नवीन लेखन...

रमाबाई पंडिता

रमाबाई पंडिता यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ रोजी झाला.

रमाबाई पंडिता या स्त्रियांचा सर्वांगीण विकास, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रियांची कर्तबगारी यांबाबत बुद्धिमत्ता व स्व- कर्तृत्वाच्या साहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही पायाभूत कार्य केलेल्या विदुषी!

परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या विदुषी म्हणजे पंडिता रमाबाई होत.

रमाबाई पंडिता यांचा जन्म अनंतशास्त्री व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली. रमाबाई १५-१६ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.
मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून-विशेषतः आईकडून-संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या त्या काळातील एकमेव महिला होत. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. हा त्या काळातील क्रांतिकारी असा विवाह होता. कारण पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते. पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या.

बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. १८८३ साली त्या इंग्लंडला गेल्या. तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृत शिकवले. परदेशातील वास्तव्यात त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या व त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक काऱ्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या.

भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ ज्यू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले. ११ मार्च, १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली. त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले. २४ सप्टेंबर, १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. ‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.

अशा या थोर विदुषीला १९१९ साली ‘कैसर-ए-हिंद’ सुवर्णपदक मिळाले. स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व काऱ्याचा ठसा उमटवला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवला होता.

पंडिता रमाबाई यांचे ५ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे पंडिता रमाबाई यांना आदरांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..