नवीन लेखन...

रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह

असे सांगितले जाते की तपश्चर्येच्या अवस्थेत, श्री भगवतानंद गुरूंना स्वप्नात शक्तिपाताद्वारे कुंडलिनी शक्तीचा साक्षात्कार झाला आणि नंतर भगवान शिवांनी त्यांना श्रीरामाच्या कथेवर आधारित श्रीराघवेंद्रचरितम् हा ग्रंथ लिहिण्यास प्रेरित केले. प्रस्तुत राम ताण्डव स्तोत्र हे या ग्रंथाचा एक भाग आहे.

तांडवाचा एक अर्थ भयंकर संहारक क्रिया असाही आहे. या स्तोत्राची शैली आणि भाव वीररस आणि युद्धाच्या भीतीने भरलेले असून ‘रामरावणयोः युद्धम् रामरावणयोः इव’ या उक्तीनुसार या युद्धाची भयानकता स्तोत्रात पुरेपूर उतरली आहे.

सर्वप्रथम दशाननाने शंकरस्तुतीपर ‘शिवतांडव’ स्तोत्र रचले. त्यानंतर इतर देवतांची ‘तांडव’ स्तोत्रे रचली गेली. प्रस्तुत स्तोत्र त्यापैकीच आहे. ते पंचचामर (जरजरजग) वृत्तात रचले आहे. त्यामुळे त्याला आलेली विशिष्ट लय भावप्रकटीकरणास पूरकच आहे. त्याच बरोबर अनेक श्लोकात एकच शब्द विविध अर्थांनी वापरून छेकानुप्रास अलंकाराचे मनोहर व अर्थपूर्ण उदाहरण व श्रीरामाचे सुंदर शब्दचित्र दिसते.


श्रीराम तांडव स्तोत्रम् – इंद्रादयो उवाच-

जटाकटाहयुक्तमुण्डप्रान्तविस्तृतम् हरे:
अपांगक्रुद्धदर्शनोपहार चूर्णकुन्तलः ।
प्रचण्डवेगकारणेन पिंजलः परिग्रहः
  स क्रुद्धतांडवस्वरूपधृक् विराजते हरि: ॥१॥

मराठी- इंद्रादि देव म्हणाले “ मस्तकावर कूपाच्या आकारात बांधलेल्या जटा विखुरल्या गेल्यामुळे ज्याचा चेहेरा विशाल दिसत आहे, कटाक्षांमुळे ज्याचा चेहेरा संतप्त दिसत आहे, तो, अत्यंत वेगा (जोषा) मुळे शत्रु सैन्यात (जणू काही) निर्भय मूर्तिमंत ताण्डवच असा, श्रीहरी शोभून दिसत आहे.”
जटा शिरी सुरेख चेहरा विशाल खास तो
विकीर्ण त्या, कटाक्ष टाकताच क्रुद्ध भासतो ।
रिपू-जमाव जोष कारणे अतीव घाबरे
तुफान नृत्य मूर्तिमंत रामरूप साजिरे ॥०१॥


अथेह व्यूहपार्ष्णिप्राग्वरूथिनी निषंगिनः
तथांजनेयऋक्षभूपसौरबालिनन्दना: ।
प्रचण्डदानवानलं समुद्रतुल्यनाशका:
नमोऽस्तुते सुरारिचक्रभक्षकाय मृत्यवे ॥२॥

मराठी- हा पहा व्यूह् ! आघाडीची आणि पिछाडीची; मारुती,जांबुवंत,सुग्रीव,अंगद यांच्यासारखे वीर योद्धे असलेली आणि असुरांच्या तीव्र अग्नी(प्रमाणे सेने)च्या नाशासाठी समुद्राप्रमाणे असलेली सेना ! अशा देवांचा शत्रू (असलेल्या) – दैत्यरूपी आग शमनासाठी जणू सागरच असणार्‍या दैत्यसेनेचा भक्षक, मृत्यो तुला नमस्कार असो.

बिनीस मारुती नि सूर्यपुत्र रीसराज तो  (रीस- अस्वल)
दले लढाउ अंगदासवे अनेक, व्यूह तो ।
हरावयास दैत्य ताप नीर सागरी जसे
यमा, असूर नाशका, प्रणाम हा तुला असे ॥०२॥


कलेवरे कषायवासहस्तकार्मुकं हरे:
उपासनोपसंगमार्थधृग्विशाखमंडलम् ।
हृदि स्मरन् दशाकृते: कुचक्रचौर्यपातकम्
विदार्यते प्रचण्डतांडवाकृतिः स राघवः ॥३॥

मराठी- अंगावर भगव्या रंगाचा अंगरखा घातलेला, हाती धनुष्य घेतलेला, (सीतेसह) मीलनाच्या इच्छेने निर्भयतापूर्वक पाय फाकवून (रोवून) तिरंदाजीच्या पावित्र्यात उभा, मनात रावणाच्या फसवेगिरीने केलेल्या चोरीचे पातक आठवत प्रचंड तुफानाच्या स्वरूपाचा तो श्रीराम (राक्षसांचा) नाश करतो.

तनूस काव वर्ण वस्त्र, धारिले धनू करी
उपासनाच मीलनार्थ पाय रोवुनी करी ।
अघोर, नाटकी दशानन प्रमाद आठवी
तुफान रूप राम सर्व दैत्यसंघ नाशवी ॥०३॥


प्रकाण्डकाण्डकाण्डकर्मदेहछिद्रकारणम्
कुकूटकूटकूटकौणपात्मजाभिमर्दनम् ।
तथागुणंगुणंगुणंगुणंगुणेन दर्शयन्
कृपीटकेशलंघ्यमीशमेक राघवं भजे ॥४॥

मराठी- अत्यंत उत्कृष्ट अशा बाणांनी, वाईट कृत्ये करणार्‍यांच्या शरीराची चाळण करणार्‍या, आत्यंतिक खोटेपणा व फसवणूक करण्यासाठी खुबी वापरणार्‍या राक्षसकुलोत्पन्नाचा नाश करणार्‍या, तसेच (आपला) पराक्रम, सत्व, स्वभाववैशिष्ट्य, कसब धनुष्याच्या दोरी (च्या माध्यमातून) दाखवून देणार्‍या, आणि महासागर (पूल बांधून) पार करणार्‍या एकमेव रामचंद्राला मी भजतो.

शरें सुतीक्ष्ण दुष्ट कृत्य देह छिन्न जो करी
लबाड ढोंग धूर्त फार राक्षसास संहरी ।
विशेष तेज सत्त्व चाप-कौशलास दाखवी
करी समुद्र पार एक राम त्यास मी स्तवी ॥०४॥


सवानरान्वितः तथाप्लुतम् शरीरमसृजा
विरोधिमेदसाग्रमांसगुल्मकालखंडनैः ।
महासिपाशशक्तिदण्डधारकै: निशाचरै:
परिप्लुतं कृतं शवैश्च येन भूमिमंडलम् ॥५॥

मराठी- ज्याच्या सवे वानर सैन्य आहे, तसेच ज्याचे शरीर शत्रूच्या रक्ताने नाहून निघाले आहे (त्या श्रीरामाने), ज्यांच्याकडे धारदार तलवारी, दोरीचे फास, भाले, (लाकडी) दण्ड आहेत अशा रात्रींचरांच्या शरीरांचे चरबी, मांस, आंतडी यांचे तुकडे व कलेवरे यांनी धरित्री झाकून टाकली आहे……

कपी दला सवे, जया रिपू रुधीर रंगवी
कृपाण, दण्ड, फांस, शूळही करी, अमानवी।   (कृपाण- लहान तलवार, शूळ- भाला)
वपा, रुधीर, मांस, आंत, राक्षसी कलेवरे
इथे तिथे नळे पडून सर्व झाकिती धरे ॥०५॥


विशालदंष्ट्रकुम्भकर्णमेघरावकारकै:
तथाहिरावणाद्यकम्पनातिकायजित्वरै: ।
सुरक्षिताम् मनोरमाम् सुवर्णलंकनागरीम्
निजास्त्रसंकुलैरभेद्यकोटमर्दनम् कृतः ॥६॥

मराठी- कराल दाढा असणारा कुंभकर्ण, मेघनाद तसेच अहिरावण इत्यादी अविचल अवाढव्य शरीराच्या दृढ विजयी वीरांनी जिचे रक्षण केले आहे अशा मनाला भुरळ पाडणार्‍या सोन्याच्या लंका नगरीच्या अभेद्य तटबंदीला आपल्या अस्त्रांच्या वर्षावाने उद्ध्वस्त केले…….

कराल दाढ कुंभकर्ण, इंद्रजीत, कैकसी
सुतें, बलाढ्य भव्य वीर रक्षिती जिला अशी।
सुवर्ण भूमि राखण्या अभेद्य कोट बांधिला
अमोघ अस्त्र वृष्टिने जयें समूळ तोडिला ॥०६॥

टीप- कृत्तिवास रामायणानुसार विश्रवा ऋषि आणि कैकसीचा पुत्र अहिरावण हा पाताळ देशाचा अधिपती व रावणाचा भाऊ होता. त्याला महिरावण नावाचा एक भाऊही होता.


प्रबुद्धबुद्धयोगिभिः महर्षिसिद्धचारणै:
विदेहजाप्रियः सदानुतो स्तुतो च स्वस्तिभिः ।
पुलस्त्यनंदनात्मजस्य मुण्डरुण्डछेदनम्
सुरारियूथभेदनं विलोकयामि साम्प्रतम् ॥७॥

मराठी- प्रगल्भ, बुद्धिमान अशा श्रेष्ठ ऋषी मुनींनी तसेच स्वर्गीय गायकांनी आनंदाने ज्याची सदैव प्रशंसा केली जाते व स्तुती गीते गायली जातात असा सीतेचा पती आता पुलस्त्याच्या नातवाचा शिरच्छेद आणि देवांच्या शत्रूच्या सैन्याचा घोर संहार करतांना मी पहात आहे.

मुनी महान बुद्धिमान दिव्य भाट गायने
प्रशंसती सदा सियापतीस शुद्ध भावने।
दशाननास राम आज कंठस्नान घालतो
रिपू दले करीत नष्ट, मी, क्षणास पाहतो ॥०७॥


करालकालरूपिणं महोग्रचापधारिणम्
कुमोहग्रस्तमर्कटाच्छभल्लत्राणकारणम् ।
विभीषणादिभिः सदाभिषेणनेऽभिचिन्तकम्
भजामि जित्वरम् तथोर्मिलापते: प्रियाग्रजम् ॥८॥

मराठी- ज्याचे (आत्ताचे) रूप भयाण मृत्युसमान दिसत आहे, ज्याच्या हातात अत्यंत उग्र धनुष्य आहे, जो वाईट अज्ञानाने पछाडलेल्या वानर आणि अस्वलां (जातीच्या जनां) च्या रक्षणाचे कारण आहे, विभीषण वगैरेंबरोबर शत्रू सैन्यावर मात करण्यासाठी नित्य विचारविनिमय करणार्‍या उर्मिलेच्या पतीच्या आवडत्या थोरल्या भावाला (श्रीरामाला) मी भजतो.

करी कमान, उग्र मृत्यु रूप जे भयाणसे
अजाण रीस वानरांस रक्षणार्थ जो असे।    (रीस- अस्वल)
विभीषणासवे विचार नित्य मात द्यावया
रिपूस, उर्मिला दिरास वंदितो सदा तया ॥०८॥


इतस्ततः मुहुर्मुहु: परिभ्रमन्ति कौन्तिकाः
अनुप्लवप्रवाहप्रासिकाश्च वैजयंतिका:।
मृधे प्रभाकरस्य वंशकीर्तिनोऽपदानतां
अभिक्रमेण राघवस्य तांडवाकृते: गताः ॥९॥

मराठी- वारंवार इकडे तिकडे पळापळ करणारे इटेकरी, त्यांच्या सहकार्‍यांच्या (तलवार बहाद्दर इ.) तुकड्या आणि झेंडाधारी यांची रणात सूर्यकुलोत्पन्न श्रीरामाच्या उग्र आकृतीने केलेल्या हल्ल्यात दाणादाण झाली.

इटेकरी नि सोबती निशाण धारकासवे  (इटा- भाला)
इथेतिथे पुन्हापुन्हा रणात धावती थवे ।
रवीकुलीन राम उग्र ग्रासुनी रिपूदलें
विनाश धूळधाण होत सर्व दूर पांगले ॥०९॥


निराकृतिं निरामयं तथादिसृष्टिकारणम्
महोज्ज्वलं अजं विभुं पुराणपूरुषं हरिम् ।
निरंकुशं निजात्मभक्तजन्ममृत्युनाशकम्
अधर्ममार्गघातकम् कपीशव्यूहनायकम् ॥१०॥

मराठी- जो निराकार आहे, विशुद्ध आहे, तसेच ही सृष्टी अस्तित्वात येण्याचे मूळ कारण आहे, अतीव तेजस्वी आहे, अनादी प्राचीन व सार्वभौम आहे, ज्याच्यावर कोणाचा ताबा नाही, आपल्या भक्तांच्या जन्म मृत्यूचा नाश करणारा आहे, अयोग्य मार्गाचा नाश करतो, जो वानर सेनेच्या सेनापतींसवे सैन्याच्या रचनेचा प्रमुख आहे ………

न आकृती जया, विशुद्ध, आद्य सृष्टिकारणा
सनातना, अनादि, भक्त जन्म मृत्यु नाशना ।
अतीव तेज, सार्वभौम, योग्य मार्ग दर्शना
प्लवंगमुख्य संगती रचे सुसज्ज योजना ॥१०॥ (प्लवंग- वानर)


करालपालिचक्रशूलतीक्ष्णभिंदिपालकै:
कुठारसर्वलासिधेनुकेलिशल्यमुद्गरै: ।
सुपुष्करेण पुष्करांच पुष्करास्त्रमारणै:
सदाप्लुतं निशाचरै: सुपुष्करंच पुष्करम् ॥११॥

मराठी- भीतिदायक गोल चक्रे,भाले,तीक्ष्ण बर्च्या,कुर्‍हाडी,बाण,खड्ग, टोकदार मुद्गल, धनुष्य व प्रत्यंचेने सोडलेली पर्जन्यास्त्रे यांच्या मार्‍याने मारल्या गेलेल्या राक्षसांची कलेवरे यांनी आकाश आणि सागर ओसंडून गेले आहेत.

भयाण चाक, तीक्ष्ण शूल, टोकदार मुद्गला
सवे कुर्‍हाड, खड्ग चाप बाण त्यास जोडिला ।
रणात सोडुनी जलास्त्र मार शत्रुला दिला
कलेवरे नभी, जलात साचलीत आजला ॥११॥


प्रपन्नभक्तरक्षकम् वसुन्धरात्मजाप्रियम्
कपीशवृंदसेवितं समस्तदूषणापहम् ।
सुरासुराभिवंदितं निशाचरान्तकम् विभुं
जगद्प्रशस्तिकारणम् भजेह राममीश्वरम् ॥१२॥

मराठी- आपल्याला शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणार्‍या, भूमिकन्येला प्रिय असणार्‍या, वानरांचे मुख्य ज्याची सेवा करतात, जो सर्व दुर्गुणांचा नाश करतो, देव व दानवही ज्याला नमस्कार करतात, राक्षसांचा विनाश करणार्‍या, सार्‍या जगताचे जो भरण व रक्षण करतो अशा सार्वभौम राजा श्रीरामाला मी भजतो.

धरासुतेस आवडे, जगास सर्व राखितो
उपासकांस पाळतो नि दुर्गुणांस नाशितो
प्लवंगमुख्य, देव, दैत्य सर्व ज्यास वंदिती
जगात सार्वभौम तू प्रणाम घे रघूपती ॥ १२     

इति श्रीराघवेंद्रचरिते इन्द्रादि देवगणै: कृतं श्रीरामतांडव स्तोत्रम् सम्पूर्णम् ।।

— धनंजय बोरकर.

(९८३३०७७०९१)

 

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह

  1. फारच छान भाषांतर.
    बोरकर सरांचे अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..