अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला ।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।।
जेव्हां दशरथ युद्धास जाई ।
कैकयी त्याच्या सेवेत राही ।।
राजनीति अन् युद्धनीति ही ।
अवगत झाली सारी तिजला ।।१।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
नजीकच्या त्या देशामधूनी ।
रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।।
सामान्य जनाला जर्जर करुनी ।
हा हाः कार तो माजविला ।।२।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
परिस्थितीला जाणून घेतां ।
केवळ चौदा वर्षाकरीता ।।
राम वनी तो पाठवी माता ।
तोड नसे त्या दूरदृष्टीला ।।३।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
माता आणि राजधुरंदर ।
दुहेरी भूमिका ही शिरावर ।।
निर्णय घेऊनी अतिशय खडतर ।
इतिहास जिने घडविला ।।४।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
रावणवृत्ती महा असूरी ।
नष्ट केली तिनेच खरी ।।
मार्ग निवडले जरी कांटेरी ।
यशस्वी केले रामप्रभुला ।।५।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
धाडीला नसतां राम वनीं ।
मारीला असता रावण कुणी ?
स्वतःचे शिरीं कलंक घेवूनी ।।
धरणीवरचा पाप भार रोकला ।।६।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply