांकडे लपवण्यासारखं काही नसतंच. ज्याला कर नाही त्याला डर कसली? ज्याने गुन्हा केलाय त्याने घाबरावं, आम्ही कशाला घाबरू. आधी लॉकर कोणाचे आहेत ते तपासून बघा. गरीब आणि मध्यमवर्गीय जनता लॉकर घेण्याच्या भानगडीत फारशी पडत नाही आणि घेतला असेल तरी त्यात आयुष्यभर कष्ट करून घामाच्या पैशाने बनवलेले जे काही चार-दोन सोन्याचे डाग असतील तर तेच मिळतील, ते ही चोरांच्या भीतीने तिथे ठेवलेले. काळ्या पैशांच्या गड्ड्या तिथे कधीच सापडणार नाहीत मग त्यांनी लॉकर तपासाला गेला तर का घाबरावे?

सांगायचा मुद्दा हा आहे, की सामान्य माणसांची काळजी सोडा. आणि एवढा जर आमचा पुळका आला असेल तर कृपया तुम्ही राजकारण सोडा, आम्ही खूप सुखी होऊ. देशासाठी सामान्य माणसाने खूप त्याग केला आहे आणि तो पुढेही करेल. रांगेत उभं राहायला आम्हाला अजिबात त्रास नाही. आणि आम्हाला तसा त्रास होतो आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा आणि सामान्य जनतेची नाळ साफ तुटली आहे असं समजण्यास हरकत नाही. कृपया आमची काळजी करणं सोडून द्या आणि स्वतःच बघा ही कळकळीची विनंती.

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..