त्यादिवशी सकाळी झोपमोड झाली ती खर्र खर्र अशा आवाजानं. मी दार उघडून बाहेर आले. कंपाऊंडच्या बाहेरचा रस्ता एक म्हातारा खराट्याने जोरजोरात झाडत होता. मला पहाताच सरळ होत त्यानं कडक सलाम ठोकला. व म्हणाला,” त्या डागदरांकडं मी झाडत असतु, त्यांनी मला इकडं धाडलंय.” त्याच्या हाताच्या दिशेनं मला समजलं की तो आमच्या कॉलनीतल्या डॉक्टरांबद्दल बोलत होता. तो गेटमधून आत आला. झाडायला सुरुवात केली. बागेतला पालापाचोळा गोळा करून बाहेर फेकला.एक कपडा मागून घेतला. मोटरसायकल, कार स्वच्छ पुसली. टाकीतलं पाणी घेऊन अंगणात शिंपडलं. स्वतः हात-पाय धुतले व बरं आता उंद्याच्याला येईल असं म्हणत तो निघून गेला. एक मदतनीस मिळाल्याचे समाधान मला वाटलं.पगाराविषयी काहीही न बोलता तो कामावर रुजू झाला. रोज भल्या पहाटे यायचा. बाहेरचं झाडून झाल्यावर मी गेट उघडेपर्यंत बसून राहायचा. गेट उघडावे म्हणून त्याने कधीही आवाज दिला नाही. काम झाल्यावरही अंगणातच उभा रहायचा. कोणाचे तरी लक्ष गेल्यावर ‘जातू आता’ असं सांगूनच जायचा. तसे पाहता ते त्याचं काम करण्याचं वय नव्हतं.सत्तरीच्या मागेपुढे असेल. कृश अंगकाठी, रंग कुळकुळीत काळा, बारीक डोळे मध्यम उंची, पिंजारलेले व पांढरे केस. कपडे ढगळ आणि उसवलेले.बहुधा ते त्याचे नसावेतच. कधी खाकी गणवेश असायचा. एरवीही दिवसातून कधीकधी तो दिसायचा. डोक्यावर सरपण घेऊन जाताना. लहान मुलाच्या हाताला धरून शाळेत पोहोचवताना.
मला त्याच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली. अंगणातल्या कट्ट्यावर बसून मी त्याच्याशी बोलू लागले. त्यातून समजलं की तो झोपडपट्टीत राहत होता. घरात आजारी बायको, मुलं, सुना, नातवंडं, एक मुलगी माघारी आलेली.घरातले सगळेच मोलमजुरी करणारे. याचं नाव होतं रामकृष्ण. हळूहळू त्यानं आमचा विश्वास संपादन केला. कधी गावाबाहेर जावं लागलं तर तो म्हणायचा “जावा तुम्ही बिनघोर. मी हाय ना! बरुब्बर ध्यान ठेवतु.” बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने आम्ही त्याच्या वर घर टाकू लागलो.
नोकर मालक अशा भूमिका आम्ही कधी केल्या नाहीत. त्याचा पगारही ठरला नव्हता. आठ पंधरा दिवसातून तो पैसे मागायचा. वीस ते दोनशे रुपयांपर्यंत अशी रेंज असायची.त्याच्या वयाकडे पाहून आम्ही कधीच पैसे नाकारले नाहीत. कधीतरी पैसे परत करून तोच आम्हाला बुचकळ्यात टाकायचा. एकदा पैसे कुठून आणले असे विचारल्यावर ‘पेन्शन आली’ असे उत्तर आलं. मी ताडकन उडालेच.” नोकरीत होता तुम्ही?” तो म्हणाला,” मी नगरपालिकेत सफाई कामगार हुतो. हा उनिफारम तिथलाच हाये.” तेव्हा मला त्याचं काम,गणवेश, सलाम या सगळ्याचा उलगडा झाला. एकदा त्यानं विचारलं, “बाईसाहेब तुम्हाला पेन्शन किती मिळतिया?” मी म्हणलं “अजून मिळायची आहे.” त्यावर मिळंल, सरकारी काम, सावकाश होतुया अशी माझी समजूत काढली.मग माझी पेन्शन ही त्याची काळजी झाली. पुढे असं होत गेलं की हळूहळू तो पूर्णतः बहिरा झाला. दृष्टी अधू झाली.त्याचं काम आम्ही थांबवलं नाही,तो येत राहिला. पण संवाद अवघड झाला.
मला आश्चर्य वाटायचं. सुखवस्तू आणि झोपडीतली माणसं,माणूस म्हणून सगळे सारखेच. आम्हाला जेवढं मिळतं ते कमीच वाटतं. त्या सुखाचे ही अनंत प्रकार. सगळंच हवं असतं. आणि हा रामकृष्ण, इतके वय झालेला. अजून कष्ट करतो तेही विनातक्रार.आला दिवस कसा जाईल अशा परिस्थितीत हा इतका संतुष्ट कसा? धड कपडे, पोटभर जेवण या साध्या इच्छांवर कशी मात केली असेल? घेतलेले पैसे परत करण्याची वृत्ती त्याच्यात आली तरी कुठून? त्याच्याशी जुळलेले बंध तोडणं आम्हाला जमलंच नाही, आम्ही ते घर ते गाव सोडेपर्यंत. आम्ही तेथून जाणार समजल्यावर त्यालाही अतिशय वाईट वाटलं. आता तो काय करत असेल! त्याला नवीन सायबलोक भेटले की नाही देव जाणे. आम्हाला मात्र तसा रामकृष्ण अद्याप भेटायचा आहे.
– आराधना कुलकर्णी
Leave a Reply