नाशिक पासून १५ कि.मी. अंतरावर दिंडोरी तालुक्यातील शकुनाची अशी ओळख असणारा व ज्याच्या पायथ्याशी आशेवाडी गांव वसलं आहे तो म्हणजे रामसेन किल्ला, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तु कलेचा उत्तम नमुना व पुरातन खाणा खुणा अबाधित राखत पर्यटनाच्या दृष्टीनंही महत्वाचा असा “रामसेज किल्ला” वर्णन करता येईल.
रामसेज किल्ला म्हणजे राम की सेज अर्थात “रामाची शय्या”, किल्ला सर करताना म्हणजे अगदी सुरुवातीलाच कातळात खणलेलं पाण्याचं टाक दिसेल, आणि अगदी हाकेच्या अंतरावर भव्य “राममंदीर” असून, त्याचं बांधकाम हे अलिकडच्या काळातलं असावं पण मूर्ती मात्र जुन्याच आहेत. रामसेजच्या गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोरच्या भुयारात गुप्त दरवाजा खोदला आहे, इथून खाली उतरणारी वाट थोडी बिकट असून, डावीकडे निमुळते पठार असून उजवीकडे किल्ल्याचा माथा आहे. डावीकडच्या निमुळत्या पठारावर पडक्या स्थितीतील घरांचे व वाड्यांचे अवशेष इतकच काय ते शिल्लक आहे, त्यामुळे त्या जागेत काही विशेष पाहण्यासारखं नसल्याने पुन्हा माघारी म्हणजेच गुप्त दरवाज्याकडे यायचं, आणि किल्ल्याच्या माथ्याकडे जायचं, तिथली एक वाट कड्याला डावीकडे ठेवून पुढे गेली असून, तिथं कातळात खोदलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, पण त्याचा बहुतांश भाग हा गाडला गेला आहे. कमानीवर सुरेख “कमळाची फुलं” कोरली आहेत. मात्र या प्रवेश दारातून खाली उतरणारी वाट ही संपूर्णत: नष्ट झाली आहे. मागे फिरुन माथ्याकडे जात असताना वाटेमध्ये पाण्याचं लहानसं टाक असून यातील पाणी पिण्यासारखं आहे, तसंच त्याच्या थोडं पुढं गेल्यावर मोठं तळं देखील आहे. काही पाऊले चालल्यावर देवीचं एक सुंदर मंदीर नजरेस पडतं, जिथे मुक्काम ही करता येऊ शकेल. तसंच या मंदीराच्या मागील बाजूस एक गुप्त दरवाजा देखील आहे. हा दरवाजा अशा ठिकाणी लावण्यात आला आहे की शत्रुलाच काय, तर गडावर राहणार्या माणसांना सुद्धा सापडणं कठीण या दरवाज्यातू्न खाली उतरणं म्हणजे जणू तारेवरची कसरतच, या दरवाज्यतून एक वाट किल्ल्याच्या पश्चिम टोकाशी जाते. वाटेत वाड्यांचे अनेक अवशेष भग्नावस्थेत दिसतात. या किल्ल्याला नैसर्गिक तटबंदी निर्माण झाली आहे, त्यामुळे पुरातन वस्तुचे अभ्यासक, इतिहासकार, भूगोलतज्ज्ञांच्या दृष्टीनं “रामसेज किल्ला” महत्वपूर्ण ठरतो.
किल्ल्याला भेट द्यायची असल्यास नाशिकवरुन पेठला जाणारी कोणतीही एस.टी. ने जाता येतं व २० मिनिटातच आशेवाडी थांब्यावर उतरायचं; आशेवाडी गावातून सरळ वाटेने ४० ते ५० मिनीटांत रामसेज किल्ल्यावर पोचता येतं.
— सागर मालाडकर
Leave a Reply