नवीन लेखन...

देवगडातल्या ‘गिर्ये’ गांवचं ‘श्री देव रामेश्वर मंदिर’

Rameshwar Mandir at Girye - Devgad

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील ‘गिर्ये’ हे एक दक्षिण कोकणातील कोणत्याही गावाप्रमाणे एक निसर्गसंपन्न गाव. सुप्रसिद्ध ‘विजयदुर्ग’ किल्ला याच ‘गिर्ये’ गावात वसला आहे व त्याचे आदिलशाही अम्मलातले नाव ‘घेरिया’ हा ‘गिर्ये’चाच अपभ्रंश आहे ( ‘गिर्ये’च घेरिया झालं की ‘घेरिया’चं गिर्ये यात नेहेमीप्रमाणे तज्ञांत मतभेद आहेत. आपला तो विषय नाही.). आता इतक्या वर्षानंतर ‘विजयदुर्ग’ हे वेगळे महसुली गाव अस्तित्वात आले आहे. पुढे ‘रामेश्वर’ हे स्वतंत्र गावही अस्तित्वात आले.

याच मूळ गिर्ये गावची ग्रामदेवता ‘श्री देव रामेश्वर’..! हे देवस्थान ‘विजयदुर्ग’ व नवीन ‘रामेश्वर’ गावांचीही ग्रामदेवता आहे. मूळ मंदीराची स्थापना इसवी सनाच्या १२ व्या शतकात झाली असल्याचे ग्रामस्थ सांगतात. म्हणजे श्री रामेश्वराचे हे देवस्थान जवळपास आठशे वर्ष जुने असून प्राचीन स्थानिक वास्तुकलेचा अप्रतिम उत्कृष्ट नमुना आहे..हे मंदीर रस्त्यावरून दिसण्यात येत नाही कारण हे रस्त्याच्या पातळीपासून सुमारे चाळीस-पन्नास फुट खाली आहे..

मंदिरापाशी पोहोचताच आपल्याला एक दगडी, भव्य प्रवेशद्वार दिसते. हे प्रवेशद्वार अंदाजे सुमारे ५० फुट उंच व दहा-पंधरा फुट रुंद असून प्रवेशद्वाराच्या सर्वात वरच्या भागात नगारखाना आहे. नगारखान्यात जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचा जिना आहे..रस्त्यावरील प्रवेशद्वारातून खालच्या देवळाचा मुख्य दरवाजा दिसतो. तिथपर्यंत जाण्यासाठी लाल दगडी चिऱ्यात घडलेली जवळपास ४०० फुट बाय १५ फुट लांबीची –रुंदीची उतरती (व पावसाळ्यात निसरडीही) वाट उतरून जावे लागते..ह्या वाटेच्या दोन्ही बाजूच्या तटबंदीमध्ये दिवे लावण्यासाठी खोबण्या केलेल्या आहेत..वाट उतरून आपण खाली मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. ह्या प्रवेशद्वारात एक मोठी पितळी घंटा लोखंडी साखळदंडानी लटकवलेली असून घंटेवर 1791 हा सालदर्शक इंग्रजी भाषेतला आकडा कोरलेला स्पष्ट दिसतो. ही घंटा इथे कशी आणि कुठून आली ते मी नंतर इथेच खाली सांगणार आहे.

देवळाच्या पूर्वेकडच्या मुख्यद्वारातून आपण आत शिरलो की अगदी दारात कोकणी पद्धतीच्या सात उंच दीपमाळा एका आडव्या रांगेत उभ्या असलेल्या दिसतात. ह्या दीपमाळा वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांची उंची एकसारखी नाही. दिपमालांची उंची एकसारखी नाही. ह्या दिपमालांच्या शीर्ष स्थानी काही निशाण्या कोरलेल्या असून प्रत्येक दिपमालेच्या डोक्यावर वेगळे चिन्ह आहे. ते नेमके काय आहे हे इतक्या खालून लक्षात येत नाही. देवळाचे आवार सुमारे १०० फुट रुंद व १४० फुट लांब असून चारही बाजूला दगडी कोट आहे..कोटात कधी काळी ओवऱ्या काढलेल्या असाव्यात अश्या खुणा आहेत. चारही दिशांना कलाकुसर केलेले दगडी दरवाजे आहेत. पश्चिमेकडील दरवाज्यात कोटावर जाण्यासाठी जिना काढलेला आहे.

जवळपास १०० फुट बाय ४० फुट लांबी-रुंदीचे हे मुख्य देऊळ कोकणी पद्धतीचे, लाल मंगलोरी कौलांनी शाकारलेल्या उतरत्या छपराचे आहे. ह्या श्री रामेश्वर देवालयाची स्थापना इसवी सनाच्या १२ व्या शतकात झाली असावी असे स्थानिक सांगतात. आता पर्यंत ह्या मंदिराचा तीन वेळा विकास व विस्तार झाला असावा असेही जाणकार सांगतात. पहिला विस्तार इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या सुरुवातीस सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी मूळ स्थाना भोवती दगडी गाभारा उभारून केला. त्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरदार संभाजी व सखोजी आंग्रे ह्यांनी संपूर्ण लाकडी कलाकुसरीने मढवलेला खांब-महिरापिंचा अतीव सुंदर सभामंडप उभारला व सभोवती दगडी कोट व दगडी फरसबंदी उभारून मंदिर बंदिस्त केले. ह्या सभामंडपाच्या सौंदर्यात आणखी भर घालून नाना फडनविसांचे बंधू व त्यावेळचे विजयदुर्ग प्रांताचे सुभेदार गंगाधरपंत भानू ह्यांनी आणखी देखणा सभामंडप सन १७७५-१७८० च्या दरम्यान तयार केला.

ह्यातील शिवलिंग स्वयंभू असल्याचे सांगतात. गाभाऱ्याच्या बाहेर एक देखणा लाकडी देव्हारा असून त्यात नंदीवर सवार शंकराची चाळीस किलो वजनाची भरीव चांदीची एक मूर्ती होती ती काही वर्षापूर्वी चोरीस गेली. कोटाच्या दक्षिण दरवाजातून बाहेर गेल्यावर सरदार संभाजी आंग्रे ह्यांची दगडी घुमटीची समाधी अजूनही दिसते परंतु झाडोरा व जंगल वाढल्याने ही समाधी बाहेरूनच पहावी लागते.

सुरुवातीस आपण पहिले की देवळाच्या पूर्वेच्या प्रवेशद्वारात इसवी सन 1791 हा इंग्रजी अक्षरातला आकडा कोरलेली पितळी घंटा आहे. ही घंटा पेशव्यांचे त्याकाळचे आरमार प्रमुख आनंदराव धुळप ह्यांनी युरोपीय शत्रूंच्या जहांवरून जप्त केल्याचा उल्लेख श्री माधव कदम ह्यांनी लिहिलेल्या ‘असा हा सिंधुदुर्ग’ ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समग्र इतिहास सांगणाऱ्या पुस्तकात सापडतो. आनंदराव धुलास्प ह्यांनी पोर्तुगीजांचे ‘संतान’ हे मुख्य जहाजासहित त्याच्या ताफ्यातली १९ अन्य जहाजे व इंग्रजांच्या ‘रेंजर’ ह्या मुख्य जहाजासमवेत अन्य ४ जहाजांवर विजय मिळवून जप्त करून विजयदुर्गात आणून ठेवली होती. ही घंटा त्या पैकी नेमक्या कोणत्या जहाजावरची, ही माहिती मिळत नाही. ह्याच आनंदराव धुळपांनी पोर्तुगीजांचे ‘संतान’ ह्या मुख्य जहाजावरून जप्त केलेली जहाजाची मुख्य डोलकाठी (निशाणकाठी – फ्लॅग पोस्ट) रस्त्य्वारी नगारखान्याच्या दारात उंच उभी असलेली दिसते. रस्त्यावरील नगारखान्यासमोरील ‘निशाण काठी’ व देवळाच्या प्रवेशद्वारावरील घंटा परदेशी शत्रूवर मराठ्यांनी मिळवलेल्या विजयाची ‘विजयचिन्हे’ म्हणून ह्या देवस्थानाला अर्पण केली गेली आहेत ह्याचा अर्थ हे ह्या परिसरातील मोठे देवस्थान होते हा निष्कर्ष आपल्याला काढता येतो. आनंदराव धुळपांचा राहता वाडा आजही विजयदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पाहता येतो.

आता देवळाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या असलेल्या सात असमान उंचीच्या दीपमालां व त्यांच्या डोक्यावर असणार्या वेगवेगळ्या चिन्हानविषयी..! विजय दुर्ग हे त्याकाळात मराठा आमदारांचे प्रमुख स्थान होते व त्यामुळे अर्थातच गिर्ये गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील होते. ह्या गावात कोणत्याही परक्या व्यक्तीला किंवा पांथस्थाला सहजसहजी प्रवेश मिळत नसे. गावात येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी प्रथम देवळात मुक्काम करायचा अशी प्रथा होती.. पांथस्थाने ती रात्र देवळात मुक्काम केल्यावर दुसऱ्या दिवशी गावातील मानकऱ्यांची भेट घेऊन आपल्या येण्याचे प्रयोजन, मुक्कामाचे दिवस, सोबतचे समान ह्याची संपूर्ण माहिती द्यायची व गावात मुक्कामाला परवानगी मागायची अशी पद्धत होती. परंतु त्या दिवशी कोणता मानकरी गावात उपलब्ध आहे ह्याची माहिती त्या परक्या पांथस्थाला कशी कळायची? तर म्हणू ह्या साठी ह्या दीप माळांची योजना होती. ह्या सात दीपमाळा त्या गावच्या सात मानकऱ्याच्या (सध्या अश्या पाच मानकर्याची योजना असून त्यांना ‘बारा-पाचांचा मान’ असे म्हणतात. बारा बलुतेदार व पाटील, परब किंवा प्रभू, घडी, गुरव आणि महार असे पांच मानकरी असा त्याचा अर्थ) निशाण्या होत्या. प्रत्येक मानकऱ्याच्या हुद्द्याप्रमाणे त्यांची उंची कमी जास्त होती व त्याच्या शीर्षस्थानी त्या मानकऱ्याचे विशिष्ट चिन्ह कोरलेल असे. ज्यादिवशी ज्या विशिष्ट दीपमालेवरील दिवे पेटवले जात, तो मानकरी त्या दिवशी गावात उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ देवळाचा पुजारी त्या परक्या पांथस्थाला सांगून त्या परक्या व्यक्तीस त्या मानकऱ्याची भेट घेण्यास सांगत असे व त्याची पुढील व्यवस्था लावत असे.

ह्या देवळाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे जे कोकणात इतरत्र कुठे बघायला मिळत नाही ( मलातरी दिसलेले नाही). ह्या देवळाच्या बाहेरच्या तीन भिंतींवर पुरातन भित्तीचित्रे आहेत. ह्या द्विमितीतल्या आणि नैसर्गिक रंगात रंगवलेल्या चित्रात रामायणातील प्रसंग चितारलेले आहेत. ही चित्रे कोणी काढली आणि ती नेमकी कोणत्या काळातील आहेत ह्याचा अंदाज येत नाहीत. ग्रामास्थानाही ह्याबद्दल फार काही माहित असल्याचे दिसले नाही..परंतु जुनी असावीत असे त्याच्या शैलीवरून लक्षात येते. उघड्यावर असल्याने इतकी वर्षे उन-वारा आणि पावसाचा मारा झेलून ती आता अस्पष्ट होत चालली आहेत.

जाता जाता –

हे मंदिर मी सात आठ वर्षांपूर्वी पाहिले होते. आता परवा पुन्हा पाहिले. थोडा फरक जरूर झालाय परंतु देवालयाची सुंदरता तसूभरही कमी झालेली नाही. नुकतीच काही वर्षांपूर्वी देवळाची नव्याने डागडुजी करण्यात आली आहे. कोकणात शेकड्यांनी काही शे ते काही हजार वर्षांपूर्वीची पुरातन देवालये आहेत. मोडकळीस आलेल्या अश्या ह्या पुरातन देवळांचा अत्यंत विकृत पद्धतीने जिर्णोद्धार सुरु आहे. जुनी घाटदार खांबांची, लाकडी बांधणीची, कौलाने श्कारलेली साधी परंतु देखणी मंदीरे तोडून त्या जागी सिमेंट-कॉन्क्रीटच्या कॉलम-बीम-स्लबॅची आणि लेटेस्ट मार्बोनाईट, मार्बल फ्लोअरिंगची ठोकळेबाज मंदिरे करोडो रुपये खर्च करून बांधली जात आहेत. स्थानिक लोक आणि तेथील लोकनेते ह्यांची ‘विकासा’च्या विकृत कल्पनेत त्या मंदिराचा आत्माच नाहीसा होत आहे ह्याचे सोयर-सुतक कोणालाही नाही हे जास्त भयानक आहे. ह्या पार्श्वभूमीवर गिर्येतले हे ‘श्री रामेश्वर देवालय’ व तेथील गावकरी निश्चितच कौतुकास पात्र ठरतात.

नुकतीच काही वर्षांपूर्वी ह्या देवस्थानाचे नुतनीकरण झाले. बाह्य नुतनीकरणात देवळाच्या मूळ स्वरूपास कोणत्याही प्रकारचा धक्का लावला गेलेला नाही. आतील पुरातन झालेले लाकडी खांब, तूळया, छपराला आधार देणाऱ्या सऱ्या मात्र बदलून पुन्हा त्याच जुन्या डीझाईनच्या मात्र संपूर्ण लाकडी तुळया, खांब, महिरपी, कमानी आणि सऱ्या बसवल्या गेल्या आहेत. एकाच फरक झाला आहे आणि तो म्हणजे पूर्वीच्या लाकूड कामावर रंगीत चित्रे काढलेली होती तर आता मात्र त्या लाकडावर पॉलिश केलेलं आहे. गावकऱ्यांनी पूर्वीसारखीच चित्रे काढून घेण्याचा प्रयत्न कदाचित केला असावा परंतु तशी चित्रकला करणारे कारागीर आता उपलब्ध नसावेत हे ही कारण असावे..! काही असले तरी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या देवळाचे पुरातन स्वरूप जपण्याचा प्रयत्न खचितच अभिनंदनीय आहे व म्हणून त्यांचे कौतुक करण्यासाठी तरी येथे जाऊन येणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अश्या ह्या श्री देव रामेश्वर’च्या देवालयास देवगडात जाने झाल्यास आपणही मुद्दाम भेट द्यावी असे सुचवावेसे वाटते.

-गणेश साळुंखे
9321811091

दि. २१ जुलै २०१६.
संदर्भ- १. ‘असा हा सिंधुदुर्ग’ – लेखक माधव कदम
२. श्री. चारुदत्त सोमण, स्थानिक रहिवासी व पर्यटन तज्ञ.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

1 Comment on देवगडातल्या ‘गिर्ये’ गांवचं ‘श्री देव रामेश्वर मंदिर’

  1. Mndiratil ghanta aani dol kathi hi vijaydurgache sardar Kuveskar hyani jinkun anleli 0aan itiahs dhulpancha naav sangto hi shojantika aahe.
    Kokani mangatanvar jhakela anyaych aahe haa.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..