नवीन लेखन...

‘प्रभात’ चा ‘रामशास्त्री प्रभुणे’ प्रदर्शित – ३० जून १९४४

आज दिनांक ३० जून. ‘प्रभात फिल्म कंपनी’ च्या ‘रामशास्त्री प्रभुणे’ या चित्रपटास प्रदर्शित होऊन ७७ वर्षं पूर्ण होऊन ७८ वे वर्ष लागलं.

३० जून १९४४ रोजी हा चित्रपट मुंबईच्या ‘सेंट्रल सिनेमागृहात’ प्रदर्शित झाला. चित्रपटाची निर्मिती संस्था प्रभात चित्र असून या चित्रपटाचे निर्माते विष्णूपंत दामले व साहेबमामा फत्तेलाल होते. चित्रपटाची कथा वि. स. सुखटणकर यांची असून पटकथा व संवाद शिवराम वाशीकर यांचे होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन वास्तविक पहाता तीन व्यक्तींनी मिळून केलं होतं. त्या व्यक्ती होत्या गजानन जागीरदार, गजानन नेने व विश्राम बेडेकर. गजानन नेने व विश्राम बेडेकर यांनी चित्रपटातील काही भाग दिग्दर्शित केला होता. या गोष्टीवरून वादंग होऊ नये म्हणून चित्रपटात टायटल्स दिली गेली नव्हती. या चित्रपटाला सुश्राव्य असं संगीत केशवराव भोळे, जी. दामले यांनी दिलं. चित्रपटाच्या गीत लेखनाची जबाबदारी स. अ. शुक्ल व शांताराम आठवले यांनी पार पाडली.

मंडळी या चित्रपटात कला दिग्दर्शन हा खूप महत्त्वाचा भाग होता. कारण पेशवेकालीन चित्रपट असल्याने चित्रपटात ती श्रीमंती व भव्यदिव्यता असणं गरजेचं होतं. या चित्रपटाचं कला दिग्दर्शन बी. डी. थत्ते आणि  साहेबमामा फत्तेलाल यांनी उत्कृष्टरित्या केलं. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या पांडुरंग नाईक व महंमद यांनी केलं असून चित्रपटाचं संकलन ए. आर. शेख यांनी केलं.

या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटात कलाकार ही देखील अत्यंत महत्वाची बाब होती. या चित्रपटात सगळ्या दिग्गज कलाकारांनीच काम केलं. चित्रपटात कलाकार म्हणून गजानन जागीरदार, बेबी शकुंतला, अनंत मराठे, ललिता पवार, गणपतराव तांबट, मा. विठ्ठल, हंसा वाडकर, मा. छोटू, सुधा आपटे, काका भागवत, मानाजीराव, बाळकोबा गोखले, मधु आपटे, मीनाक्षी या मातब्बरांनी अभिनय केला.

या चित्रपटातील १) दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव, २) सुकुमार माझा राम वनी जाई, ३) हंसुन बोल ना रूसू नको ना, ४) मी काशीला गं जाणार, ५) देखवेना जेव्हा हा घोर आकांत, ६) अवतारच तू नरवरा ही गीतं त्याकाळी बरीच गाजली.

चित्रपटाचं कथानक हे संपूर्णतः पेशवे कालीन घटनांभोवती फिरणारं असून सरतेशेवटी न्यायनिवाडा करताना रामशास्त्री खुद्द राघोबादादांना नारायणरावांचा खून केल्याबद्दल स्वतः च्या जीवाची पर्वा न करता कशी देहांत शिक्षा फर्मावतात हे या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे.

चित्रपटातील अखेरचा दरबारातील प्रसंग काळजाचा ठोका चुकविणारा आहे. भर दरबारात राघोबादादांचा राज्यारोहण सोहळा सुरू असताना ‘उचल ती तलवार, म्हणजे तिच्यावर असलेले नारायणरावांच्या रक्ताचे डाग तरी या सर्व मानकऱ्यांना दिसतील,’ हे वाक्य अक्षरशः रसिकांच्या अंगावर येऊन शहारे उत्पन्न करणारं आहे.

चित्रपटामध्ये वास्तविकता यावी यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळाने मदत केली. राजा केळकर यांनी त्यांच्या संग्रहातील दुर्मीळ वस्तू चित्रीकरणासाठी देऊ केल्या. तर, सरदार घराण्यातील वंशजांनीही त्यांच्याकडील वस्तू आणि कपडे वापरण्यासाठी दिले.

हा चित्रपट मुंबईत २७ तर पुण्यात ३० आठवडे चालला होता. चित्रपटाच्या हिंदी आवृत्ती मुळे हा चित्रपट देशभर प्रदर्शित करण्यात आला होता.

मंडळी आजही अनेक न्यायालयांत ‘रामशास्त्री प्रभुणे’ म्हणून गजानन जागीरदार यांची प्रतिमा भिंतीवर टांगलेली दिसून येते.

– आदित्य दि. संभूस. 

(अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)

संदर्भ: माहितीजाल.

३०/०६/२०२१.

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..