शब्दभ्रमाकार, बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करणारे रामदास पाध्ये जन्म २४ जानेवारी १९४५ रोजी झाला.
रामदास पाध्ये यांचा अर्धवटराव माहीत नाही असा एकही मराठी माणूस शोधून सापडणार नाही. बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करण्याचं श्रेय रामदास पाध्ये व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनाच जाते. आजच्या कार्टून्स, ॲनिमेशनच्या काळातही बोलक्या बाहुल्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. १९१६-१७ पासून अर्धवटरावचे कार्यक्रम सुरु झाले. या गोष्टीला १०० हून अधिक वर्षे झाली.
रामदास पाध्ये हे स्वत: मॅकेनिकल इंजिनीअरींग आहेत. रामदास पाध्ये यांचे वडील यशवंत पाध्ये, म्हणजेच प्रो. वाय. के. पाध्ये यांनी शब्दभ्रमाची कला पहिल्यांदा भारतात आणली. साधारणतः १९२० च्या सुमारास प्रो. वाय. के. पाध्ये जादूचे प्रयोग करायचे. त्या दरम्यान त्यांनी दोन मुखवटे घेऊन शब्दभ्रमाचे कार्यक्रम करायलाही सुरुवात केली. त्या पात्रांची नावे होती बंडी शास्त्री आणि चक्रम काका. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी काही परदेशी कलाकारांचे शब्दभ्रमाचे कार्यक्रम पाहिले. त्यातून प्रेरणा घेऊन, आपणही एक पूर्ण बाहुली तयार करावी असे त्यांच्या मनाने घेतले. त्यावेळी इंग्रजीतील एक कार्यक्रम पाहून त्यांनी एक पात्र तयार केले, ज्याचे नाव होते ‘मिस्टर क्रेझी’. या इंग्रजी नावावरूनच पुढे मराठीत त्याचे नामकरण झाले ‘अर्धवटराव’. या बाहुल्याचे स्केच त्यांनी तयार केले. तेव्हा भारतामध्ये बाहुल्या तयार होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी इंग्लंडमधील एका दुकानामधून ही बाहुली मागविली होती. १९१६-१७च्या सुमारास ही बाहुली तयार झाली आणि पाध्ये यांच्याकडे आली. हाच आपल्या सर्वांचा लाडका अर्धवटराव. प्रो. पाध्ये यांनी या बाहुलीसंदर्भातील सगळी माहिती लिखित स्वरूपात ठेवली होती. पण पुढे त्या हस्तलिखितांना वाळवी लागल्याने ती मिळू शकली नाही. त्यामुळे साधारणतः १९१६-१७ पासून अर्धवटरावचे कार्यक्रम सुरू झाल्याची माहिती रामदास पाध्ये देतात. अर्धवटरावला घेऊन प्रो. पाध्ये कार्यक्रम करू लागले.
पुढे त्यांच्या जोडीला कुणीतरी असावे म्हणून पत्नी आवडाबाई आली. अर्धवटराव-आवडाबाई यांना घेऊन केलेल्या विनोदी कार्यक्रमांना खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. या दोन बाहुल्यांच्या जोडीला मग त्यांची मुले, शामू आणि गंपू हे दोघेही आले. या चौघांना घेऊन काही सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे काही कार्यक्रम करू, या विचारातून त्यांनी कुटुंबनियोजनाचा संदेश देणारे कार्यक्रमही केले. मुंबईमध्ये गणेशोत्सव, नवरात्रौत्सवात हे कार्यक्रम व्हायचे. प्रो. पाध्ये मराठीबरोबरच इंग्रजीतही कार्यक्रम करायचे.
अर्धवटरावांशी गप्पा मारताना ते त्या-त्या स्थळ, काळानुरूप पंचलाइन्स शोधून काढायचे. प्रो. पाध्ये अर्धवटरावला घेऊन आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव करायचे. तेव्हा त्यांचा मुलगा लहानगा रामदास ते कुतुहलाने पाहत असायचा. एकदा असाच सराव करत असताना प्रो. पाध्ये थोडा वेळ आतल्या खोलीत गेले होते. तेव्हा लहान असलेल्या रामदास यांनी अर्धवटरावांशी बोलण्यास सुरुवात केली. अर्थात, अर्धवटराव काही त्यांच्याशी बोलेना. रामदास वडिलांना म्हणाले, ‘हा अर्धवटराव फक्त तुमच्याशी बोलतो. माझ्याशी नाही.’ त्यांचे बोलणे ऐकून ते हसले. ते म्हणाले, ‘मी सांगतो तसे केलेस तर तो तुझ्याशीही बोलू लागेल.’ अर्धवटराव आपल्याशी बोलावा या कुतुहलापोटी रामदास यांनी शब्दभ्रम कलेचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. पुढे ११ वर्षे अभ्यास करून त्यांनी ही कला आत्मसात केली.
वडिलांनी सांगितल्याप्रमाणे रामदास यांनी स्वतः एक पात्र निर्माण केले ज्याचे नाव होते ‘बेटा गुलाब’. रामदास साधारणतः सतरा-अठरा वर्षांचे असताना त्यांनी १ मे १९६७ रोजी मुंबईच्या बिर्ला क्रीडा केंद्रात त्यांचा पहिला कार्यक्रम केला. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेची आठवण ते सांगतात. ते म्हणाले होते, ‘आता माझी चिंता मिटली. माझा अर्धवटराव कायम बोलत राहणार असा विश्वास मला वाटतोय.’ वडिलांकडून मिळालेली ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया रामदास यांच्यासाठी मोलाची होती. त्यानंतर दुर्दैवाने आठच दिवसांनी वाय. के. पाध्ये यांचे निधन झाले. पुढे रामदास यांनी अर्धवटरावसह कार्यक्रम करायला सुरुवात केली.
त्यांनी बनविलेले व जिवंत केलेले अनेक बाहुले जगभरच्या रसिकांनी आपलेसे केले आहेत. काही काळ त्यांनी नोकरीही केली. त्या काळी पंचतारांकीत हॉटेलांमध्ये जादूगार, काही कलाकार यांचे खेळ होत असत. तेव्हा एका हॉटेलने रामदास यांना बोलक्या बाहुल्यांचा खेळ करण्याचे निमंत्रण दिले. पंचतारांकीत हॉटेल असल्याने हा कार्यक्रम इंग्रजीत करावा लागायचा. तेव्हा अर्धवटरावचा ‘मिस्टर क्रेझी’ होत असे. या कार्यक्रमांमुळे माझी इंग्रजीवरील हुकूमत वाढली असे रामदास सांगतात. एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये अर्धवटरावांचा हा खेळ एका परदेशी व्यक्तीने पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला. पुढे त्याने अर्धवटरावांना अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले. कोलंबिया ब्रॉडकास्टसाठी हा कार्यक्रम होणार होता. तेव्हा रामदास यांच्या भावाने एक नवेकोरे स्क्रीप्ट लिहिले. त्या कार्यक्रमाचे नाव होते ‘योग आणि ड्रग्ज’. रामदास आणि त्यांचे भाऊ त्यासाठी अमेरिकेला गेले. त्या निमित्ताने अर्धवटरावांनी भगवी कफनी, हातात कमंडलू, रुद्राक्षांची माळ अशी वेशभूषा केली होती. तिथल्या मंडळींना हा कार्यक्रम खूप आवडला. अर्धवटरावने अडीच महिने अमेरिकेला राहून विविध कार्यक्रमांतून तेथील प्रेक्षकांवर आपली जोरदार छाप पाडली. अमेरिकेहून मुंबईला आल्यानंतर रामदास पाध्ये यांनी नोकरी सोडली आणि पुढे पूर्णवेळ या कलेतच स्वतःला झोकून दिले.
१९७२-७३ चा तो काळ होता. दूरदर्शनची सुरुवात झाली आणि अर्धवटराव टीव्हीवर झळकला. दूरदर्शनवर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत अर्धवटराव प्रेक्षकांशी गप्पा मारू लागला. ‘मेरी भी सुनो’ हा अर्धवटरावचा पहिला कार्यक्रम. नंतर त्याच्यासोबत इतर पात्रेही आली. मराठीत ‘तुम्हीच विचार करा’ आणि त्याचेच हिंदी रुपांतर ‘आपही सोचिए’ दूरदर्शनवर दिसू लागले. टीव्हीमुळे अर्धवटराव घरोघरी पोहोचला. अगदी साध्या-साध्या विषयांवरुन प्रेक्षकांशी मारलेल्या गप्पा हे अर्धवटरावाचे वैशिष्ट्य होते. अनेक जाहिरातींमध्येही अर्धवटराव चमकला.
रामदास पाध्ये यांचा अर्धवटराव मोठ्या पडद्यावरही चमकला आहे. १९६० च्या सुमारास आलेल्या ‘अकेली मत जैयो’ या चित्रपटात तो ज्युबिलीकुमार राजेंद्रकुमारसोबत गप्पा मारताना पडद्यावर दिसला. त्यावेळी प्रो. वाय. के. पाध्ये यांनीच अर्धवटरावला आवाज दिला होता. एका फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये साक्षात अमिताभ बच्चन यांना अर्धवटरावचा कार्यक्रम खूप आवडला. अमिताभ यांना त्यांच्या ‘महान’ सिनेमात शब्दभ्रमकाराची भूमिका साकारायची होती. त्यांनी ही कला शिकण्याची इच्छाही प्रदर्शित केली. परंतु कमी वेळेत ते शक्य नसल्याने रामदास पाध्ये यांनीच पडद्याआडून अर्धवटरावाला बोलते करायचे ठरले. त्यावेळी अर्धवटराव अमिताभसोबत चमकला. बिग बींबरोबर झळकल्याने अर्धवटरावची लोकप्रियता शिगेला पोहोचली. मराठीत ‘झपाटलेला’ या चित्रपटामध्ये सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी अर्धवटरावची जोडी जमली होती.
अनेक बड्या सोहळ्यांमध्ये कार्यक्रम करण्यासाठी अर्धवटरावला निमंत्रणे येऊ लागली. अर्धवटराव परेदशातही सुपरहिट ठरला. सिंगापूर, बँकॉक, दुबई, ओमान, हाँगकाँग अशा विविध देशांतील चॅनेल्सनी अर्धवटरावला घेऊन कार्यक्रम केले. सुमारे २५ देशांतील टीव्हीवर अर्धवटराव झळकला आहे. या कार्यक्रमांबरोबरच त्या देशांमध्ये खासगी कार्यक्रमही खूप झाले.मर्लिन मेन्रो या जगप्रसिध्द हॉलिवुड अभिनेत्रीच्या स्मृती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिला मानवंदना देण्यासाठी ज्या विविध कलाक्षेत्रातील रथी- महारथींचा समावेश करण्यात आला होता, त्यात पाध्येंच्या खास बाहुल्यांच्या कार्यक्रमानेसुध्दा उपस्थितांमध्ये आपली चांगलीच छाप पाडली होती.
मराठी भाषेतील आद्य नाटककार विष्णुदास भाव्यांनी अगदी बारीकसारीक हालचाल करू शकतील अशा असंख्य कळीच्या लाकडी बाहुल्या बनवून ठेवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग त्या बाहुल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्येच्या हातात आल्या. रामदास पाध्ये व अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून विष्णुदास भावे यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भावे यांना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला. त्यांनी तयार केलेले विविध बाहुले जगाच्या कानाकोपऱ्यांतून नावाजले गेलेले आहेत. मार्मिक विनोदीबुध्दीने प्रेक्षकांमध्ये हास्याची कारंजी फुलवताना त्यांना विवीधांगी विचार करण्यास प्रवृत्त करणारे रामदास पाध्ये यांना या कलेचे शास्त्रोक्त ज्ञान व प्रशिक्षण देणारी एक संस्था काढायची इच्छा आहे.
रामदास पाध्ये यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply