दांडी मार्च असू दे, नाहितर चले जाव ची क्रांती, राजकुमारी अमृत कौर या सगळ्यात सहभागी होत्या. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा ती व्यक्ती एखादा मोठा निर्णय घेते, आणि तो निर्णय आयुष्यभर निभावून नेते. आपलं सुखवस्तू आयुष्य सोडून ३-३ दा जेल यात्रा करणं नक्कीच सोप्प नव्हतं, ते पण एका राजकुमारीसाठी. राजकुमारी अमृत कौर.
२ फेब्रुवारी १८८९ साली राजकुमारी अमृत ह्यांचा जन्म कपूरताला लखनऊ येथे राजा सर हरमन सिंघ अहलुवालिया ह्यांच्या घरात झाला. घरातील शेंडेफळ तथा राजघरण्यातले शेंडेफळ अतिशय सुखवस्तू आयुष्य नियतीने लिहून दिले होते. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांची रवानगी इंग्लड ला झाली, शिक्षणासाठी. ऑक्सफर्ड विद्यालयातून MA ही पदवी घेऊन त्या भारतात परत आल्या. भविष्यात काही वेगळंच मांडून ठेवले होते. पंजाब मधील जलीयनवाला बाग हत्या कांडाने त्यांचे मन उद्विग्न झाले, भारतावरील ब्रिटिश राजवटीचे काळे रंग सगळ्या देशाने अनुभवले. राजकुमारी अमृत कौर आतून हलल्या. त्यांच्यावर गांधी विचारधारेचा पगडा होताच. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. गावा-गावातून फिरून लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळी बद्दल जागरूकता निर्माण केली. त्यावेळची परिस्थिती म्हणजे कितीतरी लोकांना आपण पारतंत्र्यात आहोत म्हणजे काय ह्याचेसुद्धा आकलन नव्हते. त्याचबरोबरीने समाजात बरीच सुधारणा आवश्यक आहे जे त्यांना जाणवलं. बाल विवाह बंदी, परदा प्रथा किव्हा देवदासी ह्या सगळ्यांविषयी त्या बोलल्या. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. दांडी यात्रा, चले जाव आंदोलन ह्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येकवेळी त्यांना कारावास सश्रम भोगावा लागला. कारावासात जातांना त्याचा चरखा आणि भगवद्गीता त्यांच्या बरोबर असत. बाहेर आल्यावर त्यांचे काम अविरत सुरूच राहिले. गांधींच्या सचिव म्हणून त्यांनी १६वर्ष काम पाहिलं. आपलं सगळंच आयुष्य त्यांनी देशासाठी वाहून दिले, त्यासाठी त्यांनी आजन्म अविवाहित राहणं पसंद केलं.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्यांचे काम सुरू राहीले. स्वतंत्र भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळात पहिल्या आरोग्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला. आपल्या १० वर्षाच्या प्रदीर्घ कालक्रीर्दीत त्यांनी AIIMS (All India Institute of Medical Science) सारख्या संस्थेची स्थपना केली. ही भारताला मिळालेली स्वतःची ओळख आणि एक मोठी उपलब्धी आहे. समाजसुधारणेचे तसेच शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठीचे पाहिले पाऊल म्हणता येईल. अनेक संस्थाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले, जसे की AIIMS, Tuberculosis Association of India, and St. John’s Ambulance Corps. आजीवन अध्यक्ष असणे म्हणजे त्या त्या संस्थांची पूर्ण जवाबदारी घेणे, हे अमृत कौरजींनी करून दाखवले.
६ फेब्रुवारी १९६४ साली त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आई-वडिलांनी जरी धर्मांतरण करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला असला तरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे शीख धर्मानुसारच केले गेले. आपल्या आयुष्याचा निर्णय घेऊन त्याची जवाबदारी पूर्णपणे स्वीकारलेल्या, आयुष्याच्या शेवटपर्यंत समाजाचे हीत जपणाऱ्या अश्या ह्या भारतमातेच्या विरंगनेला माझे शत शत नमन.
|| वंदे मातरम्||
— सोनाली तेलंग.
१६/०७/२०२२
संदर्भ:
http://xn--e4b.inuth.com/
http://xn--f4b.indianexpress.com/
http://xn--g4b.thelogicalindian.com/
http://xn--h4b.wikipedia.org/
Leave a Reply