अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये यजुवेंद्र महाजन यांनी लिहिलेला हा लेख
अंगभूत गुणांना सुयोग्य प्रशिक्षण संस्काराची जाळी चढल्यानंतर पुण्या-मुंबईसारख्या शहरातून उत्तम वैयक्तिक भवितव्य घडवण्याची संधी असलेले यजुवेंद्र महाजन आपल्या जिल्ह्यात परतले सनदी व प्रशासकीय सेवेत ग्रामीण भागातून सुसंस्कारित विद्यार्थी गेले पाहिजेत आणि त्या आधारावर या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा सर्वार्थाने चांगली माणसे पोहोचावीत त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्तेसाठी सर्व बाजूंनी सर्व घटकांसाठी प्रयत्न व्हावेत यासाठी ‘दीपस्तंभ’ ची स्थापना केली. दिव्यांग, आदिवासी, अनाथ, गरीब, होतकरू १८ वर्षांवरील युवक-युवतींसाठी विनामूल्य निवासी स्पर्धा-परीक्षा प्रशिक्षणाची सुरुवात केली.
पुण्या-मुंबईच्या तुलनेत मागास समजल्या जाणाऱ्या जळगाव परिसरातून पुढे येणाऱ्या तरुणांसाठी ‘दीपस्तंभ’ चे काम करण्याचे ठरवले. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव असल्याने विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडविण्यात स्वत:चे योगदान द्यायचे आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील, बाबा आमटे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे आपण पाईक आहोत. आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन मिळाले पाहिजे तसेच आर्थिक अडचणींमुळे तो विद्यार्थी आपल्याकडे येऊ शकला नाही असे होऊ नये यासाठी मी जागृत. आठ वर्षात एकही विद्यार्थी पैसे नसल्यामुळे आपल्याकडे येऊन परत गेला आहे असे झालेले नाही असे मी विश्वासाने सांगू शकतो. ‘दीपस्तंभ’ असे जन्मदाते ठरलेले यजुवेंद्र महाजन यांचा जीवन परिचय.
पुणे जिल्ह्यातील इंग्रजीच्या दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेतल्यानंतर मी स्पेशलायझेशन म्हणून ‘लिग्विस्टिक्स अॅण्ड स्टायलिस्टिक्स विषयाची निवड केली होती. पदवीसाठी घेतलेल्या फंक्शनल इंग्लिशचे प्रगत रूप. पण या विषयाचे प्राध्यापक विद्यापीठात उपलब्ध नव्हते. विद्यापीठाने मला सांगितले, दुसरा कोणताही विषय निवड, पण मला याच विषयात काम करायचे होते. विद्यापीठाची ही बाजू खरी होती. अत्यंत अवघड विषयाला विद्यार्थी प्रवेश घेत नसत. म्हणून विद्यापीठानेही तो विषय फक्त यादीपुरताच ठेवला होता. मी ऐकतच नाही, म्हटल्यावर मला या विषयासाठी २५ विद्यार्थी मिळव असे सांगितले. मी पंधरा दिवसात २५ जणांना तयार केले. एवढे सारे घडल्यानंतर मात्र विद्यापीठाला माझे म्हणणे ऐकणे भाग पडले. तो विषय विद्यापीठात पुन्हा सुरू झाला. विविध ठिकाणचे चार प्रोफेसर्स विद्यापीठाने आमंत्रित केले आणि या विषयाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास पार पडला.
माझा जन्म जळगावचा. मात्र माझे सारे बालपण आणि शालेय शिक्षण जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणी झाले. माझे वडील पेशाने डॉक्टर होते. तरी गावात नर्सरी, पोल्ट्री, फिशरी, गाई-म्हशींचा गोठा व्यावसायिक उपक्रम त्यांनी चालवून पाहिले. बालपणीचा काळ विविध अनुभवांनी समृद्ध ठरला. माझे वडील मला नेहमी भरपूर कामे सांगत. त्यावरून मी आईशी भांडत असे, पण आता लक्षात येते तेव्हा बाबांनी ती कामे करायला लावली ती माझ्या भल्यासाठीच होती. ते सारे अनुभव मला येत गेले आणि माझा सामाजिक परीघ वाढला. सातवी-आठवीत असताना आमच्या वर्गातील चिकू टोपलीत डोक्यावर घेऊन मी बाजारात विकायला जात होतो. डॉक्टरांचा पोरगा चिकू विकतोय म्हणून गावात चर्चा होत असे. मला या गोष्टीचे वाईट वाटायचे. मला यामुळे वडिलांचा रागही येत असे. माझ्या मित्र-मैत्रिणी राहत त्या कॉलनीतही मी चिकू विकले. त्यातून माझ्यातील संकोच गळून पडला. आमच्या पोल्ट्रीच्या कोंबड्या सायकलीवरून मागेपुढे बांधून हव्या त्या ठिकाणी पोहोचविण्याचे कामही मी केले. घरात दररोज आठ-दहा जणांचा राबता असायचा. त्यांचे चहापाणी नेण्याचे काम माझ्याकडे असे. खरेतर या सर्व गोष्टींमुळेच माझ्यावर संस्कार घडले.
शाळेत मॉनिटर आणि बॅडमिंग्टन स्पर्धेत कॅप्टन म्हणून मी खेळत असे. काबरा विद्यालयातून ६८ टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झालो. अकरावीसाठी वडिलांनी धुळ्यात पाठवले, पण ज्यांच्याकडे राहून शिकायचे होते त्यांचीच बदली झाल्याने पुन्हा एरंडोल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा लागला. १९९५ साली साली ५३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालो. मला विज्ञान शाखेचा अभ्यास आवडतच नव्हता. यामुळे वडिलांना वाईट वाटायचे. आपल्या मुलाने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सनदी अधिकारी बनावे असे त्यांना वाटत असे. या परीक्षेसाठी बीबीएम अर्थात बॅचलर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट उपयुक्त ठरते असे कुणीतरी त्यांना सांगितले. त्यासाठी मी प्रवेश घेतला. या शिक्षणाचा आपल्याला उपयोग नाही हे माझ्या लक्षात आले आणि मी शाखा बदलण्याचे ठरविले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. वर्ष वाया गेले मात्र उरलेल्या सहा महिन्यांचा उपयोग वेगळ्या पद्धतीने केला. शिबिरात सहभाग घेतला, बॅडमिग्टनचा आनंद घेतला, माझे शिक्षक श्री. मनोहर पाटील यांच्या क्लासेसमध्ये सहभागी झालो. पाटीलसरांनी माझ्यातील संभाषण कौशल्य ओळखले. अनेक कामे दिली. शिकविण्याचासुद्धा अनुभव आला व आंतरिक सामर्थ्याचेही अंशतः दर्शन घडले.
१९९६ मध्ये बी.ए. करण्याचे ठरविले. इंग्लिश माझा आवडता विषय. त्यामुळे हाच विषय घेऊन बी.ए. करण्याचे ठरवले. यावर्षी फंक्शनल इंग्लिश विषय आलेला होता. तो करण्याचे मी ठरविले. त्यामुळे प्रथम भाषा म्हणून इंग्रजी, स्पेशल इंग्रजी, फंक्शनल इंग्रजी, त्याच्या जोडीला मानसशास्त्र आणि राज्यघटना हे दोन विषय घेतले. फंक्शनल इंग्लिश शिकविणारे प्राध्यापक महाविद्यालयात नव्हते. दर आठवड्याला धुळ्याच्या कॉलेजात जायचे, तिथून शिकून आल्यावर आपल्या सर्व वर्गमित्रांना शिकविणे, बी.ए. इंग्लिश इन मराठी या तीन वर्षात कॉलेजात पहिला होतो. इतकेच नव्हे तर निवडणुक लढवित यश मिळविले पण तिथे मात्र दोन मतांनी पराभूत व्हावे लागले. तीन वर्षे व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची ठरली. विद्यार्थी परिषदेच्या संघटनेतील विविध जबाबदाऱ्या अंगावर घेत, अनेक चळवळींनी जिल्हा ढवळून काढला. जळगावच्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. पाटील हे नात्याने काका लागत असत. त्यांच्या काही निर्णयाच्या विरोधात दीड-दोन हजार विद्यार्थ्यांचा मोर्चाही काढला. व्यसनमुक्ती अभियान राबवणे, टेकडीवर हजार झाडे लावणे. वाढविणे, गावातून धान्य निधी जमा करणे, शिबीर भरवणे असे अनेक उपक्रम तहानभूक विसरून मी सर्व कार्यकर्त्यांसोबत राबवीत असे. मी शिबिरात आहे माहिती पडल्यानंतर मुलींचे पालकसुद्धा माझ्या भरोशावर मुलींना परगावच्या निवासी शिबिरांना निर्धास्तपणे पाठवीत. सर्व कार्यकर्त्यांसोबत हसतखेळत, गप्पा गोष्टी करीत नियोजित केलेले कार्यक्रम पूर्णत्वास नेत असे. अभाविप, जेसीज क्लब आणि विवेकानंद केंद्र या तीन संस्थांच्या माझ्या जडणघडणीत फार महत्त्वाचे योगदान राहिले. १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एरंडोलमध्ये विवेकानंद केंद्राने मिरवणूक काढली. त्यात मी स्वामीजींच्या वेषात सहभागी झालो होतो. कार्यक्रमाच्या अखेरीस स्वत: विवेकानंद बोलत आहेत, या भूमिकेतून संवाद साधला. मनात वेगळीच भावना निर्माण करणारा तो क्षण होता. कॉलेजात जेव्हा बॅडमिंग्टनची टीम उभी केली, गावात बॅडमिंग्टन कोर्ट नव्हते, त्यासाठी ग्राऊंड तयार केले. अभ्यास आणि अभ्यास उत्तर उपक्रमातून अधिकाधिक बहिर्मुख होऊन प्रवास सुरू झाला. बालपण आठवल्यावर अधिकच भारावून येते, कदाचित त्या वेळी केलेल्या छोट्या-मोठ्या चांगल्या कामांचा अनुभव मला आज करीत असलेल्या कामांमध्ये उपयुक्त ठरतो.
एम. ए.साठी पुणे गाठण्याचे ठरविले. मात्र दुर्दैवाने पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालो. त्यामुळे पुण्यातीलच वाडिया महाविद्यालयात पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. तेथे डॉ. एन. एम. ऑस्टीन यांचा माझ्यावर चांगला प्रभाव पडला. पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षासाठी पुणे विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न केला. तो यशस्वी ठरला. पुढचा टप्पा होता, लिखित स्वरूपात असलेली इंग्रजी भाषा आविष्काराच्या पद्धतीवर कशी बदलते त्याला शैलीचे पैलू कसे पडतात, हे शिकविणारा अभ्यासक्रम माझ्या इंग्रजी ज्ञानात मोठी भर टाकून गेला. सन २००१ मध्ये एम.ए. झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न समोर होताच. २००१ मध्ये दुर्दैवाने वडीलांचे आकस्मिक निधन झाले. त्यांची इच्छा म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे ठरविले. या स्थितीत त्यांचे भावनिक आधार दिला.
स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी या जगप्रसिद्ध संस्थेत अभ्यासक्रम चालत असे. तिथे मी चार महिन्याच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. हा विभाग चालविणारे विवेक व सविता कुलकर्णी यांची माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करता करता चार महिन्यात या सिस्टीमचा एक भाग बनून गेलो. याच ठिकाणी विद्यार्थीदशा संपवून मी व्यावसायिक आयुष्यात खऱ्या अर्थाने सुरुवात केली. माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू होता, त्याचवेळी ज्ञानप्रबोधिनीच्या त्या विभागातील समन्वयकाची कामे, समुदपदेशन, ग्रंथालय सांभाळणे या कामात सहभागी होऊ लागलो. काही दिवसातच स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पूरक अभ्यासक्रमातील गावभेटी विशेष शिक्षक यांचा प्रारंभ झाला. या सर्वात मी उत्तम सहभाग देत असे. त्यातील प्रमुख श्री. महेंद्रभाई सेठिया, डॉ. विवेक पोंक्षे यांचा विश्वासही हळूहळू कमावला. त्यांनी काही इंग्रजीची लेक्चर्स घेण्यास प्रारंभ केला. या घडामोडी केवळ चार महिन्यांतील ज्ञानप्रबोधिनीचे काही सामाजिक उपक्रम चालतात. यातील साखरशाळा हा महत्त्वाचा उपक्रम असे. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जेथे या कामगारांची वस्ती असेल तेथे जाऊन शिकविणारी ही शाळा. त्या मुलांना शिकवणे आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देणे ही कामगिरी मी सांभाळली. त्यासाठी मी इचलकरंजी भागात प्रबोधिनीतील काऊन्सिलिंग कोर्समध्ये सहभागी होत असायचो. या काळात मी तीनदा एमपीएससीच्या प्रिलिममध्ये उत्तीर्ण झालो. पण फायनलला मात्र कधीच यश मिळाले नाही. या टप्प्यावर मी विचार केला, आपण ठरवतो, तेथे झोकून देतो आणि तेथे यश मिळतेच. मग इथे अपयश का यावे? खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आले की ही परीक्षा मी उत्स्फूर्तपणे दिलीच नाही, तर आपल्या वडिलांची इच्छा म्हणून आपण त्याकडे पाहतो. त्याकडे फुल फोकस नाही. त्या क्षणी त्यांनी या विषयातून बाहेर पडण्याचे ठरविले.
दरम्यानच्या काळात पुण्यात आणखी काही घडामोडी होत होत्या. ज्ञानप्रबोधिनीतून मला मानधनही मिळण्यास प्रारंभ झाला होता. याच काळात कोणी विद्यापीठातील तत्कालीन डॉक्टर अशोक थोरात यांनी नोकरीतून बाहेर पडत ‘इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज इन इंग्लिश’ संस्था स्थापन केली होती. एम.ए. या विषयाचा आग्रह धरताना माझा थोरात सरांशी चांगलाच परिचय झाला होता. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मला बोलावले. या संस्थेने पुणे महापालिकेच्या २५ शिक्षकांचा प्रशिक्षणाचा प्रकल्प हाती घेतलेला होता. पुण्यातील इंग्रजी विषयातील बारा तज्ज्ञ यात सहभागी झाले होते. एक दिवशी मात्र वेगळेच घडले. तज्ज्ञ शिक्षक आलेले नव्हते. अशा स्थितीत स्वतः थोरातसर जात असत पण त्यादिवशी इथे शक्य नव्हते. त्यांनी मला वर्गावर जाण्यास सांगितले. इथे चमत्कार घडला. माझे वय तेव्हा जेमतेम २४ वर्षे होते. वर्गातील शिक्षकांचे सरासरी वय चाळीस वर्ष, हे सारे पुण्यातील शिक्षक त्याबद्दल भीती होती. पण अखेर मी स्वत:ची समजूत घातली आपली शैली आवडली नाही तर पुण्यातील शिक्षक फार सभ्य भाषेत आपली नापसंती व्यक्त करतील, असे मी मनाला समजावले आणि वर्गावर गेलो. दुसऱ्या दिवशीही तास घ्यावा लागला. हेच मार्गदर्शक हवेत असे १६० फीडबॅक सरांकडे आले. नियमितपणे तास घेऊ लागलो. दर आठवड्याला अठरा-अठरा तास घेत असे. एकूण पंधराशे शिक्षकांना प्रशिक्षित केले गेले. खूप चांगल्या माणसांचा सत्संग मला मिळाला. तेव्हा २००५ साल उजळत होते. सारे काही सुरळीत सुरू असताना भविष्यात पुण्यात चांगल्या प्रगतीची चिन्हे दिसत असताना माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. माझ्या वडिलांनी पैसे दिले म्हणून मी पुण्यापर्यंत पोहोचलो आणि त्या आधारावर मी आज चांगले पैसे मिळवित आहे. पण माझ्या परिसरात असलेल्या खेड्यापाड्यांत राहणाऱ्या गरीब मुलांचे काय? त्यांच्याकडे पैसा नाही, मार्गदर्शन नाही. मी समाजसुधारकांची चरित्रे वाचतो. त्याचा उपयोग काय? त्यांच्यासाठी मी काय करू शकेन? असे विचार डोक्यातून जात नव्हते. मी शेवटी गावी परत जायचे ठरविले. २००५ ला अखेर ‘दीपस्तंभ’ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना झाली.
–यजुवेंद्र महाजन
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)
Leave a Reply