नवीन लेखन...

मूर्तीभंजकांची परंपरा…

मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला आणि मुठा नदीत तो फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे. राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी दादाजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. त्यावर बरीच चर्चा रंगली होती. आता पुन्हा ब्रिगेड चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष स्थापन केला आहे. काही महिन्यांमध्ये पुणे महापालिका निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिेगेडने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. कारण काही असो. कृती निषेधार्ह आहे.

मुळात मूर्तीभंजनाची परंपरा अरबस्तानातून आली आहे. जे आपल्याला पटत नाही, जे आपले नाही किंवा ज्यांचे आपण विरोधक आहोत (जे आपले विरोधक आहेत, असा अर्थ नव्हे) ते ते सर्व नष्ट झाले पाहिजे अशी ही धारणा आहे. अरबस्तानातून आलेल्या आक्रमकांनी भारतातील मंदिरे पाडली, मुर्त्या फोडल्या, ग्रंथ जाळून टाकले. ही त्यांची परंपरा आहे. कारण त्यांना चर्चा अमान्य आहे. ख्रिस्ती साहित्यातील एक कथा वाचली होती (कोणत्या पुस्तकात किंवा नियतकालिकात ते आठवत नाही). अरबस्तानातील काही आक्रमक ख्रिस्त्यांच्या देशात गेले. तेथील एका चर्चवर त्यांनी आक्रमण केले व फादरला विचारले की “सांग कोणाचा ग्रंथ महान आहे, तुझा की आमचा? जर तू म्हणालास, तुझा ग्रंथ महान आहे तर आम्ही तुला मारुन टाकू आणि जर तू म्हणालास, आमचा ग्रंथ महान आहे, मग तू आमचा ग्रंथ शिरोधार्थ न मानता तुझा ग्रंथ शिरोधार्थ मानलास म्हणून तुला मारुन टाकू”. ही मूर्तीभंजकांची मानसिकता आहे. त्यांना चर्चा नकोय, त्यांना केवळ भंजन करायचे आहे. जो आपल्या विचारांचा नाही त्याच्या विचारांचा आदर करण्याची परंपरा त्यांच्यात नाही. ती परंपरा हिंदूंमध्ये आहे. म्हणूनच आपलं मस्तक गौतम बुद्ध आणि महावीर जैन यांसारख्या महापुरुषांसमोरही आपसुक झुकलं जातं. ही भारतीय परंपरा आहे. भारतीय परंपरा तोडण्यावर भर देणारी नसून जोडण्यावर आणि उभारण्यावर भर देणारी आहे. म्हणून आपल्यात मूर्त्या घडवल्या जातात. श्रद्धेचा विषय सोडा. परंतु मूर्ती घडवणे ही कलाकृती आहे. त्या कलेचा आणि कलाकाराचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे.

१८९६ रोजी चापेकर बंधूंनी व्हिक्टोरिया राणीचा पुतळा विटंबित केला होता. परंतु त्यामागची भावना उदात्त होती. त्या काळी इंग्रजांचे शासन होते आणि आपल्या कृतीतून इंग्रजांच्या साम्राज्याविषयीचा राग व्यक्त करायचा होता. तसेच इंग्रजांना दाखवून द्यायचे होते की भारतीय तरुण तुमच्या क्रूर शासनाविरोधात पेटून उठले आहेत. या भावनेने चापेकर बंधूंनी राणीच्या पुतळ्याला काळे फासले. ते राज्यच आपले नव्हते. आता लोकशाही आहे. कोणतेही सरकार असले तरी आपले भारतीयांचे राज्य आहे. स्वा. सावरकरांनी इंग्रजांचा निषेध म्हणून विदेशी कपड्यांची होळी टिळकांच्या नेतृत्वाखाली केली. हा सुद्धा चीड व्यक्त करण्याचा मार्ग आहे. कारण आपल्या देशात परकीयांचे राज्य होते आणि ते राज्य उलथवून टाकणे हे कोणत्याही देशभक्ताचे परमकर्तव्यच होते. पुढे अशीच होळी गांधीजींनी केली. ती खुप गाजली देखिल. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असलेले सावरकर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतः म्हणाले की आता पुढे क्रांती ही बंदूकीच्या गोळीने नव्हे तर मतदानाच्या पेटीत आपले मत टाकून करायची आहे. हे लोकशाहीचे महत्व सावरकरांनी सांगितले आहे. त्याच सावरकरांच्या अंदमानातील काव्यपंक्ती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी खोडल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रेस आणि अय्यर सुद्धा मूर्तीभंजकांच्या परंपरेत अगदी शोभून दिसतात. ही मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. संभाजी ब्रिगेड ही त्या मानसिकतेची अनुयायी आहे. चर्चा करण्यापेक्षा भांडण, तंटे करायचे, मारामार्‍या, तोडफोड करायची. कारण असे केल्याने कोणाला उत्तर देणे बंधनकारक राहत नाही आणि त्यांची कृती सुद्धा पूर्ण होते. संभाजी महाराजांची बदनामी केली असे ब्रिगेड म्हणत आहे, त्या ब्रिगेडला गोविदाग्रंजांनी शिवरायांचा रचलेला सुंदर पाळणा माहित नसावाच. असो

१९१० च्या सुमारास लिहिलेले राजसंन्यास हे नाटक कोणाच्याही लक्षात नव्हते. वादासाठी मान्य केले की गडकरींनी संभाजी महाराजांचा अपमान केला. पण त्याचा आता काय संबंध? हा वाद उपटून काढण्याला काहीच अर्थ नाही. राम गणेश गडकरींना हे जग सोडून जवळ जवळ ९८ वर्षे झालीत. त्या नाटकाचा प्रयोगही आता होत नाही. त्यात ते अपूर्ण राहिलेले नाटक आणि जर निषेध करायचाच होता, तर त्यावर सविस्तर लेख लिहून लोकांचे प्रबोधन करता आले असते. मुळात प्रबोधन या शब्दाचीच एलर्जी ह्यांना असावी. कारण प्रबोधन करण्याआधी स्वतःला बोध व्हाया लागतो. असो.
माझे फेसबुकवरील मित्र डॉ. सुबोध नाईक यांनी लिहिलेल्या माहितीनुसार, १९३७ मध्ये मुंबई प्रांताच्या विधानसभेत शिवाजी महाराज युगपुरुष नव्हते असे कॉंग्रेसने सांगितले होते. मग आता गोविंदाग्रजांची मूर्ती हटवणारे ब्रिगेडी कॉंग्रेसचे काय करतील? नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर म्हटले की “संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नाही.. ज्या मर्द मराठ्यांनी केलं त्यांना सलाम” मग आता नितेशरावांचे वडील ज्या कॉंग्रेसमध्ये आहेत, त्या कॉंग्रेसने शिवरायांचा अपमान केला होता. या विरोधात मराठाचा अभिमान वगैरे बाळगणारे नितेशराव कोणती कार्यवाई करणार आहेत? आपल्या वडीलांना राजांचा अपमान करणार्‍या कॉंग्रेसचा राजीनामा देण्यास भाग पाडतील का? पण असे काही होणार नाही. कारण ह्यांचा पंथ आणि परंपरा मूर्तीभंजनाची आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता या सर्व गोष्टी तोंडी लावण्यापुरत्या आहेत. हे जरी भारतीय असले तरी ही मानसिकता भारतीय नाही. ही वाळवंटाची मानसिकता आहे. ती वाळवंटातून आलेली आहे आणि नतद्रष्टांनी पोसली आहे. संभाजी ब्रिगेडच्या त्या कार्यकर्त्यांना अटक होईलही. पण ही गलिच्छ मानसिकता, ही राक्षसी परंपरा कशी आणि कधी नष्ट होणार? मुळात ती नष्ट होण्याच्या मार्गातच आहे. कारण सज्जन आता जागरुक होत आहेत. त्यामुळे दुर्जनांची कोंडी होत आहे. गोविंदाग्रजांचा पुतळा हटवला या कृतीला प्रत्यूत्तर म्हणून गोविंदाग्रजांचे सहित्य अधिक वाचले आणि खपले जाईल ही आशा आणि खात्री मला आहे. गोविंदग्रजांनी त्यांच्या कवितेत “भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा” असं म्हटलंय. पण बुद्धी नसलेले काही जीव महाराष्ट्रात राहतात हे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे. तर अरबस्तानातील मूर्तीभंजनाची परंपरा चलवणार्‍या भारतीय ब्रिगेड्यांचे मी एक कलाकार म्हणून निषेध करतो आणि त्यांनी कितीही मूर्त्या फोडल्या तरी आम्ही विचारांची लढाई विचारांनीच आणि लोकशाही मार्गानेच लढणार, अशी प्रतिज्ञा घेतो. २३ जानेवारी रोजी राम गणेश गडकरींची पुण्यतिथी आहे. आपण सर्व साहित्यप्रेमींनी आपापल्या भागात आणि आपापल्या क्षमतेने ही पुण्यतिथी जागवायला हवी. या दिनानिमित्त गडकरींचे स्मरण करुया, त्यांचे साहित्य वाचूया, विकत घेऊया, साहित्य वाटप करुया किंवा त्यांची नाटके सादर करुया. आपल्याला जे शक्य होईल ते करुया. या भ्याड कृतीचा, या मूर्तीभंजनाच्या परंपरेचा निषेध करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Avatar
About जयेश शत्रुघ्न मेस्त्री 12 Articles
हिंदूत्त्व या विषयावर परखडपणे लिहिणारे श्री जयेश मेस्त्री हे व्यवसायाने विमा (एल. आय. सी )आणि गुंतवणूक एजंट आहेत. ते हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..