नवीन लेखन...

रम्य ते बालपण : चंद्रशेखर ओक

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये चंद्रशेखर ओक यांनी लिहिलेला हा लेख


‘लहानपण देगा देवा, मुंगीसाखरेचा रवा’ संत तुकाराम महाराजांनी किती यथार्थपणे म्हटले आहे. खरंच बालपण किती रम्य असतं याची जाणीव आपणास काळाच्या ओघात जात असताना पदोपदी होत असते.

माझा जन्म दि. १५ सप्टेंबर १९५७ रोजी गिरगाव, मुंबई येथे झाला. तेव्हा गिरगावातील प्रसिद्ध डॉ. गोडबोले यांच्याकडे पोटभाडेकरू म्हणून दहा बाय दहाच्या खोलीत माझे आई-वडिल व माझ्याहून ज्येष्ठ तीन भगिनी व मी असा संसार माझ्या वडिलांनी थाटला होता. माझे वडील हे तेव्हा केंद्र शासनाच्या सेवेत कार्यरत होते. माझ्या लहानपणाची आठवण जी मला आठवते ती साधारणपणे १९५९ मधील म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षातील असावी. तोपर्यंत माझ्या वडिलांना वडाळा, मुंबई येथील केंद्र शासनाच्या मालकीच्या युद्धकालीन बरॅकमधील एक घर शासकीय निवासस्थान म्हणून वाटप झाले. त्यावेळची एक आठवण म्हणजे मला एक डबलसीटवाली तिचाकी सायकल घेऊन देण्यात आली होती. बरॅक असल्यामुळे साधारणपणे रेल्वे गाडीच्या डब्याप्रमाणे खोल्यांची रचना होती. मी त्या सायकलवर बसून संपूर्ण घरभर फिरत असे व जोडीला एक मांजराचे पिल्लू असे. त्याला मागच्या सीटवर जबरदस्तीने बसवायचो. परत ते वारंवार मध्येच उडी मारून पलायन करायचे. माझा लहानपणीचा मित्र मुकुल दिवेकर याच्या इमारतीच्या आवारात सायकल चालविताना सायकलीचे दोन तुकडे होऊन हॅण्डलमध्ये खाच पडल्याचे मला आठवते. त्याची खूण माझ्या कपाळावर आजही आहे.

त्यावेळी आमच्याकडे रेडिओ नव्हता. शेजारी कोणी पंजाबी कुटुंब राहत असे. त्यांच्या रेडिओवरील गाणी अधूनमधून ऐकायला यायची. माझ्या बहिणी माझ्यापेक्षा वयाने आठ ते पंधरा वर्षांनी मोठ्या होत्या. त्यावेळी रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमालातील गाणी ऐकायला त्या उत्सुक असायच्या व कान देऊन ऐकायच्या.

मला आठवते वयाच्या साधारण तिसऱ्या वर्षी मी माझ्या मामाच्या घरी कल्याण येथे गेलो होतो व ‘चौदहवी चाँद’ हा सिनेमा मामा-मामीसोबत पाहिला व त्यानंतर रात्रीच मला घरी जावयाचे आहे असा हट्ट त्यांच्याकडे केला होता. वडाळ्यातील वास्तव्यास असताना मी आझादनगर वडाळा येथील एका बालवाडीत होतो. त्यावेळच्या आमच्या वर्गशिक्षिका श्रीमती प्रभूदेसाईबाई मला आठवतात. अतिशय प्रेमळ व प्रसन्न व्यक्तिमत्त्व.

तद्नंतर १९६४ मध्ये मी किंग्ज जॉर्ज हायस्कूल, हिंदू कॉलनी, दादर येथे पहिलीत प्रवेश घेतला. त्यावेळेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक कै. पाटकर गुरुजी अजूनही माझ्या स्मरणात आहेत. इयत्ता चौथीत असताना माथेरान येथे सर्व वर्गाची गेलेली सहल, तेथील माकडे, दिवाडकरांचा बटाटावडा आजही माझ्या स्मरणात आहे. दरम्यान १९६५ च्या सुमारास आम्हाला पारसी कॉलनी, दादर येथील एका खाजगी इमारतीत शासन अधिग्रहीत केलेल्या सदनिका शासकीय निवासस्थान म्हणून वाटप करण्यात आले. अत्यंत स्वच्छ, हिरवागार आणि शांत परिसर. मला आठवते १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान यामधील पहिले युद्ध सुरू झाले.त्यावेळी शत्रू राष्ट्राच्या विमानांना कळू नये म्हणून ब्लॅक आऊट करावालागे. त्याकरिता सर्व तावदानांना काळे कागद मी लावल्याचे स्मरते. हवाई हल्ल्याची पूर्वसूचना व सर्व आलबेल आहे हे कळण्याकरिता दोन प्रकारच्या भोंग्यांनी पूर्वसूचना देण्यात यावयाची. त्यावेळेला पारसी कॉलनीतील रस्त्यांवरील दिवे गॅसचे होते व सायंकाळी ते काठीच्या साहाय्याने प्रज्वलित करण्यात यावयाचे. त्यावेळी रस्ते पाण्याने धुतले जावयाचे हे आता कोणालाही सांगून पटणार नाही.

१९६५ ते १९७०-७१ मधील पारसी कॉलनीतील वास्तव्यात माझे मित्र सर्व स्तरातील होते. त्यात मोलकरीण, नोकर, माळी यांची मुलेही होती. त्यांच्यासमवेत खेळावयाचे खेळ म्हणजे डबा ऐसपैस, आबादूबी, विटीदांडू, गोट्या, भोवरे, काठी उडवी, क्रिकेट, लंगडी इत्यादी. त्याशिवाय दादर टी.टी.ला (आताचे खोदादाद सर्कल) जावून रस्त्यावरील रिकामी सिगरेटची पाकिटे गोळा करणे व त्यांनी इमारत, पूल इत्यादी घरी बनविणे.

या सर्व गोष्टी स्मरणात आहेत. होळीकरिता कॉलनीतून फिरून झावळ्या, टोपल्या व लाकडे गोळा करणे व पारसी कॉलनीतील सर्वात मोठी होळी करणे, पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साठल्यानंतर त्यात हुंदडणे, सार्वजनिक गणेशोत्सवात स्थानिक कलाकार म्हणून बुलबुलतरंग वाजविणे, आषाढी एकादशील वडाळ्याच्या जत्रेत दिवसभर भटकणे अशा अनेक आठवणी स्मरणात आहेत. दिवाळीत किल्ले उभारण्याचा आनंद अतिशय प्रेरणादायी होता. पारसी कॉलनीत असताना ५ पैशात ट्रामने दादर टी.टी. ते लालबाग प्रवास केल्याचे आजही आठवते.

सन १९७१ मध्ये पुन्हा आम्हाला शासन निर्णयानुसार वडाळ्याला शासकीय वसाहतीत राहण्यास यावे लागले. तोपर्यंत मी इयत्ता आठवीत गेलो होतो. वडाळ्याला दरम्यान पूर्वीच्या बरॅक पाडून नवीन इमारती बांधण्यात आल्या होत्या. शासकीय वसाहतीत आल्यानंतर भरपूर नवीन मित्र मिळाले. वयानुरुप खेळाच्या प्रकारातही बदल झाले. क्रिकेट, सायकल, कॅरम पारसी कॉलनी, फाईव्ह गार्डनचा फेरफटका मारणे, सायकलवर एका वेळी तीन मुलांना घेऊन कसरती करणे, इमारतीच्या गच्चीवरून पतंग उडविणे, कॉलनीतील सुमारे १०० फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर, सर्वांची नजर चुकवून कोणत्याही बांध नसलेल्या शिडीच्या साहाय्याने चढणे व एव्हरेस्टवर चढाई केल्याचे समाधान बाळगणे इत्यादी गोष्टी आजही मन प्रफुल्लित करतात. सन १९७२ मध्ये मुंबईत दूरदर्शनने पदार्पण केल्यानंतर त्यावेळी केवळ मोजक्याच घरात त्याचा शिरकाव झाला. त्यातील एक भाग्यवान आम्ही. त्यावेळी प्रत्येक रविवारच्या सिनेमा प्रसारणाच्या वेळेस आमचे घर थिएटर झालेले असावयाचे व क्रिकेट मॅचच्या वेळेस स्टेडियम. त्यावेळचे टी.व्ही. ब्लॅक अॅण्ड व्हाईटचे असल्यामुळे तापावयाचे व ऊबेकरिता घरचे मांजर त्यावर वामकुक्षी काढावयाचे. मध्येच त्याची शेपटी टी.व्ही.च्या स्क्रीनवर यावयाची. अशा अनेक गमतीजमतीदार आठवणी स्मरणात आहेत. मला आठवते अभ्यासाचे असे कोणतेही टेन्शन, तणाव त्यावेळी नसायचा.

बघता बघता जून १९७४ उजाडले व मार्च १९७४ मध्येच मी एस.एस.सी. परीक्षा दिली व जाणवायला सुरुवात झाली की आपले लहानपण आता सरले असून, जीवनातील आव्हानात्मक काळाची सुरुवात झालेली आहे. बालपणातील रम्य अशा आठवणींच्या शिदोरीवर आपला जीवनप्रवास सुरू ठेवायचा आहे.

-चंद्रशेखर ओक

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..