नवीन लेखन...

रामकृष्ण मिशन सेवा समिती, अलिबाग

Ramkrishna Mission Seva Samiti, Alibaug

समाजकार्य करताना आपण जे काम करतो आहे, व ज्यांच्यासाठी करत आहे त्यांच्याविषयी मनात प्रेम, आत्मीयता व स्थिरता हवी. निश्चलपणे व आजुबाजुला असलेल्या अडथळयांची तमा न बाळगता इतरांसाठी झटणारे समाजसेवक त्यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींना अजिबात घाबरत नाहीत. त्यासाठी लागणारे असामान्य धैर्य, स्वतःच्या तत्वांवर असलेला प्रचंड आत्मविश्वास, इतरांसाठी काहीतरी भव्य-दिव्य करण्यासाठी लागणारी जिद्द व अखंड सेवाभाग या सर्व गोष्टी अंगी बाणवण्यासाठी मनात शुध्दता व शरीरात बळ हवं असतं. जरी सर्व धार्मिक संघटना समाजातील तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी झटतीलच असं नाही, परंतु आध्यात्मिक व धार्मिक प्रवचनांमुळे व सत्संगामुळे आपल्याला मनाला स्थैर्य मिळत, चंचलता कमी होते, आपल्या पुढचा मार्ग अगदी धुतलेल्या काचेसारखा चकचकीत दिसायला लागतो, जीवनाच्या निराशावादी, काळोख्या कप्प्यांमध्ये सुध्दा आशेचे काजवे चमचमायला लागतात, मनाला नवी उमेद व उभारी येते, इतरांची सेवा करताना कधीतरी डोकावणारे स्वार्थी व आत्मकेंद्रीत विचारसुध्दा बंद होतात, व प्रसिध्दीच्या आर्कषणापासून मनुष्य हळुहळू लांब होत जातो. त्याचप्रमाणे इतरांसाठी काहीतरी करुन दाखवण्याची प्रचंड इच्छाशक्ती व शारिरीक उर्जासुध्दा मनात निर्माण व्हायला लागते. रामकृष्ण सेवा समितीच्या सदस्यांच्या अफलातुन कार्यक्षमतेचे व परस्परपुरक विचार सरणीचे हेच तर गमक आहे. समान धार्मिक विचारांनी व एकत्र बसून केलेल्या सत्संगानी त्यांच्या मनाच्या तारा अगदी एकसंधपणे जोडल्या गेलेल्या आहेत, व त्यांच्या आतापर्यंतच्या धार्मिक प्रवासाला, सामाजिक कार्याची सुध्दा सुंदर किनार आहे. या समितीने समाजसेवेचा व धर्मरक्षणाचा तसेच प्रसाराचा सुवर्ण मध्य साधला असुन केवळ लोकांच्या मनशांतीसाठी मोठया मोठया महाराजांची व स्वामी-संताची प्रवचने आयोजित करण्यात त्यांनी समाधान मानले नाही, तर जेव्हा जेव्हा अलिबागमध्ये किंवा आसपासच्या गावांमध्ये आपत्तीजन्य परिस्थिती ओढावली तेव्हा तेथील सर्व बांधवांना धान्य, भांडी, कपडे व सुक्या खाद्यपदार्थांपासून ते त्यांच्या तात्पुरत्या निवासापर्यंत सर्व व्यवस्था केली. १९८९ मध्ये जेव्हा जांभुळपाडयाला पुर आला तेव्हा या समितीच्या कार्यकर्त्यांनी तेथील मनाने व बुध्दीने उध्दवस्त झालेल्या बांधवांसाठी आपले सर्व श्रम पणाला लावले, व भक्कम स्वयंसेवकांच्या फळीने या आपत्तीग्रस्तांना केळी, ब्रेड, चिवडा, फरसाण असे अनेक दिवस टिकतील असे सुके खाद्यपदार्थ, धान्य, कपडे, भांडी, आंथरुण, व अत्यावश्यक वस्तू जसे की मीठ, मोहरी, डाळी, मसाले इ. वस्तुंची मदत केली. पेणला जेव्हा आसपासच्या खाडयाचं पाणी प्रमाणेबाहेर वाढुन तेथील काही गावांमध्ये घुसलं, तेव्हा अनेक लोकांचे कपडे, चटया, अंथरुण, गाद्या या सर्व गोष्टी भिजून, कुजून गेल्या होत्या. तेव्हा या समितीच्या स्वयंसेवकांनी त्यांना चटया, सतरंज्या, घोंगडया इत्यादींची मदत केली.

शैक्षणिक कार्यः

रामकृष्ण सेवा समितीचं शिक्षणाविषयक कार्यसुध्दा तेवढच विशाल, भरीव व गौरवास्पद आहे. दरवर्षी, अलिबागच्या आसपासमधील काही निवडक शाळांमध्ये शिकणारे जवळपास अडीचशे गरीब, गरजु परंतु शिक्षणाविषयी प्रचंड आस्था व आत्मीयता असलेले कष्टाळु व होतकरु विद्यार्थी निवडण्यात येतात, व त्यांना सर्व शालेय साहित्य, क्रमिक पाठयपुस्तक, वहया, कंपासपेटया, चित्रकलेच्या वहया व साहित्य, दप्तरे, नवा शालेय गणवेश इ. सर्व प्रकारची मदत या समितीमार्फत अर्थातच विनामुल्य पुरवली जाते. मुलांना केवळ वस्तूंची मदत करुन ही समिती थांबत नाही तर त्यांच्या बुध्दीचा व त्यांच्यामध्ये दडलेल्या विविध कलागुणांचा व कौशल्यांचा चॉफेर विकास व्हावा, वेगवेगळया विषयांवर संवेदनशील व प्रगल्भ विचार करण्यास त्यांनी प्रवृत्त व्हावे यासाठी अनेक शाळांमध्ये जावून विविध वयोगटांमधील मुलांसाठी विवीधांगी स्पर्धा आयोजित करण्यात येतात. वक्र्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, ग्रंथवाचन, निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व निर्माणशक्तीला नवे पंख फुटतात, त्यांची लेखन, वाचन व सादरीकरण कौशल्ये अधिक प्रभावी, सफाईदार व उठावदार होतात, त्यांची भीड चेपते व कुठल्याही पाठयपुस्तकांबरोबरच ते स्वतःच मनही वाचायला शिकतात! या स्पर्धेतील विजेत्यांना वेगवेगळया चांगल्या काही आध्यात्मिक तर काही सांस्कृतिक विषयांवरच्या ज्ञानसागरात मनसोक्त पोहता यावे व विविध सामाजिक विषयांचा रसास्वाद घेता यावा यांकरिता उपयुक्त दुर्मिळ पुस्तके, सीडीज् व फोटोज भेट म्हणून दिले जातात.

वैद्यकीय शिबीरे (medical camps)ः-

आठवडयाचे सहा दिवस कामाचे सोडले, तर इतर दिवशी स्वतःचे काम व कौटुंबिक जबाबदार्‍यांची कसरत सांभाळून समितीच्या कार्याला वेळ देणारे स्वयंसेवक रविवारी मात्र आपला पुर्ण वेळ अतिशय उत्साहाने समितीसाठी देतात. दर रविवारी आसपासच्या लहान गावांमध्ये, खेडयांमध्ये व आदिवासी पाडयांमध्ये वैद्यकीय शिबीरे आयोजित करण्यात येतात, ज्यामध्ये सर्व लोकांची मोफत डोळे तपासणी व सर्वांगीण आरोग्याची तपासणी केली जाते, मोतिबिंदुचा त्रास किवा इतर डोळयांसंबधी व्याधी असलेल्या किंवा इजा झालेल्या व्यक्तींवर त्वरित शस्त्रक्रिया केल्या जातात, (मुंबईस) या शस्त्रक्रिया विनामुल्य असतात, मुंबईच्या रुग्णालयात दाखल करणे, पुन्हा घरी आणणे, प्रत्यक्ष शस्त्रक्रिया, या रुग्णांच्या प्रवासाचा खर्च, हॉस्पिटलमधली अॅडमिशन फी अशा सर्व खर्चाची पुर्तता या समितीकडुन केली जाते. गावांमधील बेरोजगार तरुणांना नोकर्‍या मिळवून देण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जातात. त्यातील हौशी व सर्वगुणसंपन्न तरुणांना लघुद्योग, सहकारी संस्था किंवा स्वतःचा व्यवसाय थाटण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. गावात नुसत हुंदडण्यात वेळ घालविण्यापेक्षा त्यांची बेंजो पथके व बँडसुध्दा स्थापन केले जातात. पेझारीमधील कुसुंबळे या खेडयामध्ये स्वामी विवेकानंद युवक मंडळाची स्थापना झाली व अनेक बेरोजगार तरुणांना समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी नवी दिशा मिळाली व शारिरीक तसेच बौध्दिक मेहनत करण्यासाठी एक साचा उपलब्ध झाला. शाळेतील काही अतिशय गरजु परंतु होतकरु मुलांना या समितीकडुन मोफत बस सवलत पास दिला जातो व अनेक गरिब महिलांना महिन्याचा किराणासुद्धा दिला जातो.

धार्मिक कार्य ः-या समितीचे अलिबागमधील धार्मिक कार्यक्रम मुंबई, पुणे, नागपूर येथील मठांमधील स्वामी-महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आखले जातात. जेव्हा असे मोठे महाराज किवा स्वामी अलिबागला भेट देतात, तेव्हा वेळोवेळी त्यांची प्रवचने व्याख्याने व सत्संग आयोजित करण्यात येतात. लोकांना धार्मिक व आत्मिक समाधान मिळावे, त्यांच्या जीवनाला एक प्रकारची शिस्त लागावी, सर्व प्रकारच्या आमिषांपासून व वाईट मार्गांपासुन त्यांनी दूर राहावे, मनाचा विचलीतपणा दूर होवून त्यांना स्वतःची खरी किंमत व मोल कळावे, असा या व्याख्यांनामागील प्रमुख हेतु असतो. भगवद्गीता, रामायण, महाभारत, नारदी वक्तीसुत्र, ब्राम्हसुत्र, दासबोध, ज्ञानेश्वरी अशा प्राचीन धर्मग्रंथसंपदांमधील रसाची अवीट गोडी लोकांच्या जीभेला अधिक रुचेल अशा पध्दतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांचा संदेश संपूर्ण निरुपणासकट अगदी सोप्या भाषेत श्रोत्यांना समजावून सांगण व अखंड गहिर्‍या अशा भक्तीभावात श्रोत्याना आकंठ भिजवणं असा बहुउद्देशीय कार्यक्रम या व्याख्यानांमधून व सत्संगामधुन प्रतिबिबीत होत असतो. ही प्रवचने मुंबई किवा पुण्यामधील रामकृष्ण मठांच्या नावाजलेल्या स्वामी व महाराजांकडुन घेतली जात असून त्यांच्याच मार्गदर्शनावरुन आपले पुढचे उपक्रम ही समिती ठरवते. दरवर्षी या समितीकडुन आंतरयोग शिबीरे घेण्यात येतात, ज्यात सलग तीन दिवस सर्व श्रोत्यांना वैचारिक व आध्यात्मिक मेजवानीच असते. सर्वांना आपापल्या अंतरंगात डोकवून पाहण्याचे भाग्य या शिबीराच्या निमीत्ताने मिळते. सकाळी ५ ते सायंकाळी ८ या वेळेत नानाविध विषयांवर प्रवचने होतात, येथे जमलेल्या सर्व श्रोत्यांचे विचारमंथन व आत्मिक प्रबोधन केले जाते. दोन वेळेचा चहा, नाष्टा व दुपारचे जेवण, पुरेसा विरंगुळा व विश्रांती या सर्व जबाबदार्‍यांची पुर्तता समितीकडुनच होते. याशिवाय दर एकादशीला रामनामसंकीर्तन कार्यक्रम, रामकृष्ण परमहंसाच्या सर्व शिष्यांचे जयंती उत्सव, गुरुपोर्णिमा, गुरुनानक जयंती, नाताळ अशा जवळजवळ सर्व धर्मीय लोकांच्या जीवनातील अतिशय निकटचे सर्व सण-उत्सव व कार्यक्रम येथे अतिशय तुटुंब उत्साहात साजरे केले जातात व सर्वधर्मसमभावाचे रोपटे नकळतच सर्वांच्या मनात रुजवले जाते.

दरवर्षी अलिबाग, कनकेश्वर, चॉल, आवास येथे भरणार्‍या यात्रांच्यावेळी या समितीचा स्वतःचा पुस्तकांचा स्टॉल हा असतोच. यावेळी लोकांच्या मनावर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणार्‍या परमहंसाची, विवेकानंदांची , तसेच इतर अनेक स्वामी-योगीपुरुषांच्या धर्मविषयक व आध्यात्मिक पुस्तकांचा खजिनाच अतिशय कमी दरात येथे उपलब्ध करून दिला जातो.

भविष्यातील कार्यक्रमः रामकृण समितीचे अलिबागमधील आतापर्यतचे निरपेक्ष व तत्पर कार्य बघता धर्मबळकटीबरोबरच सामान्य जनतेच्या मनात सत्याचा, आत्मपरिक्षणाचा, वेदांचा व सुधारणावादी उदार धर्माचा प्रकाश उजळवण्याबरोबरच आपत्तीग्रस्तांच्या जखमांवर फुंकर मारण्याचे व त्यांना होईल तेवढी प्रत्येक मदत करण्याचे धोरण या समितीने नेहमीच राबवले आहे. प्रत्येक मानवाच्या अगदी आत अनेक स्वार्थी पडदयांमागे दडलेल्या असामान्य परोपकारी व त्यागशील भावनांना धार्मिक विचारमंथनाद्वारे बाहेर आणण्याचे व अजुन फुलवण्याचे कार्य या समितीने अगदी चोख बजावले आहे. “शीवे भावे जीवसेवा” हे अतिशय सुंदर असे ब्रीदवाक्य समितीच्या प्रत्येक कार्यातुन सार्थ होत आले आहे व मानवाला मोक्ष मिळवण्यासाठी स्वतःच्या आत्मिक व योगिक विकास करण्याबरोबरच इतरांच्या आयुष्यातील उन्हाची काहिली दुर करण्यासाठी सुध्दा झटावे लागते हेच जणु या समितीने सर्वांना अतिशय सुंदर प्रकारे पटवून दिले आहे. वरसोली परिसरामध्ये, शहरातील गजबजाटापासून दुर, या समितीला नवे कार्यालय उघडायचे आहे, मेडिकल लॅब व गरजु विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरु करायाचे आहे. तसेच रामकृष्ण परमहंसाचे एक सुंदर मंदिरसुध्दा साकारायचे आहे.(अलिबागमधील रामकृष्ण सेवा समिती ही महाराष्ट्र रामकृष्ण विवेकानंद भावप्रचार समिती या संस्थेशी संलग्न असून सर्व सामाजिक व धार्मिक उपक्रम व मदतकार्य या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.)

“महाडला दरड कोसळली तेव्हा” : महाडला दरड कोसळली तेव्हा अतिशय भिषण व ह्रदयद्रावक परिस्थितींचा सामना करुन, अतिशय, प्रतिकुल अवस्थेमधील अनेक रात्री जागुन या समितीच्या स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष मदतकार्य केले. चिखलांच्या ढीगार्‍यात अडकलेली जीवंत लोक हेरुन त्यांना बाहेर काढुन, त्यांच्यासाठी सुके खाद्यपदार्थ, तात्पुरता निवास, अंथरुण पांद्यरुण, भांडी, कपडे अशी सारी व्यवस्था करणे, त्यांच्या आर्थिक पुर्नवेसनाबरोबरच मानसिक पुर्नवसनसुध्दा करणे, ही सारी जबाबदारी समितीने आपल्या शिरावर घेतली होती. जवळपास १ हजार केळी, १ हजार चिवडा, फरसाण इतर सुक्या पदार्थांची पॅकबंद पाकिटे, साडया व कपडे इ. चे वाटप तेथे करण्यात आले.

— अनिकेत जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..