नवीन लेखन...

रम्य ते बालपण : मुरलीधर नाले

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये मुरलीधर नाले  यांनी लिहिलेला हा लेख


बालपणीच्या काही आठवणी सुप्त मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात आणि या स्मृती वाढत्या वयात कधीतरी तळातून उमलणाऱ्या कळीसारख्या हळुवारपणे उमलतात. बालमन जसं निरागस तसंच त्या आठवणीदेखील. जळगाव जिल्ह्यातील एका ५००० लोकवस्तीच्या गावातून मी आलेला. कुटुंबाचा परीघ मोठा. घर लहान परंतु परस्परांमधील नातं अतिशय जिव्हाळ्याचं. बालपणी गावी असलेल्या शेतकी शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यामुळे प्रत्येक वर्गाला १० बाय १० फुटांचा वाफा दिलेला असायचा. त्यात पेरणी ते तोडणीपर्यंतचे सर्व सोपस्कार त्या वर्गातील मुलांनी करावयाचे असत. दररोज वाफ्यात पाणी सोडणे, वाफ्यातील तण काढणे हे देखील त्यात अंतर्भूत होतं. वाफ्यात कधी पालक तर कधी मेथीचे बी टाकून पूर्ण वाढीनंतर त्या भाज्या काढल्या जात. खानदेशाची वांगी प्रसिद्ध आहेत. कधी कधी वांग्याचे बी पेरून ती झाडे वाढविली जात. ज्यावेळी कोवळी वांगी त्या झाडांना लागतात त्यावेळी त्यांची चमक छानच असे आणि त्यात बियाही कमी असत. कधीतरी आम्हाला इच्छा होत असे की, कमीत कमी बिया असलेली कोवळी वांगी खायची. मग वाफ्यात हळूच एखादं वांगं तोडून ते खायचो. देठ व साली तेथेच वाफ्यात जमिनीत पुरून टाकायचो.

खेडेगावात शहरातील खेळ नसत. त्यामुळे समवयस्क मित्रांबरोबर हुतूतू, लंगडीसारखे खेळ खेळत असू. अर्थात एका टीमचा मी कप्तान तर दुसऱ्या टीमचा माझा धाकटा भाऊ प्रभाकर. शनिवारी व रविवारी साधारणत: संध्याकाळी हे खेळ रंगत. कधीकधी चिंध्यांपासून बनविलेल्या चेंडूने आबाधोबीचा खेळ रंगत असे. रविवारी सकाळी कधीकधी लगोऱ्याच्या खेळात आम्ही रमलेले असू. तर कधीकधी चिंध्यांच्या चेंडूने बॅटबॉलचे सामने रंगत. उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुटीत विटीदांडूचा खेळ चालायचा. गावाच्या बाहेर त्यासाठी जावे लागत असे. आताच्या सारखे त्यावेळी रस्ते नसल्यामुळे धुळीचे साम्राज्य असायचे. उन्हात ती धूळ खूप तापत असे आणि आमच्या पायात चपला नसायच्या. त्यामुळे पाय छान भाजले जात. खेळत असताना जेवायचे भान राहायचे नाही. घरून बोलावणे आल्यावर डाव संपल्यावर येतो असे सांगून उशिरानेच घरी जात होतो.

आमच्या गावातील दुसरी एक पद्धत होती. श्राद्ध पक्षात आजूबाजूच्या घरातून जेवणाचे आमंत्रण असायचे. त्या पंधरा दिवसात गोडधोड वडे, भजी खायला मिळायचे. त्यामुळे आम्ही त्या पंधरवड्याची सारखी वाट बघत असू. त्यानंतर दुसरा आनंदाचा क्षण म्हणजे नातेवाईकांकडचे अथवा शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरचे लग्न कार्य. चांगले जेवण, उंडारायला कुणीच हरकत घेऊ शकत नसत.

शाळेतील त्यावेळच्या काही आठवणी मात्र अजूनही ताज्यातवान्या आहेत. मग चौथीचे आमचे शिक्षक शांतारामगुरुजी आठवतात. भरपूर ऊंचेपुरे, टपोरे डोळे, शेलाट्या बांध्याचे, स्वच्छ पांढरेशुभ्र धोतर, सदरा व डोक्यात काळी टोपी. ते शिस्तप्रिय शिक्षक होते. परंतु शाळेत कठोर वाटणारे गुरुजी बाहेर आल्यावर मात्र लोण्याहून मऊ अशा भाषेत बोलत असत. आपल्या विद्यार्थ्यांच्या आई/ वडिलांच्या प्रकृतीची चौकशी करणे, सुख दुःखाच्या प्रसंगी भेट देणे ही त्यांच्या वागण्यातील खासियत होती. कवितांचे पाठांतर व्हावे म्हणून ते प्रत्येकाला कविता म्हणायला सांगत. एक आमचा सहाध्यायी आमच्या वर्गात दोन वर्षे मुक्कामी होता. तो उठला व म्हणू लागला, ‘नर्मदेचे गोटे आम्ही नर्मदेचे…’ मास्तर म्हणाले, ‘खरंच आहे हे. आपण नर्मदेचे गोटेच आहात.’ असेच एकदा त्यांच्याकडे आम्ही ५ मुले शिकवणीला जात असू. गावातील एका धनाढ्य व्यक्तीचा मुलगा देखील आमच्याबरोबर असायचा. सकाळी सहा वाजता शिकवणी चालू व्हायची. मास्तरांनी त्या मुलाला प्रश्न विचारला, “मोराचे स्त्रीलिंगी रूप सांगा.” त्याने क्षणभर विचार केला व उत्तर दिले, ‘रोमी’. त्या गोऱ्या गालावर मास्तरांची पाचही बोटे लगेच उमटली. त्याला शिकवणी संपल्यावर त्या उत्तराबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले मोरच्या विरुद्ध असेल त्याचे स्त्रीलिंग रूप. म्हणून मोरचे स्त्रीलिंगी ‘मोरी’पण हे काही ऐकून नाही म्हणून मी ‘रोमी’ उत्तर दिले.

शाळेतील आमचा युनिफॉर्म म्हणजे खाकी हाफ पँट व हाफ शर्ट. एकच ड्रेस असायचा. सहा दिवस तोच घालायचा. रविवारी धुतल्यावर आमची ताई पाण्याची लोटी त्याच्यावरून फिरवायची म्हणजे आमचा ड्रेस झाला इस्त्रीचा.

आमची शाळा शेतकी शाळा असल्यामुळे शाळेच्या आवारात भरपूर झाडी होती. त्यातही बुचाची उंच उंच झाडेही होती. त्याच्या फुलांचा सडा शाळेच्या आवारात पडलेला असायचा. त्याचा सुवास छान असायचा म्हणून शाळेत प्रवेश करतानाच आम्ही पसाभर फुले गोळा करीत असू आणि वर्गात मास्तरांचे लक्ष नसले म्हणजे त्याचा सुवास घेत असू. आमच्या शाळेत तीन वर्षे मुक्काम ठोकलेला एक मुलगा एका दिवशी केळी विकणाऱ्या फकिराबद्दल आम्हाला सांगू लागल, तो फकीर पाकिस्तानी आहे. केळ्यांमध्ये विष कालवलेले असते. म्हणून तो इतरांपेक्षा स्वस्त भावाने त्याची केळी विकतो. स्वातंत्र्य मिळून दोनतीन वर्षे झालेले होते. हिंदू-मुसलमानांच्या दंगलीची झळ आमच्याकडे लागलेली नव्हती परंतु आमच्या बालमनावर मुसलमान वाईट आहेत असा शिक्का मात्र उमटलेला होता. आता ही गोष्ट आठवल्यावर हसू मात्र आवरत नाही.

सातवीची परीक्षा झाली. त्यावेळी सातवीला व्हर्नाक्युलर फायनल म्हणायचे. ती पास झाल्यावर आमच्याच गावात १९१७ साली सुरू झालेल्या हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात प्रवेश घेतला. माझे मोठे बंधूदेखील माझ्याच वर्गात होते. त्यामुळे आम्ही दोघांना पुस्तकांचा एकच सेट असायचा. आमच्या बरोबरीच्या विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके निम्म्या किंमतीत घेतलेली असत. परंतु वडील आम्हाला नेहमी नवीन पुस्तके घेऊन येत. वर्षभरासाठी लागणाऱ्या वह्या देखील त्याच वेळी आणलेल्या असत. पुस्तकांना कव्हर घालण्याचे काम देखील वडीलच करायचे. हायस्कूलमध्ये शिकायला लागल्यावर मनात कुठेतरी भावना वाटत होती की, आपण उच्चशिक्षण घेत आहोत. हायस्कूलमधील ती चार म्हणजे आठवी ते अकरावी वर्गातील वर्षे खूप आनंदात गेली. तिथल्या आठवणी या खऱ्या अर्थाने सुखदच आहेत. इंग्रजी व इतिहास शिकविणारे श्री. एच. आय. पाटील सर इंग्रजीसारखा आम्हाला सुरुवातीला कठीण वाटणारा विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकवित. इतिहासाबाबत तर त्यांची विशेष ख्याती होती. आपल्या टपोऱ्या डोळ्यांच्या नजरेने नाट्यमयरित्या ते अफजलखानाचा वध असो की शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग असो की शिवाजी महाराजांची पेटाऱ्यात बसून औरंगजेबाच्या कचाट्यातून झालेली सुटका असो खुलवून सांगत असत. सर्व वर्गात कमालीची शांतता पसरलेली असे. मुले एकदम त्या त्या प्रसंगांशी एकरूप होऊन जात. पण त्यामुळे तो विषय विद्यार्थ्यांमध्ये आवडता झाला होता व त्या विषयात कुणीही नापास होत नसत. सायन्स विषय शिकवायला श्री. पी. डी. महाजन सर होते. उंचपुरे, गौरवर्णीय सर कपड्यांचे शौकीन. त्यांच्या अंगावर नेहमी मुंबई-पुण्याच्या नवीन फॅशनचे कपडे असत. सायन्स शिकविण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. तर गणितसारखा विषय आम्हाला श्री. जी. एस. पाटील शिकवित. ते बी.एससी., एम.एड्. होते. उंचेपुरे, गौरवर्णाचे स्वच्छ मर्सराईज्ड धोतर, पांढराशुभ्र शर्ट व डोक्यावर काळी टोपी, जेवणानंतर पान खाल्ल्यामुळे लालबुंद ओठ. अतिशय सोप्या पद्धतीने ते विषय शिकवीत. परंतु तरी देखील वर्गातील काही महाभाग त्या विषयात नापास होत. तिमाही परीक्षा वर्गात होत असे. प्रश्नपत्रिका फळ्यावर लिहिलेली असायची. विद्यार्थ्यांनी तो ५० मार्कांचा पेपर आपल्या जागेवर बसून सोडवावयाचा असे. मी उंचीने लहान असल्यामुळे पहिल्या बाकावर बसत असे. माझ्या मागे एक मित्र बसत असे. त्याने त्यादिवशी मला तिरपे बसायला सांगितले व माझा गणिताचा पेपर जसाच्या तसा त्याच्या उत्तरपत्रिकेत उतरविला. पेपर तपासून झाल्यावर सरांनी वर्गात पेपर दिले. वैशिष्ट्य म्हणजे मला त्या पेपरात पैकीच्या पैकी मार्क मिळाले होतेच परंतु माझ्या मागच्या बाकावरील सर्वांना पैकीच्या पैकी मार्कस् मिळाले होते. त्यांनी माझ्यामागे बसलेल्या मित्राला बोलावले व पेपरातील एक गणित सोडवायला सांगितले. तो गडबडला. त्याला कबूल करावे लागले की त्याने कॉपीतर केलीच पण त्या रांगेतील सर्वांनी कॉपी केलेली आहे.

एक विद्यार्थी इंग्रजी विषयात गती नसलेला होता. त्याने तिमाहीच्या परीक्षेत फळ्यावर इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका उत्तर म्हणून त्याच्या पेपरात लिहून काढली.

दहावी व अकरावीच्या वर्गात माझा नेहमी दुसरा नंबर असायचा म्हणून शिक्षकदिनाच्या दिवशी दहावीच्या व अकरावीच्या वर्गात शिकत असताना शिक्षक म्हणून काम करण्याची संधी शाळेने दिली. त्या दोन्ही वेळी कृतकृत्य झाल्याची भावना मात्र ओसंडून वाहत होती. अकरावीच्या परीक्षेला जाण्यापूर्वी हायस्कूलने दिलेला निरोप समारंभ मात्र कायम स्मरणात राहिला. सर्व विद्यार्थी व काही तशिक्षक आपल्या ओलेत्या डोळ्यांनीच घरी गेले.

भविष्यात मंत्रालयात काम करू लागलो. उच्चपद भूषविताना आलेल्या सुखाच्या लडीबरोबरच त्या खुर्व्यांना बोचणारे काटे किती भयंकर होते. तसेच गोरेगावच्या फिल्मसिटीत महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी प्राप्त झाली. खेडेगावातून आलेल्या माझ्यासारख्याला सिनेमाचमुळी शहरात आल्यावर बघायला मिळाला. मग त्यावेळी तर या फिल्मसिटीत कामाला होतो. त्यामुळे हिंदी व मराठीतील प्रसिद्ध नट, नट्या शूटिंगला येत व मला फिल्मसिटीत राऊंड घेत असताना त्यांचे जवळून दर्शन होत होते. त्यावेळी मोबाईलची सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे काही नट/नट्या माझ्या केबीनमध्ये येऊन फोन करीत असत. इतरांना माझ्या या पदाचा त्यामुळे हेवा वाटत असे. परंतु तिथले प्रश्न सोडविताना व कामगारांच्या अडचणींवर मार्ग काढताना होणारी जीवाची घालमेल ही फक्त मलाच माहीत होती.

आता सांगा मोठमोठी पदे भुषविताना मिळणारा मान, सर्वसामान्यांच्या दृष्टीने लाल दिव्याच्या गाडीतून केलेला प्रवास, यासारख्या कितीही बाबी सुखवत गेल्या तरी बालपणीचे ते निरागस मित्र, त्यात नव्हती कसली स्पर्धा ना कसला एकमेकांबद्दल आकस. त्या काळातील मित्रांचे मिळालेले निर्व्याज प्रेम याला कसलीच सर येणार नाही आणि म्हणूनच आठवत राहाव्याशा वाटतात त्या बालपणीच्या रम्य गोड गोड आठवणी…

–मुरलीधर नाले
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..