नवीन लेखन...

रामायण – नेतृत्व गुणधर्म

रामायण हा भारताचा गौरवशाली इतिहास आहे. देव, नर, वानर, राक्षस ह्या सर्व मानव जातीच होत्या. त्यांच्यामधील परस्पर संबंध, रावणाची दहशत, त्या दहशतीचा कायमचा नि:पात करण्यासाठी राम जन्माला येण्यापूर्वीच त्याकाळच्या सक्रिय ऋषीवृंदाने केलेला रावण वधाचा संकल्प व ह्यासाठी एकत्र येऊन कोणी कोणी काय काय करायचे या तपशीलासह केलेली योजना व रामाच्या माध्यमातून तो रावणवध प्रत्यक्ष घडवून आणणे हे सर्व त्यावेळच्या जागतिक राजकारणाचे रोमहर्षक वर्णन वाल्मीकिंनी रामायणात केलेले आहे.

12240 ख्रिस्तपूर्व वर्षी जन्मलेला राम ऐतिहासिक पुरुष होता. हे नासाच्या प्लानेरियम सॉफ्टवेअर ने निर्विवाद सिद्ध केले आहे.

धर्मानुसार जो आचरण करतो त्या व्यक्तिला समाज धारणेसाठी समाजासमोर आदर्श म्हणून प्रस्तुत करावे म्हणजे जनसामान्य त्याचे अनुकरण करतील ह्या उद्देशाने वाल्मीकि ऋषींनी रामाचे चरित्र लिहिले. त्यावेळी बरेचसे रामायण घडून गेले होते व वाल्मीकिंच्या समकालीन असलेला राम अयोध्येचा राजा होता.

रामायण चा शब्दश: अर्थ – राम ज्या मार्गावरून चालला. जीवनमूल्यांशी तडजोड न करता रामाने जो धर्माधिष्ठित व्यवहार केला तो समजावून घेऊन त्या मार्गावरून चालणे. रामायण मानवी जीवनाची आचारसंहिता आहे.

नेतृत्व

यथा हि कुरुते राजा प्रजा तमनुवर्तते.  शीर्ष नेतृत्व महत्त्वाचे असते.

नेतृत्व देशाचे असो, सैन्याचे असो, व्यावसायिक क्षेत्रामधील असो, सामाजिक संघटनेचे असो वा एखाद्या संस्थेचे असो. काही समान नेतृत्व गुणांची आवश्यकता असते. तसेच त्या त्या क्षेत्रानुसार अधिक विशेष गुणांची, गुणधर्माची आवश्यकता असते. उच्च स्थानी असणे म्हणजे नेतृत्व करण्यास पात्र होणे असे नाही.

उच्चासनगतो नीच: नीच एव न चोत्तम: ।

नीच, कनिष्ठ व्यक्ती उच्च पदावर किंवा स्थानावर विराजमान झाली तरीही ती क्षुद्रच राहते. महान व्यक्ती बनून श्रेष्ठत्व आणि आदर मिळवू शकत नाही. एखाद्या व्यक्तीचे मूल्य त्याच्या पदा वरून,  त्याच्या उच्च स्थानावर असल्याने ठरत नाही, तर त्याच्या गुणांवरून ठरते. गुणवत्तेने व्यक्ती श्रेष्ठ बनते.

गुणैरुत्तमतां याति नोच्चैरासनसंस्थित: ।  प्रासादशिखरस्थो।़पि काक: किं गरुडायते।।   –चाणक्यनीतिशतकम् 16.6

म्हणून, गुणांचा ध्यास धरायचा. नेतृत्वाचा नाही. नेतृत्वाच्या मागे लागायचे नाही. गुणसंचयामुळे नेतृत्व अवश्य प्राप्त होते.

गुणधर्म

दोन भिन्न गुणांमध्ये जेव्हा तर-तम करायचा प्रसंग येतो तेंव्हा श्रेष्ठ गुणासाठी त्या तुलनेत त्या प्रसंगी असलेल्या कमी महत्त्वाच्या गुणाचा त्याग करायचा असतो. हा गुणधर्म.

स्थळ-काळ-परिस्थिती सापेक्ष करण्याचे कर्तव्य म्हणजे धर्म. मोठÎा ध्येयामध्ये छोटे ध्येय आड आले तर मोठÎा ध्येयाला प्राधान्य द्यायचे म्हणजे धर्म.

आज्ञाधारकपणा हा एक मोठा गुण. मातापित्याचे ऐकणे, गुरुचे ऐकणे अर्थातच अपेक्षित.  परंतु रामाने माता पिता गुरु यांचे ऐकले नाही. 14 वर्षे वनवास पत्करला. वनात गेला. पित्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. पत्नीचाही त्याग केला. शेवटी लक्ष्मणाला  त्यागले. वाटेल ती किंमत दिली. पण धर्मपथावरून हटला नाही. हे सर्व रामाने का करावे? तर समाजाचे स्वास्थ टिकावे,  नीतिमूल्यांचे रक्षण पोषण व्हावे यासाठी. सीता त्यागानंतर राम सीतेची मूर्ती शेजारी बसवून यज्ञ करीत असे. रामाने दुसरे लग्न केले असते तरी त्याला कोणी अडवले नसते. परंतु रामाने नवीन निकष स्थापन केले. धर्म असा आचरणाने स्थापित होतो. भाषणाने नाही. म्हणून रामो विग्रहवान् धर्म: असे म्हटले आहे.

धर्मज्ञ: सत्यसंधश्च प्रजानां च हिते रत: ।

यशस्वी ज्ञानसंपन्न: शुचिर्वश्य: समाधिमान् ।।

राम वेदज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ, शास्त्रांची नित्य चर्चा करणारा, स्थिरबुद्धीचा, शस्रास्त्रांमध्ये प्रवीण, अहंकार रहीत,  विनम्र,  निष्कपटी, परस्त्रीकडे न बघणारा, व्यक्तिव्यक्ती जोडणारा,   दुसऱयांचे अपराध विसरणारा, कुणी टोचून बोलले तरी कठोर उत्तर न देणारा, कुणी अल्पसा जरी उपकार केला तरी तो लक्षात ठेवणारा, दुसऱयांचे गुण जाणणारा, कुणाला पाहता क्षणीच अंतरंग ओळखणारा, सेवाभावी वृत्तीचा होता.

राम मृदुभाषी तसेच पूर्वभाषी होता. म्हणजे स्वत:हून संभाषण आरंभ करायचा. राज परिवारातील असला तरी औपचारिकतेत बद्ध नव्हता. सहजतेने लोकांमध्ये मिसळायचा. त्यांत नोकर, वृद्ध सर्व असायचे. आत्मीयतेने त्यांची व घरच्यांची चौकशी करायचा.

जे मनाने चांगले अशांसह राम सत्याग्रही होता. तर, मनाने दुष्ट, विकृत अशांसाठी तो शस्त्राग्रही होता.

केवळ 15 वर्षाचे असताना योगवशिष्ठ ऐकल्याने रामाचा अध्यात्मिक पाया भक्कम झाला. त्याचा उपयोग रामाला जीवनमूल्यांशी तडजोड न करता धर्म स्थापनेसाठी आयुष्यभर संघर्ष करताना नक्कीच झाला असणार.

दशरथाने रामाला राजदरबारात बोलावून सर्वांसमक्ष तुझा उद्या यौवराज्याभिषेक होणार असे सांगितले तेव्हा राम निर्विकार होता. त्याच्या दुसऱयाच दिवशी कैकेयीने रामाला 14 वर्षे वनांत तात्काळ जायचे आहे असे सांगितले तेंव्हाही कसलाच भाव त्याच्या चेहऱयावर नव्हता. किंबहुना, एवढÎा क्षुल्लक कारणासाठी पित्याला का त्रास दिला? असे रामाने कैकेयीला विचारले. राजप्रासाद ते वनात झाडाखाली झोपणे हे एका रात्रीत झालेले परिवर्तन रामाने सहजरित्या स्वीकारले. सुखदु:खे समे कृत्वा हे गीतेत सांगितल्याप्रमाणे स्थितप्रज्ञतेची परिसीमाच!

राम व भरत ह्यांमधील सत्तात्यागाची चढाओढ मानवी इतिहासातील असामान्यच ! वनात जायच्या अगोदर रामाने त्याचे स्वत:चे असे सर्व दान केले. परत आल्यानंतर लागेल. असा विचार त्याने केला नाही.

वनवासात जायला निघाला तेव्हा राम 25-26 वर्षाचा होता. ना सत्ता ना पद ना अधिकार. तरीही असंख्य अयोध्यावासी त्याच्या मागून वनात जायला निघाले. अयोध्येत आठ दिवस अग्निहोत्र झाले नाही. अन्न शिजवले गेले नाही. सर्वसामान्यांसारखे दु:ख रामालाही व्हायचे. पण ते स्वत:साठी नसायचे. इतरांसाठी असायचे. सीताहरण झाल्यावर सीतेला किती दु:ख होत असेल, ही वार्ता अयोध्येत कळली तर तिथे किती दु:ख होईल ह्यामुळे तो व्यथित झाला होता. सर्वसामान्यांसारखा रामाला ही क्रोध यायचा. पण तो स्वत:साठी नसायचा. युद्धात काही वेळा राम जखमी झाला. पण त्यावेळेला त्याला क्रोध आला नाही. त्याचा सारथी मातली जेव्हा जखमी झाला त्यावेळेस मात्र राम अत्यंत क्रोधित झाला.

किष्किंधा नगरीत झालेल्या सुग्रीवाच्या राज्याभिषेकाला व युद्धानंतर लंका नगरीत झालेल्या विभीषणाच्या राज्याभिषेकाला राम उपस्थित राहिला नाही. 14 वर्षे नागरी वस्तीत प्रवेश न करणे, वनात राहणे हे पित्याला दिलेले वचन पित्याच्या मृत्यू नंतरही रामाने पाळले.

राम निर्णय प्रक्रियेत इतरांना समाविष्ट करून घ्यायचा. त्वरित निर्णय घ्यायचा. लक्ष्मण-हनुमान पहिल्या भेटीत,  राम सुग्रीवाला शरण आला आहे हा रामाचा निरोप लक्ष्मण सांगतो. परिस्थितीनुसार अंतिम लक्ष्य गाठण्यासाठी स्वत:कडे धाकुटेपणा घ्यायचा असतो.

राम-लक्ष्मणाला एका प्रसंगात सांगतो की साधेपणा, मृदुभाषीपणा, शांत स्वभाव, सहनशीलता हा कमकुवतपणा म्हणून ओळखला जातो. लोकांना फक्त शक्तीची भाषा कळते. रामाची राजनीतिज्ञता, परिपक्वता उच्च कोटीची होती. रावण-वाली ना-युद्ध करार व मैत्री करार झाला होता. रावण वधासाठी वालीला संपवणे हे आवश्यक होते. वाली रावणाहूनही अति पराक्रमी होता. त्याला मारण्यात वानरसेनेची हानी होणार होती. वेळेचा ही अपव्यय होणार होता. त्यामुळे वालीला कपटाने मारणे हा एकमेव पर्याय रामाने स्वीकारला.

वालीवध केल्यावर सुग्रीवाच्या राज्याभिषेकासह वाली पुत्र अंगदाचा यौवराज्याभिषेक केला. त्यामुळे सुग्रीव विरोधी वालीचा गट शांत झाला. फुटला नाही. सर्व वानरसेना एकसंध राहिली. ‘युद्ध टाळण्याची शेवटची संधी’ हे सांगण्यासाठी म्हणून रावणाकडे वालीपुत्र अंगदाला दूत म्हणून पाठवले. जेणेकरून रावणाला संदेश मिळावा की त्याचा मित्र असलेल्या वालीची सर्व सेना रामासह आहे.

युद्ध आरंभ होण्यापूर्वी विभीषण रामाला शरण आला. त्याचा लगेच लंकेचा राजा म्हणून रामाने राज्याभिषेक केला. रावणाच्या सैन्याचे तसेच लंका नागरिकांचे किती खच्चीकरण झाले असेल ! रावण त्या काळातील सर्वोच्च जागतिक शक्ती होती. त्याला पराभूत करण्यासाठी रामाने भिल्ल, वानर समाज संघटित केले. विजयासाठी समाजातील सर्वात कमकुवत दुवा सोबत घ्यावा लागतो.

युद्ध समाप्तीनंतर नवीन राजा विभीषणाची अनुमती घेऊन सीतेला भेट असे हनुमानाला सांगितले. राजकीय शिष्टाचार पालन जेता झाल्यावर ही केले. सीतेचा त्याग पती रामाने केला नव्हता तर राजा रामाने केला होता. पर्शिया (ईराण)  पासून श्याम देशा (थायलंड) पर्यंत असलेल्या विराट साम्राज्याची होणारी राणी संशयातीत असावी ही रामाची भूमिका होती. नुसते शुद्ध चांगले असणे पर्याप्त नसते. समाजाने सुद्धा तसे स्वीकारावे लागते.

ज्या सिद्धांताच्या आधारावर समाजाचे रक्षण, पोषण होते, राष्ट्र टिकून राहते असा सत्य सिद्धांत कधीही बहुमताच्या आधारावर सिद्ध होत नाही. एक जरी असला तरी ते सत्य असते. नेतृत्व हे असे असते. राष्ट्रातील तरुणांनी रामाचा आदर्श ठेवावा.

राम-रावण युद्धात एकदा रामाने रावणाला मारू शकत असता परत पाठवले. हा  संदर्भ पृथ्वीराज चव्हाणासाठी  नियम बनला. त्याने मोहम्मद घोरीला अनेक वेळा परत पाठवले. पहिल्याच भेटीत ठार केले असते तर भारताचा इतिहास व भूगोल वेगळा झाला असता. सावरकरांनी अशा प्रकारच्या अनुकरणाला सद्गुणविकृती हे नाव दिले.

रामाच्या भरताला शासनासंबंधी सूचना/शासकासाठी वस्तूपाठ

ा  मंत्री विद्वान, विचारवंत, कुलीन, जितेंद्रिय धोरणी असावेत

ा  एकाच विषयाची चर्चा प्रत्येकासह, काहींच्या संचामध्ये व सर्वांसह कर व नंतर निर्णय घे.

ा  झालेला निर्णय घोषित होण्याआधीच फुटू नये

ा  निर्णय प्रक्रियेस दीर्घकाळ लागू शकतो परंतु त्याचे कार्यान्वयन त्वरित व्हावे.

ा  पूर्ण झालेल्या कामासाठी कसोटीत उतरलेल्यांचा पुरस्कार देऊन सत्कार कर

ा  शत्रुपक्षाकडील प्रमुख 18 सर्वोच्च अधिकारी व आपल्याकडील प्रमुख 15 सर्वोच्च अधिकारी यांच्या प्रत्येकाच्या मागे परस्परांना माहीत नसलेले तीन तीन हेर ठेव

ा  शत्रु पक्षाकडे लोभी, अपमानित झालेली मानी व्यक्ति, एकाएकी क्रोधित झालेली रागीट व्यक्ती, भिववलेला भित्रा असे फितूर करून घे

ा  राज्याला अपायकारक लोकांना राज्याबाहेर घालवल्यावर पुन्हा ते परत आले तर ते दुर्बळ आहेत असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस

ा  लाच घेऊन निरपराध्याला दंड, तसेच दोषीला सोडून देणे असे होऊ नये

ा  14 प्रकारच्या राजदोषांपासून अलिप्त रहा

ा  संपूर्ण पृथ्वी आपलीशी करून तिचे धर्माने परिपालन कर

आदर्श शासन-रामराज्य

सध्या जगाचे भौगोलिक राजकारण संलग्नीकरण करून,  दमन करून , वर्चस्व गाजवून चालवले जाते. हे घटक विविध सभ्यतेत संघर्ष घडवून आणतात. रामाच्या जीवनाची शिकवण आहे की कुणाला दडपून, कुणावर वर्चस्व गाजवून नाही तर जीवनमूल्ये प्रेरित करून नेतृत्व साध्य होते.

सुशासनासंबंधी अन्न वस्त्र, निवारा, शिक्षण, सुरक्षा न्याय या विषयांत कदाचित काही शासक रामराज्याशी तुलनात्मक असतीलही. परंतु रामाचे व रामराज्याचे वैशिष्ट्य असे की संपूर्ण प्रजेची अध्यात्मिक उन्नती होईल याचा ध्यास राष्ट्रप्रमुख म्हणून रामाने घेतला.

‘सबका साथ सबका विश्वास सबका विकास’ यासह ‘सबका उद्धार’ हे ही असायला हवे. रामासम चारित्र्य, व्यवहार परिवार, समाज व प्रजेप्रती असलेले कर्तव्य आत्तापर्यंत विश्वाच्या कुठल्याही राजात, राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रप्रमुखात बघायला मिळत नाही म्हणून रामाला पुन्हा पुन्हा आठवायचे. रामाचा प्रभाव भौगोलिक प्रसारापासून अंतरंगाच्या आतल्या खोलीपर्यंत पसरलेला आहे

अलौकिक गुणवत्ता असलेल्या रामाला अवतार समजण्यात आले. त्याला देवत्व लाभले व पुढे देव म्हणून त्याची पूजा होऊ लागली. रामाला देव म्हणून पूजायला काहीच हरकत नाही. परंतु पूजा करताना ‘रामो भूत्वा रामं यजेत्’ हा भाव असावा.

रामायण ज्ञान यज्ञातील माझी ही छोटीशी आहुती समाप्त.

-गिरीश यशवंत टिळक – ठाणे
मो. 9820352412

विश्व हिंदू परिषद आणि नचिकेत प्रकाशन द्वारे प्रकाशित श्री रामार्पण या खास ग्रंथातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..